आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ खेळू रोज आपण
बंद दारे, बंद खिडक्या, रेशमी कोषात राहू
चार भिंतिंच्या महाली चालला संसारगाडा
हीच चाकोरी सुखाची, चौकटीचे दास होऊ
या दुतर्फा वाहणाऱ्या माणसांचे काय आम्हा
ना पडो नजरेस कोणी, झापडं डोळ्यास लावू
आपल्या दीपोत्सवाला झालरी ज्यांच्या तमाच्या
दान हा अंधार त्यांना मुक्तहस्ते आज देऊ
साजिऱ्या नगरास शोभे, सांग का वास्तव्य त्यांचे
का ठिगळ ही लक्तरांची भरजरी वस्त्रास साहू
कोंडवाडा गाव झाला, गाय भाकड, बैल पंगू
गुदमरू येथे कशाला, ह्या जगाची नाळ तोडू
पाहुनी ते दुःख परके, षंढ येवो ना उमाळा
शाल गेंड्याच्या त्वचेची पांघरू अन् गाढ झोपू