गोंदण...!

ओळखी पुसल्याच नव्हत्या एकमेकांच्या, म्हणूनच,
ओळखी पुसल्या, तरीही शांत दोघे आज आपण ॥

नांव होते परिचयाचे, होत होते बोलणेही
... आज काळाच्या तलावी, त्या तरंगांचे न कंकण ॥

नागमोडी रानवाटा, पाखरे गेली उडोनी,
बांधले नव्हतेच घरट्याला कधी चाहूलतोरण ॥

भरदुपारी येत गेले मेघ काळे, चिंब पाउस-
-अन् उसासे खिन्न, आले त्या मिठीला पोरकेपण ॥

संधिकाली आजही येतात विस्कटले तराणे,
ओळखीचा स्वर, म्हणूनच ऐकतो गंधाळले क्षण ॥

ओळखीचे फक्त आता ओंजळीतिल चांदणे हे,
चंद्र पुनवेचा निसटला, आणि अंधारात अंगण ॥

ओळखी पुसल्यात साऱ्या, हे कधी विसरू नये मी,
म्हणुन आहे अंतरी, त्या विस्मृतीचे एक गोंदण ॥