कोमल गंधार (भाग - १)

दुपारचे साडे चार पाच वाजून गेले होते.  चैतन्यची गाडी कोयना नगरच्या दिशेनं वेगानं धावत होती.  पाटण केव्हाच मागे पडलं होतं.  म्हणजे कोयना नगर अजून फक्त पंधरा-वीस मिनिटं.  तिथंच प्रज्ञा भेटणार होती.  आणि तिथून पुढं लाँचनं साधारण तासभर.  म्हणजे सगळा मिळून अजून दीड दोन तासाचा प्रवास शिल्लक होता.  सप्टेंबर नुकताच संपला होता.  पाऊस ओसरून गेला होता.  सगळीकडे हिरवं गार होतं.  वळणा-वळणाच्या रस्त्यानं जाताना रस्त्याच्या डावीकडनं भरून वाहणाऱ्या कोयना माईचं सुखद दर्शन होत होतं.  गाडीत सीडी प्लेअरवर भीमसेनजी मुलतानीतली ठुमरी आळवत होते... "सजन तुम काहेको नेहा लगाए... ". चैतन्यची ही अतिशय आवडती ठुमरी.  गाडी चालवता चालवता हातानं हलकेच ठेका धरून चैतन्य त्या स्वरऱ्हिंदोळ्यात रममाण झाला होता. 

चैतन्य कुरुंदकर... वय अंदाजे बेचाळीस त्रेचाळीसच्या आसपास, गोरापान, रुबाबदार, काळेभोर दाट कुरळे केस, मोठ्ठं कपाळ अन खेळकर डोळे.  चैतन्यनं अजून लग्न केलेलं नव्हतं आणि त्याला तसंच स्वछंदी जगणं मस्त आवडत होतं.  चैतन्य व्यवसायानं पत्रकार. लहानपणापासनंच लेखनाची वाचनाची आवड. त्यानं पुण्यातनं कला शाखेची पदवी घेतली आणि एक वर्षाचा पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता.  पहिली काही वर्षं उमेदवारीत घालवल्यानंतर आता त्याच्या प्रकाशित तीन चार पुस्तकांनी आणि पर्यावरणावरच्या त्याच्या लेखांनी साहित्य विश्वात त्याचं नाव लोकांना माहिती व्हायला लागलं होतं.  त्याचं प्रसिद्ध होणारं लिखाण अभ्यासक वाचक मोठ्या उत्सुकतेनं वाचत होते.  त्यावर चर्चा घडत होत्या. 

आठ दिवसापूर्वी त्याला त्याच्या मैत्रीणीचं प्रज्ञाचं बंगलोरहून पत्र आलं होतं आणि ते वाचूनच तो उल्हासित झाला होता. 

"माझ्या भारतीय फुलपाखरांवरच्या संशोधनाच्या कामासाठी मी कोयनेच्या जंगलात चार दिवस यायचं म्हणतीये.  तूही येतोस का?  मस्त मजा येईल. " 

अर्थातच.  क्षणाचाही विलंब न लावता त्यानं प्रज्ञाला फोन केला आणि लगेच सगळा कार्यक्रम नक्कीही करून टाकला.  अशी संधी कोण सोडणार.  "ठीक... ठीक.  हे बघ प्रज्ञा मलाही नाहीतरी चार दिवस सुटी घेऊन कुठेतरी बाहेर जायचंच होतं.  या शहरी वातावरणातून, ट्रॅफिक जॅम्स मधून, दांभिक लोकांच्या जगापासून दूर... आधुनिकतेमुळं जमलेली कोळीष्टकं झटकून टाकण्यासाठी.."

"हं... " प्रज्ञानं रुकार दिला.

" चार दिवस कोयनेच्या जंगलात म्हणजे अगदी पर्वणीच होईल.  तू तुझं काम कर ... मी माझं वाचन लिखाण... "

"चालेल की... "

"कोयनेच्या जंगलात बॅकवॉटरच्या खूप आत फॉरेस्टचा एक डाक बंगला आहे.  मी आमच्या ऑफिस मधनं चीफ काँझर्व्हेटरच्या ऑफिसमध्ये फोन करून दोन खोल्या बुकच करून टकतो. "

"अरे व्वा... हे तर फारच छान होईल... "

"दोन खोल्या बुक करू का एकच करू...! " चैतन्यनं चेष्टेच्या सुरात विचारलं.

