उद्यापासून सुरवात - ३

जाहीर रीतीनं चेहऱ्यावर समाधान दिसणं ही गोष्ट पेठ्यांच्या बाबतीत तशी दुर्मिळ होती; पण तसा एक दिवस आज होता. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं साक्षात प्रोजेक्ट टायगरचे महासंचालक इंद्रावतीत आले होते. फेंगड्या, सिद्राम आणि कंपनीनं गेल्या चार-सहा महिन्यांत वाचवलेल्या व्याघ्र अवयवांचा फॉरेस्ट पंचनामा त्यांनी आपल्या सहीनिशी केला होता. पाच वेळा वाघांसाठी लावलेले पिंजरे निकामी करणे, चार वेळा विष भरलेली गुरांची कलेवरं पकडणे या सगळ्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं होतंच, पण जप्त केलेली साठ किलो वाघाची हाडं, नखं, मिशा, चार कातडी हेही जातीनं डोळ्याखालून घातलं होतं.

छोटंसं भाषणही त्यांनी केलं होतं. दर वर्षी कमीत कमी चाळीस हजार कोटी रुपयांची निसर्गसंपत्ती भारतीय वाघ राहतो त्या परिसरातून माणूस मिळवतो. निदान ती मिळत राहावी म्हणून का होईना, वाघाला, त्याच्या परिसराला जपायला हवं, हे त्यांनी सोप्या शब्दांत सांगितलं होतं. आंतरराष्ट्रीय माफिया आणि पोचर्सनी वन्यजीवांचा चोरटा व्यापार सहा दशलक्ष डॉलर्सवर पोचवला आहे, ही माहिती तर खुद्द पेठेसाहेबांनाही नवीन होती.

त्यांना काळजी एकच होती. स्मगलर्स अजूनही थंड कसे काय? काहीच रिटॅलिएशन कसं नाही?

------------------------------------------------------------------------------------------- 

सकाळी उगवतीलाच सिद्राम टेहळणीला निघाला होता. पहाटे पाऊस बरसून गेला होता. साल, कळक, अर्जुन या झाडांच्या तळाशी प्राण्यांचे ताजे ठसे होते. बुंध्यावर घासलेल्या वाघा-अस्वलांच्या नखांच्या खुणा होत्या. माकडांनी, वानरांनी गोंधळ घालून ही एवढी फळं पाडून ठेवली होती. रानाला जाग येत होती. सिद्राम चालत होता.

अलीकडे या सगळ्याकडं बघण्याची त्याची नजरच बदलली होती. या सगळ्याचा आपणही एक भाग आहोत, त्याची निगराणी करतो आहोत, याचं त्याला राहून राहून अप्रूप वाटायचं. असंही वाटायचं की आपण हेच करणार. करायलाच हवी ही राखण. सडक ओलांडून तो रानात घुसू पाहत होता. इरादा हा, की वाघांसाठी लावलेला एखादा पिंजरा मिळतोय का, ते बघावं. अचानक क्षणभरात त्याच्या पाठीतून कापत काही तरी जाऊन अंगात जाळ झाला. पाठोपाठ आणखी एक असह्य वेदना मानेजवळ. आपला गणवेश रक्तानं भिजतोय, हे कळेपर्यंत तो कोसळला होता. सगळा जन्म रानव्यात काढलेल्या त्या तरण्याबांड पोरानं आपला शेवट ओळखला, मरण ओळखलं. आभाळाच्या आकांतानं त्यानं एकदा त्याचं लाडकं रान बघून घेतलं. धूसर, अस्पष्ट अशी एक पाड्याची, घराची आठवण आणि मग डोळ्यापुढं अंधार. सगळी तगमग एकदाची शांत करणारा सर्वंकश, सर्वव्यापी, निराकार अंधार. सायलेन्सर लावलेल्या कॅलेश्निकॉव्हनं आपलं काम चोख बजावलं होतं.

-------------------------------------------------------------------------------------------- 

काळ, पोचर्सनी सिद्रामला संपवला. त्यानंतर साधारण सव्वा महिन्यानंतर अगम्य, नॉर्डिक भाषेत आपल्या संस्थेचं नाव मिरवणारी एक परदेशी सलोन कार पेठ्यांच्या ऑफिससमोर येऊन थांबली. संपूर्ण यशस्वी आणि आयुष्यातला बराच भाग नॉर्डिक देशांमधल्या एवंगुणविशिष्ट ग्रँटांवर पोसली गेलेली एक समाजसेविका त्यातून खाली उतरली. जुजबी बोलून, एक अर्ज पेठ्यांच्या टेबलावर ठेवून खास ग्रँटाडं स्मितहास्य मिरवत ती निघूनही गेली. ती दिसेनाशी झाली त्या क्षणी फडफडणारा तो अर्ज पेठ्यांनी चुरगाळून खाली फेकला. त्वेषानं फेकला.

"किती दिवस झाले रे सरोदे, सिद्रामला संपवून? आज येताहेत हे.... आज! त्याच्या घरच्यांचं काय झालं... नाही आले कुणी विचारायला. निधी आपणच जमवला. एक वेळ या ह्यूमन राईटवाल्यांचं सोड. एरवी शहरांतून गाड्या भरभरून माणसं आणून जंगलात ट्रेक, ट्रेल, नेचर कँप काढणाऱ्या संस्था? त्या कुठेयत? पाणवठ्यावर बॅटऱ्या मारून रात्री लोकांना प्राणी दाखवणारे, त्यांच्या पाण्याच्या जागा डिस्टर्ब करणारे हे लोक... कँपफायर करायचे लेकाचे इथे. महिन्याभरात कोण दिसायला तयार नाही. आणि हे राईटसवाले अर्ज देताहेत... आदिम समाजाचे बळी घेणाऱ्या या योजना बंद करा म्हणून? "

क्षोभ अनावर होऊन त्यांनी हातातली सिगारेटही भिरकावली.

"सरोदे, अरे हेच तर पाहिजे व्हायला. पोचर्सना, स्मगलर्सना. लोकल ट्रायबल्सचं मोराल खच्ची. बसली ना आपल्या गटातली चार पोरं घाबरून घरात! हीच गेम असते. मानस सॅंक्चुअरीत उल्फाच्या अतिरेक्यांनी हेच केलं... भीतीची पैदास! "

त्यांनी दमून आवंढा गिळला. श्वासही खोल घेतला. "सरोदे, योजना बंद करायची नाही. योजना बंद होणार नाही. परीटघडीचे परिसंवाद नाहीयेत इथं! 'स्थानिक जनतेचा वनव्यवस्थापनात सहभाग' वगैरे! आपण करून दाखवतोय ते! "

अचानक चाहूल लागल्यामुळं त्यांनी दारात पाहिलं. फेंगड्या चार नवीनच पोरं घेऊन उभा होता.

"टेहळायच्या कामाव येताव म्हनाले. म्हनलं घ्या सायबाशी बोलून. मी कामाव जातो, सायेब. " काठी उचलून फेंगड्या गेलासुद्धा.
पेठे साहेबांनी सरोदेकडं पाहिलं. अत्यंत थकलेल्या, पण विलक्षण समाधानी आवाजात ते म्हणाले, "घे बोलून त्यांच्याशी. युनिफॉर्मचे साईझेस बघ. उद्यापासून सुरवात. "

('साप्ताहिक सकाळ' २००२ कथास्पर्धेतील बक्षीसपात्र कथा)