अमेरिका आणि भूक!

माणसाला खायला का लागतं? इकडे आल्यापासूनच हल्ली असा प्रश्न पडायला लागला आहे. दररोज खायला लागतं म्हणून रोज खायला बनवावं लागतं आणि मग आता आज काय करायचं स्वयंपाकाला असा प्रश्नही पडायला लागतो. कितीही याद्या करून ठेवल्या आणि मेन्यू च्या पुस्तकात पाहिलं तरीही हा प्रश्न पडतोच. निदान मला तरी! कारण आठवडाभराच्या पदार्थांची यादी केलेली असली तरीही दोन दिवस त्याप्रमाणे जेवण बनतं पण तिसऱ्या दिवशी यादीमध्ये लिहिलेलं एकतर करायचा तरी कंटाळा येतो; नाहीतर खायचा तरी. मग आता काय करायचं खायला? परत तोच प्रश्न! पुस्तकांमध्ये बघून वेगवेगळे पदार्थ केले तरी चार दिवस भारी मजा येते पण नंतरच्या दिवशी परत काहीतरी साधच खावंसं वाटतं. मग अशा साध्या जेवणामुळे बनवण्याचा वेळही वाचतो आणि दमणूकही कमी! साधं वरण भात किंवा भाजी पोळीला कितीसा वेळ लागणार? मग काही दिवस असा वेळ ‘वाचवून’ झाला की परत ह्या साध्या जेवणाचा कंटाळा आलाच म्हणून समजा. आज काहीतरी वेग्गळं खावंसं वाटतंय; काय बरं करायचं खायला? आला परत तोच प्रश्न! असा प्रश्न सारखा सारखा पडायला लागला की वाटतं की माणसाला दररोज खायला का लागतं?

बरं, स्वयंपाकाचं एक ठीक आहे. रोज काहीतरी केल्याचा, नवीन पदार्थ बनवल्याचा आनंद तरी मिळतो. दुसऱ्या कोणी आवडीनं खाल्लं की समाधानही मिळतं. पण भांडी? ती रोज घासायची? घासायचा कंटाळा आला म्हणून जास्तीची असलेली भांडी वापरली तरी आजचं मरण फक्त उद्यावर! आणि मग हाss असा ढीग जमतो भांड्यांचा! मग सग्गळी भांडी घासून सिंक रिकामं केलं तरी दुसऱ्या दिवशी भांडी जमतातच! अरेच्या! कालच तर मी हे सगळं धुतलं होतं ना?

पण तरीही उद्या जेवायचं असेल तर निदान लागतील तेवढी भांडी तरी घासायला पाहिजेतच; अशी एक नकोनकोशी जाणीव होते आणि मग आळस झटकून ती भांडी घासायची, विसळायची, वाळवायची, वाळली की जागेवर ठेवायची. मग लागतील तशी वापरायची आणि परत……..

भांडीवाली बाई? नाही ना मिळत इकडे एवढ्या सहज! आणि dishwasher? तो आहे की, पण त्यातही अर्धवटच काम होतं ना! आपल्या फोडण्या, परातीला चिकटलेली कणीक त्यात थोड्याचं स्वच्छ निघतायत? मग करा सगळं स्वतःच! सारखी सारखी भांडी घासायला लागली की परत तोच प्रश्न पडतो! माणसाला दररोज खायला का लागतं?

काहीतरी अशी सोय असायला हवी होती; की काही न खाता पिता आपोआप सगळं सुरळीत चालू आहे! दिवसभराच्या कामांसाठी लागणारी ऊर्जा रोजच्या रोज नीट मिळत आहे; आणि खर्चही होत आहे. नाहीतर मग उगाच कधीतरी चॉकलेट, चीज, केक असं खावंसं वाटतं आणि मग वजन वाढून बसतं. मग वाढलेलं वजन ताब्यात ठेवण्यासाठी व्यायाम करणं हे आलंच!   मग खाण्याचा आणि व्यायामाचा ताळमेळ ठेवायचा, प्रत्येक खाण्याच्या गोष्टीच्या घटकपदार्थांची यादी नीट तपासून बघायची हे ही उद्योग नकळत मागे लागतातच. Calories च्या जमा-खर्चाचा हिशोब चालू झाला की मग परत तोच प्रश्न पडतो.   माणसाला दररोज खायला का लागतं? भारतात असताना कधी Calories च्या जमा-खर्चाचा हिशोब करावा लागल्याचं बिलकूल आठवंत नाही. शिवाय स्वयंपाक करणे, भांडी घासणे अशा कामांशी पण फारसा संबंध आला नाही. त्यामुळे अमेरिकेत आल्यापसूनच आजकाल हा प्रश्न पडायला लागला आहे; माणसाला  माणसाला दररोज खायला का लागतं?