संपती वेगामधे संवत्सरे ही
आणि आशेची बिचारी पाखरेही
मी कवी नाही, मला माहीत आहे
फालतू मी, फालतू अवडंबरे ही
या मनावरती नको भाळूस इतका
ते जसे घेते चरे, देते चरे ही
सोडुनी गेलीस एका भ्याड दिवशी
ठेवुनी येथेच सारी अत्तरे ही?
आज आत्ता या ठिकाणी पाहिली मी!
जिंदगी आहे कुठे? गेली अरे ही!
भेटल्यानंतर तुला, होते मला जे
फुरसतीने सांग त्याची उत्तरेही
एकदा भेटायला जावे स्वतःला...
फारशी नसतील सध्या अंतरे ही
मी म्हणे जाणार आहे, ऐकतो मी
वाटते सारे खरे आणी बरे ही
जेवढे उड्डाण घ्यावे माणसाने
तेवढी उडतात वरती अंबरे ही
भांडणे मिटवून झाली एक सध्या
एरवी कुर्र्यात असती अक्षरे ही
तू कशाला लाजतो आहेस भूषण?
शेवटी माणूस झाली वानरेही