कुठे म्हणालो मना, अशी चालना असावी?
हयात आहोत एवढी भावना असावी
अजूनही पाहुनी तुला राख लाल होते
कुठेतरी या मनातही चेतना असावी
जगून गेलो मधेच मी जिंदगी इथे ही
कवी पुन्हा खोडतो तशी कल्पना असावी
सुवास येतो तुला, मला पाहतेस तेव्हा
कुणास ठाउक, ती तुझी सांत्वना असावी
उगाच का कोण वाहवा बोलणार आहे?
रचून झाली खरीखुरी वेदना असावी
मनात कोणी कसून दारास ठोकणारे
कुलूप काढा अता, अशी प्रार्थना असावी
मध्येच का पोकळीत झाली सजीवसृष्टी?
इथे मला संपवायची योजना असावी
लहान मोठ्या बऱ्याच आल्या, पसार झाल्या
जगायला एक चांगली यातना असावी
मनात आली, विषण्ण झाली, निघून गेली
सुधारण्याची निलाजरी वल्गना असावी
जपून माणूसकी उधळ या जगात भूषण
हपापली माणसे, तिची वंचना असावी