चिता पेटता धुराऐवजी अहंकार निघतो
मेलेला माणूस मराठी गज़लकार निघतो
स्पर्धक निघती बघायास पत्ता कटलेल्याला
पोटासाठी अर्ध्या रात्री पत्रकार निघतो
कुटुंबियांना मदत हवी का विचारती सारे
अस्थीविसर्जनाला जाण्याला नकार निघतो
आठवड्याने सभेत सारे भाषणही देती
एक शब्द ना खरा सभेमध्ये चकार निघतो
वादावादी होते अर्जुन ठरण्याला अंती
गेला तो एकलव्य म्हणण्याचा प्रकार निघतो
गजल बिचारी अश्रू ढाळत एकाकी होते
भुरळ पाडतो जो आधी तो तो भिकार निघतो