प्रेरणा : वैभव ची अतिशय नितांत सुंदर गझल 'सुखात आहेस ऐकतो'
मूळ गझल :
सुखात आहेस ऐकतो! हे कसे जमवतेस सांग ना!
तुडुंब डोळ्यामधील पाणी कुठे लपवतेस सांग ना!
अजून गेली नसेल ना ती रुसावयाची सवय तुझी?
कुणी न समजावता मनाला कसे हसवतेस सांग ना!
अता तरी आणखी न कोणी तुझ्याविना आरशामध्ये
कुणास पाहून लाज-या पापण्या झुकवतेस सांग ना!
नव्यानव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला जरी
कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस सांग ना!
मध्येच दचकून जाग येता तुटे तुझी निग्रही निशा
अशा क्षणी एकसंधशी तू किती उसवतेस सांग ना!
खरोखरी जर तुला तहाचा नसेल संदेश द्यायचा
धुकेजलेल्या दिशांवरी नाव का गिरवतेस सांग ना!
खड्या पाहा-यावरी असा भूतकाळ नेमून ठेवला
स्वतःस माझ्याविना जगाया कधी शिकवतेस सांग ना!
--------------
यथेच्छ खातेस ऐकतो हे कसे जमवतेस सांग ना
तुडुंब पोटामधील खाणे कुठे लपवतेस सांग ना
अजून गेली नसेल ना ती चरावयाची सवय तुझी?
म्हशींप्रमाणे रवंथ करुनी कसे पचवतेस सांग ना!
अता तरी आणखी न कोणी तुझ्याविना ह्या घरामध्ये
किलोकिलोने कश्यास ह्या कोंबड्या शिजवतेस सांग ना
नव्या नव्या गोड जिन्नसांची ददात नाही तुला जरी
कशास ताटामध्ये शिरा कालचा मिरवतेस सांग ना
परात चापून लाडवांची भरून जाते पोट तरी
अश्याच त्यावर सहस्त्र जिलब्या कश्या रिचवतेस सांग ना!
खरोखरी जर तुला न खाता उपास आहे करायचा
भुकेजले पोट, त्यावरी हात का फिरवतेस सांग ना
बका बका खाउनी तुझे हे शरीर फुगले फुग्यापरी
कशास हत्तीस त्या बिचाऱ्या उगी भिववतेस सांग ना