रोज बसतो त्याच फुटलेल्या दिव्याशी रात्रभर
तो न जाणे काय बडबडतो नभाशी रात्रभर
ताप प्रश्नांचा असा चढतोच आहे सारखा
एकही उत्तर बसेना का उशाशी... रात्रभर
तो असावा चतुर किंवा गंजला हा आकडा
खेळुनी उंदीर गेला सापळ्याशी रात्रभर
खंगलेल्या चेहऱ्यावर वेडसर झुलते हसू
झुंज घेते स्वप्न त्याच्या वास्तवाशी रात्रभर
एक आठी जागते आहे कपाळावर तिच्या
काय चुकले? उजळणी करतो मनाशी रात्रभर
शेवटी निसटून गेला एक अस्फुट हुंदका
केवढा सांभाळला होता उराशी रात्रभर
जसजसा झालो शहाणा तसतसे झाले कमी -
भांडणे माझ्यातल्या मी माणसाशी रात्रभर