नूर

माझ्याच अंतरीचे शोधीत सूर आलो
होते समीप जे, ते शोधीत दूर आलो!

जाऊन पंढरीला ना देखिला विठोबा
(पाहून मी जनांचा आनंद-पूर आलो!)

हे देव पत्थरांचे, पाहू कशास त्यांना
भेटीस माणसांच्या येथे जरूर आलो...

भूभाग जिंकले, पण ना जिंकले मनांना
- मी दाखवून त्यांना त्यांची कसूर आलो

थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण-
त्या रुक्ष मैफिलीचा बदलून नूर आलो

- कुमार जावडेकर