जाग आता...

झोपल्या माझ्या मना, तू जाग आता
सोसवेना आतली ही आग आता.....

ना कुणा आनंद देण्याजोगता मी,
ना कुणाच्या मी व्यथेचा भाग आता !

तूच डोळ्यांना पुसूनी घे सखे अन,
तू तुझा शमवून घे तो राग आता

रोज माझ्या वेदनांना हासतो मी
घेतला आहे असा वैराग आता

का समुद्रा तू असा भरतीस येतो?
माझिया चंद्रास आहे डाग आता

वेड हे देऊन मजला सांगते ती,
की शहाण्यासारखा तू वाग आता

एकदाचा रिक्त हो तू जीवना रे,
अन्यथा तू सावराया लाग आता !!!

+++++++++++++++++++