ध्यास

घेतात श्वास सारे, घेतात घास सारे
घेतील ध्यास तेव्हा ठरतील खास सारे
 
जगतात कुंपणाला समजून विश्वसीमा
स्वप्नात पोचती पण वामन-पदास सारे
 
चिखलात क्षुद्रतेच्या, गाळात मत्सराच्या
अपुल्या अहंपणाची करती मिजास सारे
 
चिरडून माणसांना भरतात जे तिजोर्‍या
त्या हेमपूजकांचे होवो मिडास सारे
 
नेते अम्ही, भरू द्या आम्हांस गच्च झोळ्या
मागून प्रश्न तुमचे लावू धसास सारे
 
शहरांस तीर्थ्य आणी नाले, गटारगंगा
तीरांवरी तयांच्या वसले प्रभास सारे
 
सारांश मांडताना हसलो विषण्ण 'कोहम्‌'
आयुष्य आजवरचे गमले भकास सारे