ते पाखरू दिवाणे

ते पाखरू दिवाणे दिनरात गीत गाते
नेतील पंख तेथे घेऊन सूर जाते

ते एकटेच फिरते, ते बांधते न घरटे
ते गुंतते न कोठे, ते जोडते न नाते

दिसला कधी न त्याच्या चोचीत एक दाणा
बळ आणते कुठोनी,पोटास काय खाते?

कंजूष मेघ सारे देती न थेंब कोणा
प्राशून आसवे ते मग आसवात न्हाते

हातावरी न रेषा,त्याचे ललाट कोरे
होणार काय ह्याचे, चिंतेत ते विधाते

----------------------------------------------------
जयन्ता५२