हय्या हो, हय्या हो हय्या हो

हय्या हो
(अरुण कोलटकरांचे बोट धरुन)

हिंदीतूनच बोलणार, आम्ही हिंदीतूनच
जयाताई म्हणाल्या
निषेध करा, तीव्र निषेध करा
संस्कृतीसंरक्षक म्हणाले
माफी मागा, बिनशर्त माफी मागा
राजसाहेब म्हणाले
माफ करा, एकडाव माफ करा
जयाताई म्हणाल्या
नामंजूर, माफी नामंजूर
राजसाहेब म्हणाले
हय्या हो, हय्या हो हय्या हो
आम्ही म्हणालो

सगळ्यांच्या भल्यासाठी, सगळ्यांच्या
मनमोहन म्हणाले
देश विकाल अशाने, देश विकाल
करात म्हणाले
जिंकलो आम्हीच शेवटी, जिंकलो आम्हीच
सोनिया म्हणाल्या
पैसे खाल्ले दाबून, पैसे खाल्ले
अडवाणी म्हणाले
हय्या हो, हय्या हो हय्या हो
आम्ही म्हणालो

परत द्या शेतजमीनी, परत द्या
ममता म्हणाल्या
काढून घेऊ प्रकल्प, काढून घेऊ
टाटा म्हणाले
सामोपचारानं, जरा सामोपचारानं
बुद्धदेव म्हणाले
संपला नाही लढा, संपला नाही
ममता म्हणाल्या
येता का महाराष्ट्रात, येता का
विलासराव म्हणाले
हय्या हो, हय्या हो हय्या हो
आम्ही म्हणालो

रोटी द्या एकतरी, रोटी द्या
भय्या म्हणाला
लालूचाच हात, नक्की लालूचाच हात
नितीश म्हणाले
राजकारण, बघावं तेंव्हा राजकारण
लालू म्हणाले
हय्या हो, हय्या हो हय्या हो
आम्ही म्हणालो