दगड

पान या कादंबरीचे चाळुया
आपलेही नाव थोडे काढुया

घेतला आहेच येथे जन्म तर
काय होते जीवनाचे पाहुया

आज काही काम नाही फारसे
चल स्वतःचा थांगपत्ता लावुया

दाद देण्यासारखे काही निघो
शुद्ध आली, काय लिहिले पाहुया

वेळ झाली नेहमीची आपली
या मनाला विरहकाढा पाजुया

कोण जाणे काय आहे हा दगड?
वाकती सारे इथे तर वाकुया

केस ती सोडेल तेव्हा सोडुदे
ओळ सध्या वाटते ती खरडुया

हेच ते, जे मित्र पुर्वी भासले
आज त्यांना मित्र आपण भासुया

फारशी घाई कुठे आहे म्हणा?
काळ आला न्यायला की जाउया!