मुद्दाम भुलवणारे रस्ते बरेच होते
दारात सोडणारे चकवे बरेच होते
गावात पाहिली या 'माया' अजब निराळी
एकाच माणसाचे पुतळे बरेच होते
काहीच पेटवाया सांगू नकोस त्यांना
क्रांतीत मागच्या ते जळले बरेच होते
टोपीत पांढऱ्या त्या लपणार ते कितीसे
आपादमस्तकी जे मळले बरेच होते
म्हणता कसे तुम्ही की 'मी पाहिलेच नाही'
डोळ्यासमोर तुमच्या घडले बरेच होते
हातात देश त्यांच्या गेला कसा पुन्हा हा?
वळले न हाय! आम्हा कळले बरेच होते
गझलेत या तसे मी लिहले बरेच थोडे
सांगायचे जरी ते ठरले बरेच होते
---------------------------------------------------------------
जयन्ता५२