"चैतन्य शहाणपणा करू नकोस हं.  तू सडा फटिंग आहेस पण मी लग्न झालेली संसारी बाई आहे.  लक्षात आहे नं? " प्रज्ञानं चैतन्यला जामलं. 

"बरं बाई, रागावू नकोस.  मी आपली सहज गंम्मत करत होतो.  ठीक आहे.  मग आता सारं नक्की ठरलं तर.  तू परस्परच येणार आहेस ना? कोयनेच्या स्टँडवर आपण पाचच्या सुमारास भेटू.  ठीक आहे? "

"ओ के बॉस्स... " प्रज्ञा. 

"आणि काही बदल असेल तरच परत फोन करू. नाहीतर हे सारं अगदी पक्कं. "

"यस्स... डन. "

भीमसेनजींची ठुमरी संपत असतानाच शेवटचं गोल मोठ्ठं वळण घेऊन गाडी कोयना नगरात आली.  चैतन्यनं सीडी प्लेअर बंद करून टाकला आणि गाडी कोयनेच्या स्टँडमध्ये सरळ आतच नेली. कोल्हापूर - दापोली एसटी समोरच उभी होती.  हं, यातूनच प्रज्ञा आली असणार.  गाडी लावता लावताच त्याची शोधक नजर सगळ्या स्टँडभर फिरली.  कोपऱ्यातल्या हॉटेलच्या दारातच प्रज्ञा उभी होती.  पाठीला भली मोठी हॅवरसॅक लावून.  केस विसकटलेले, चेहेरा लांबच्या प्रवासानं थकलेला.  पाण्याच्या बाटल्यांची खरेदी चालू होती बहुतेक.

प्रज्ञा ठाकूर.  म्हणजे पूर्वाश्रमीची ठाकूर आन लग्नानंतरची प्रज्ञा शर्मा.  हे लोक मूळचे उत्तरेतले.  गढवालचे.  तिचे वडील आयकर खात्यात कुणी मोठे अधिकारी होते. त्यांची बदलीची नोकरी.  पण प्रज्ञा मात्र लहानाची मोठी झाली ती पुण्यातच.  त्यामुळे ती अगदी परिपूर्ण पुणेरी होती.  वागायला अन दिसायलाही.  थोडीशी जाडसर चणीची, सावळ्या नितळ अंगकांतीची.  गोल वाटोळा चेहेरा, सुंदर नाही पण निरतिशय आकर्षक,  कुरळे दाट काळेभोर केस, ते घोड्याच्या शेपटीसारखे मागे बांधलेले, अपरं नाक, रुंद जिवणी, टपोरे चमकदार डोळे अन चेहेऱ्यावर बुद्धीमत्तेची झाक.

कॉलेजपासून चैतन्य अन प्रज्ञाची मैत्री होती. खरं तर चैतन्य कला शाखेचा आणि प्रज्ञा शास्त्र शाखेची.  पण रेड क्रॉसच्या कामातनं त्यांची ओळख झाली आणि स्वभाव साधर्म्यामुळे ही ओळख चांगल्या निखळ दृढ मैत्रीत परिपक्व कधी झाली ते त्या दोघांनाही कळलं नाही.  अन ही मैत्री एवढी विशुद्ध, एवढी पावन होती की याला कधी तथाकथित प्रेमाचा, शारीरिक आकर्षणाचा, वासनेचा स्पर्शही झाला नाही. 

