ठरवले मनाचे न ऐकायचे
कधीही कुठेही न गुंतायचे
सखी यायची श्रावणासारखी
रिते मेघही सावळे व्हायचे
किती तळघरे, तळघरामागुनी
पुन्हा खोल इतके न खोदायचे
कसे प्रेम करतात शिकवेन मी
उद्या ते धडे फक्त गिरवायचे
नवे ना घडे तेच ते तेच ते
जुने दिवस झेरॉक्स काढायचे
'कसे चाललंय'जर विचारे कुणी
खरे काय, नसतेच सांगायचे
'नको सत्य सांगूस सगळे मला
नवे भ्रम कुठे सांग शोधायचे'
किती गर्व, हव्यास अन वल्गना
अखेरीस मातीत मिसळायचे