आदळणारे
कोयता चालवणारे
सुया टोचणारे
बोचणारे
लोचट
चिकटणारे
लिबलिबित
अणुकुचीदार
हल्ला करणारे
पळपुटे
आवाज
असंख्य
अल्ट्रासाउंड
दुतर्फा
उभ्या
आवाज झेलणाऱ्या
--एक लिंबू झेलू बाई, दोन
लिंबू झेलू--
दगडी म्हातार्या
ठेंगण्या,ठुसक्या
अशक्त, बसक्या
लठ्ठ, बेढब ते
पुष्ट, देखण्या
धंदेवाईक
घरेलू ते
कॉर्पोरेट....
समोर लोंबणारे
धूर
मरण कोंबणारे
सलाइनी लावलेल्या
रुग्णवाहिकांप्रमाणे
अनिर्बंध धावणार्या रस्त्यांवर
सांडलेला गंधांचा चिवडा
गंध
कितीतरी
--१२०-३००--
मोटारींचे,
गटारांचे
थांबलेल्या चौकाचौकात
तुंबलेल्या वळवळणावर
मोगर्याचे
हार....
अळ्या-मुंग्या-झुरळं-किडे-माणसं
तुरुतुरू पळताहात
आहेत
वळवळताहेत
चितारताहेत
सगळेच
घुसमटीचं अजस्र कोलाज
जगताहेत इतस्तः
पण
बंदिस्त
ह्या कॉझ्मपॉलिटन कचरापेटीत
हुंगतो आहे या
कचर्यात
एकेक दिवस
महापालिकेने खच्ची केलेल्या
श्वानासारखा....
'हे-जीवन-किती-सुंदर-आहे-कीनै'
छापाचा
बनावटीचा
पावाचा एखादा तुकडा
मिळेलसुद्धा
ह्या कुत्र्याला!
बैरागी