दशकांनंतर

चालत राहू विचार सध्या सोडत पुढचा
नसेलही रस्ता तितकासा बोचत पुढचा

माझ्या अस्तित्वाहुन कण धान्याचा मोठा
जीवन-पक्षी खाउन गेला... शोधत पुढचा

रांग स्मशानाला आहे पण चिंता नाही
मागुन धक्का मिळतो, नेतो ओढत पुढचा

धुरळा उडतो तुझ्या स्मृतींचा, छाती भरते
आक्रमितो मी रस्ता खोकत खोकत पुढचा

मधेच जावे निघून, थांबा येण्याआधी
बसुदे काळ जरा हातांना चोळत पुढचा

सुचली होती ओळ तुझ्यावर, दशकांनंतर
लक्षच नव्हते, काय असावा बोलत पुढचा

कोय असावी कैरीची, अस्तित्व आपले
नाक मुरडतो, तरी राहतो चोखत पुढचा

काम आपले करीन, तू कर काम आपले
पाजव निंदापेला मनास, ओतत पुढचा