प्रज्ञानं झूलॉजी मधनं पदवी घेतली तर चैतन्यनं मराठी साहित्यात.  प्रज्ञानं एम एस्सी केलं तर चैतन्यनं पत्रकारिता.  प्रज्ञाला खरंतर पुढे संशोधन पी एच डी वगैरेही करायचं होतं.  पण घरचे लोक परंपरावादी.  त्यामुळे त्यांच्याच समाजातल्या एका चांगल्या, उच्चशिक्षीत, सुसंस्कृत मुलाचं स्थळ जेव्हा त्यांना समजलं तेव्हा सगळ्या पारंपारिक रिती रिवाजांप्रमाणेच त्यांनी प्रज्ञाचे चार हात करून टाकण्यात कोणतीच दिरंगाई केली नाही.

या साऱ्या काळात चैतन्यची अन प्रज्ञाची मैत्रीही अबाधितच होती.  त्यांच्या एकमेकांशी भेटी गाठी, गप्पा टप्पा, पुस्तकांची देवाण घेवाण सारं काही सुरळीत चालू होतं.  प्रज्ञाच्या लग्नानंतर अर्थातच यात थोडासा खंड पडला. तिचं नवं घर होतं.  त्यामुळे चैतन्यला वाटायचं की उगीच आपल्यामुळे तिच्या सासरकडच्यांच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकायला नको.  तिला कधी कुठचा त्रास व्हायला नको.  पण प्रज्ञाला घर चांगलं मिळलं होतं.  तिचा नवरा जेवढा बुद्धीमान होता तेवढाच मनानंही मोठा होता.  चैतन्यच्या आणि प्रज्ञाच्या मैत्रीत गैर काहीच नाही हे लवकरच त्याच्या लक्षात आलं आणि त्या मैत्रीचा त्यानं मोकळेपणानं स्वीकार केला.  एवढंच नाही तर तो अन चैतन्यही एकमेकांशी सौहार्दानं वागू लागले.  सगळं काही खूप चांगलं आणि सरळ झालं.

लग्नानंतर वर्षा दीड वर्षातच प्रज्ञाला मुलगी झाली आणि पुन्हा चार वर्षांनंतर आणखी एक.  प्रज्ञा आता स्वतःच्या संसारात आणि दोन्ही मुलींच करण्यात पूर्ण गुरफटून गेली.  चैतन्यशी गाठीभेटी खूप कमी झाल्या आणि अशातच प्रज्ञाच्या नवऱ्याला बंगलोरातली आय टी क्षेत्रातली खूप मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळाली आणि ते सारं कुटुंब बंगलोरला निघून गेलं.  प्रज्ञाच्या दोन्ही मुली शाळेत जायला लागल्यानंतर, प्रज्ञालाही तिथल्याच कुठल्याश्या शास्त्रीय संशोधन संस्थेत नोकरी मिळाली अन तिनं झूलॉजीमध्ये तिचं पीएचडीचं काम सुरू केलं. 

बंगलोरला गेल्यापासून मागच्या दहा वर्षात प्रज्ञाची आणि चैतन्यची एकदा किंवा दोनदाच गाठभेट झाली होती.  अधून मधून पत्र फोन वगैरे व्हायचं ते मात्र अव्याहत चालू होतं.  त्यामुळे प्रज्ञाच्या आजच्या या भेटीचं खासं महत्त्व होतं.  कॉलेजनंतर म्हणजे पंधरा वीस वर्षानंतर पहिल्यांदाच असे पूर्ण चार दिवस आणि अगदी दोघेच असे ते भेटत होते.   

"कायरे शहाण्या काय गुणगुणतोयस? " यांचं दोघांचं एकमेकांना भेटणं म्हणजे अशीच एकमेकावर दादागिरी असायची.

"अगं गाडीत भीमसेनजींची मुलतानीतली एक ठुमरी ऐकत होतो.  काय लाजवाब चीज आहे माहिती आहे... "

"अरे व्वा.  हो का?  गाडीत चांगल्या सीडीज असतील तर घे हां.  मी माझा पोर्टेबल सीडी प्लेअर आणलाय. "

एकमेकांशी बोलता बोलताच गाडी फॉरेस्टच्या छोटेखानी ऑफिसपाशी येऊन पोहोचलीच.  ऑफिसच्या दारातच फॉरेस्ट खात्याचा कुणी माणूस उभा होता.  चैतन्यची गाडी येऊन थांबताच तो लगबगीनं पुढं आला. 

