आईचे मूल!

ऑफिसला पोचेपर्यंत शमा च्या मनात नंदाच घोळत होती. सकाळी सकाळी तिचा फोन आला होता. फारच संतापलेली वाटत होती. इतके भरभर बोलत होती की नीटसे काहीच कळेना नक्की काय घडलेय. तिला कसेबसे थोडेसे समजावले आणि संध्याकाळी येते तुझ्याकडे असे सांगून फोन ठेवला. कामाच्या रगाड्यात दिवस कुठे गेला कळलेच नाही. नेहमीच्या ट्रेनच्या धक्काबुक्कीतून उतरल्यावर भाजीपाला थोडेसे सामान घेऊन शमाने नंदाचे घर गाठले.

दार नंदानेच उघडले. घरात शांतता होती. "का गं, कोणीच दिसत नाही? सगळे कुठे बाहेर गेलेत का?" ह्या शमेच्या प्रश्नांना नंदाने उत्तरे दिलीच नाहीत. मग शमेने मुद्द्यालाच हात घातला. "नंदे बस पाहू इथे आणि सांग कशासाठी चिडचिड करते आहेस ते. आणि हो मला कळेल असे बोल. सकाळी किती ओरडत होतीस गं? मला काही कळत नव्हते."

कोंडलेल्या वाफेवरचे झाकण निघाले आणि सकाळच्याच आवेशात संतापून नंदा बोलत होती, " किती भयंकर आहे हा माझा नवरा. देवा-ब्राम्हणासमक्ष हजारभर लोकांच्या साक्षीने माझ्या आई-बाबांनी ह्याच्या हातात माझा हात दिला. ह्याच्या आई-वडिलांची सेवा केली, दीर-नणंदेचे नखरे काढले. ह्याची दोन पोरे काढली. वंश पुढे चालविला ......... " ती  पुढेही बरेच काही बोलत होती. शमेचे मन मात्र तिच्या, " ह्याची दोन पोरे काढली.... " ह्या वाक्याशीच थांबले. असे काही ती बोलेल असे कधी वाटलेच नव्हते. चांगल्या संस्कारात वाढलेली, खूप शिकलेली ही  माझी जवळची मैत्रीण अन हिच्या मनात हे विचार? न राहवून शमाने तिला टोकले, "का गं असे म्हणतेस? मुले ही काय फक्त त्याची आहेत का?" त्यावर आणिकच भडकून नंदा म्हणाली, " हो. जरी माझ्या पोटातून आली असली आणि मला कितीही प्रिय असली तरी त्याला हवी म्हणूनच झालीत ना? " आता मात्र शमेला तिथे थांबवेना. तिच्यातली आई अतिशय दुखावली गेली. अनेक वर्षे संसार होऊन, मुले खूप मोठी होऊनही जर असे विचार मनात येत असतील तर ह्या नात्यात काही अर्थच नव्हता. नंदाला थोडे समजावून शमा घरी जायला निघाली.

मन बेचैन झाले होते. आपले मूल ही जाणीवच किती सुखदायी, कोमल आहे. लग्न झाल्यावर काही काळाने तिला-त्याला ह्या सुखाची ओढ वाटू लागते. दोघांच्या अस्तित्वाच्या खुणा ज्यात प्रकर्षाने दिसतील असे आपले तिसरे कुणी असावे ही ओढ. निसर्ग नियमानुसार आईला बाळाचा प्रत्येक श्वास अनुभवता येतो. स्त्रीला मिळालेले अलौकिक वरदानच हे. ह्या सुखाला पुरुषाला मुकावे लागते. जन्म देताना वेदनांना सामोरे जावे लागते. त्यातही आनंद असतो असे म्हणता येणार नाही कारण शेवटी वेदना ही वेदनाच असते. पण त्यात निर्मितीचा, आपल्या बाळाच्या जन्माचा आनंद इतका असतो की ह्या वेदना आई धीराने सोसते. पुन्हा पुन्हा सोसते. बाळाच्या जन्मानंतर अनेक गोष्टींनी ती  सुखावते. आई झाल्याचा आनंद, नवऱ्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम, कृतज्ञता, एकटीने वेदना सोसाव्या लागल्या म्हणून मुकपणे स्पर्शाने मागितलेली क्षमा अशा अनेक गोष्टींनी ती भरून पावते. आपल्या बाळाचा मुलायम स्पर्श, निरागस हसू, त्याला जवळ घेतल्यावर येणारे संमिश्र वास. सुख सुख ते काय असते अजून?

अग नंदे, लग्नाआधी फसवणुकीतून, मोहाला बळी पडून, जोर-जबरदस्तीतून अनेक मुली माता बनतात. त्यातल्या काही मुलींना  तरी गर्भपाताचा मार्ग नक्की मोकळा असतो. पण त्या तसे करीत नाहीत. कारण ते मूल आईच्या हृदयात जन्माला आलेले असते. ते आता फक्त तिचे असते. जन्मलेले मूल अपरिहार्यपणे वंशवृद्धीही करीत असेल पण ते त्याच्या जन्माचे प्रयोजन नक्कीच नसते. किमान आईसाठी तरी नसतेच नसते. खरे तर मूल कोणाचे हा प्रश्नच चुकीचा आहे. मूल हे संपूर्ण घरादाराचे असते. आईचा हक्क जास्त कारण बाळाच्या रुजण्यापासून मोठे होईपर्यंत सगळ्या प्रक्रियांमध्ये सर्वात जास्ती वाटा तिचा आहे. मात्र ह्याचा अर्थ तिने ते उपकारास्तव जन्माला घातले आहे असा असतो का? नवऱ्यासाठी मूल काढले म्हणजे नाईलाजाने एखादे देणे दिल्यासारखेच झाले. आपल्या आईच्या तोंडून हे उदगार मुलाने एकले तर? नवऱ्याची कितीही मोठी चूक असली तरीही मुलांच्या अस्तित्वाचा त्यात बळी जाऊ नये एवढे तारतम्य आईच्या रागाला असलेच पाहिजे.प्रेम, वात्सल्य व त्यागमूर्ती असलेल्या आईची खरी प्रतिमा तिने कधीच डागाळू देऊ नये कारण ह्या नात्याला इतर कुठल्याही भावना स्पर्शू शकत नाहीत. आईच्या नजरेत मूल हे फक्त तिचेच असते.