..................................
मंत्रभारल्यासमान...!
..................................
आज दर्वळे उगाच भोवतालची हवा!
मंत्रभारल्यासमान मंद मंद गारवा!
आज एवढे मनास का प्रसन्न वाटते ?
सांगता न यें असे उरात काय दाटते ?
देहही जणू नवीन, प्राणही जणू नवा !
तेवले कसे कुठून आज अंतरी दिवे?
स्पर्शल्याशिवायही मनास कोण हे शिवे ?
तृप्ततेतही अशी कळे न काय वानवा...!
सांज आजची खरेच वेगळीच भासते...
पोर सावळी हळूच लाजते नि हासते...!
पेटतो जसा विझून एक एक काजवा !
दुःख काळजामधील सारणार दूर मी...
पाहिजे तसाच आज लावणार सूर मी...
गाइलास तू मना, जरी चुकून मारवा!
- प्रदीप कुलकर्णी
.....................................
रचनाकाल ः १५ नोव्हेंबर २००८
.....................................