"नमस्कार कुरुंदकर साहेब. पुण्याहून शिखरे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही येणार आहात, म्हणून मी मुद्दाम आपली वाटच पाहत थांबलो होतो.  म्हटलं त्या ह्यानी आपली भेट होईल."

"अरे वा.  पाटील नमस्कार. काय म्हणता? बऱ्याच दिवसानी भेट झाली.  चला तुम्ही पण आमच्या बरोबर आत येताय का? " चैतन्य या भागात बऱ्याच वेळा येऊन गेलेला असल्यामुळे त्याची इथल्या लोकांशी चांगली ओळख होती.  शिवाय स्वतः पर्यावरणाचा थोडासा अभ्यासक आणि पत्रकार असल्यामुले फॉरेस्ट खात्यातल्या लोकांना त्याच्याबद्दल आदर होता.  "प्रज्ञा, हे विजय पाटील.  इथले रेंजर आहेत.  हे कोयनेचं पात्र ऐंशी नव्वद किलोमीटर आतपर्यंत आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगलं.  आणि विजय पाटलांना या जंगलातलं अक्षरशः झाड अन झाड आणि दगड अन दगड माहिती आहे." चैतन्यनं पाटलांची आणि प्रज्ञाची ओळख करून दिली. 

"पाटील, या प्रज्ञा शर्मा. या बंगलोरहून आल्यायत.  आणि भारतीय फुलपाखरांवर पी एच डी करतायत. "

"अरे वा.  मॅडम तुमच्यासारखी लोकं इकडे आली की आम्हाला खूप बरं वाटतं. " पाटील मनापासून बोलले.  "हा पालीचा आमचा बंगला म्हनजे तुम्हाला अगदी अभ्यासाला सुवर्णसंधी आहे बघा.  जंगलात आत अगदी कोअर एरियात आहे.  संपूर्ण शांतता.  शिवाय फुलपाखरांसाठी अगदी बंगल्याच्या बाहेरही पाऊल टाकायला लागायचं नाही.  अगदी अनटच्ड फ्लोरा अन फौना आहे."

चैतन्यनं गाडी फॉरेस्टच्या आवारातच नीट पार्क केली.  आता तीन चार दिवस गाडी तिथंच राहणार होती.  चैतन्यनं आणि प्रज्ञानं गाडीतलं त्यांचं सामान काढलं.  चैतन्य गाडी लॉक करत असतानाच प्रज्ञानं त्याला आठवण केली, "सीडीज ... सीडीज. "

"अरे हो.  विसरतच होतो." चैतन्यनं पुन्हा गाडी उघडली आणि आत डोकं घातलं.

"तू अजूनही वेंधळाच कसा काय रे? "

"काय करणार तुझ्यासारखी बायको मिळाली नाही ना! "चैतन्यनं चेष्टा केली. 

"हं.  बरं बास.  चला आता लवकर. " प्रज्ञानं बायकी ठसक्यात फर्मावलं. 

फॉरेस्टच्या लाँचनं जसा किनारा सोडला तसं शेवटी पुन्हा एकदा त्या दोघांना अच्छा करून पाटील माघारी वळले.

पाऊस चांगला झाल्यामुळे कोयनेचं पात्र अगदी काठोकाठ भरलं होतं.  लाँचनं किनारा सोडला आणि डावीकडे बॅकवॉटरच्या दिशेनं तोंड करून कूच सुरू केलं.  पाठीमागे धरणाची भव्य अभेद्य भिंत दिसत होती.  उजव्या डाव्या हाताला अथांग पाणी पसरलं होतं आणि त्याच्या शेवटी उंच चढत गेलेले डोंगर.  संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा झाले होते.  सूर्य नुकताच पश्चिमेकडच्या डोंगरांच्या मागे लपला होता.  सूर्यास्ताला अजून बराच अवकाश होता.  पण  इथे हे बॅकवॉटर असं दक्षिणोत्तर पसरलं होतं आणि त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्हीकडे सह्याद्रीचे उत्तुंग डोंगर होते.  त्यामुळे सकाळी सूर्यास्तानंतर बऱ्याच वेळानं सूर्याची किरणं या प्रदेशावर पडत होती आणि संध्याकाळीही सूर्यास्ताच्या खूप आधीच सूर्य पश्चिमेच्या डोंगरांआड दडत होता.  या भव्य निसर्ग पटलावर लाँच अक्षरशः मुंगीसारखी भासत होती आणि मुंगीच्याच गतीनं पुढं जात होती.  लांब कुठेतरी लहान मुलांच्या खेळण्याचा, हसण्याचा, आरडा ओरडीचा आवाज येत होता.  बाकी सारं अगदी शांत निःशब्द होतं. 

पाण्याचा अथांग पसरलेला महासागर आणि त्याच्या दोन्ही बाजूनी चढत गेलेल्या हिरवाईच्या विविध निसर्ग छटा.  त्या मनमोहक तर होत्याच पण मनाला शांतता, धीरगंभीरताही प्रदान करत होत्या.  लाँच जसजशी पुढे जात होती, तसतसं पात्र अरुंद व्हायला लागलं होतं आणि पूर्व पश्चिमेचे डोंगर जवळ जवळ सरकत होते.  आंबा, फणस, जांभुळ, चिंच, पिंपळ, वड, ऐन, किंजळ, बेहेडा, पांगारा, साग, गुलमोहोर, बहावा, हळद्या, घाणेरा, पळस साऱ्या वृक्षांची दाटी झाली होती.  स्वच्छ, प्रसन्न, ताजा हिरवा रंग निसर्गानं मुक्त हस्तानं उधळला होता.  दूरवर आत खोल जंगलात मोरांचं केकारव चालू होतं.  लांब डाव्या हाताच्या किनाऱ्याला वानरांची एक टोळी पाण्याला खाली आली होती अन लाँचचा अंदाज घेत घेत बिचकत पाण्याला तोंड लावत होती. 

चैतन्य आणि प्रज्ञाच्या चित्तवृत्ती उल्हासित झाल्या होत्या. 

"वॉव, चैत्या मी पहिल्यांदाच इथे येतीये.  हे सारं कल्पनातीत आहे रे.  मी ऍमेझॉन कधी बघितलं नाहीये पण टीव्हीवर वगैरे जे काही बघितलंय त्याच्या पेक्षाही हे अतुलनीय आहे रे. "

"हं... " चैतन्यनं सृष्टिसौंदर्यावरची नजर न काढताच हुंकार दिला. 

"आपल्या लोकांना ना मार्केटिंग नाहीच जमत. बघ काय खजिना आहे हा. "

"बरं आहे नाही मार्केटिंग जमत ते.  नाही तर याची पण वाट लावून टाकतील ते."

समोरचं चित्र हळुवारपणे एखाद्या चित्रपटासारखं बदलत होतं.  आणि बदलून पुन्हा त्याचंच नवं रुप, आणखी भव्यता, आणखी गडद हिरवाई, आणखी धीरगंभीरता समोर पुन्हा पुन्हा उभारून येत होती.  आणि भरीस भर म्हणून आता संधिप्रकाशानं या साऱ्या चित्राला आध्यात्मिक शांतता बहाल केली होती. 

"साहेब बंगला आला बरंका.  आता उतरायचंय." लाँचमधल्या फॉरेस्टच्या गार्डनं असं म्हटलं तेव्हाच चैतन्य अन प्रज्ञाची समाधी भंग पावली.  लाँच किनाऱ्याच्या जवळ आली आणि एका खडकाला अडखळून स्थिर झाली.  फॉरेस्टच्या गार्डनं आणि लाँचच्या चालकानं चैतन्य आणि प्रज्ञाला उतरायला आणि त्यांच्या हॅवरसॅक वगैरे काढायला मदत केली. 

- क्रमशः