सलताच वेदना ती, कविता जुळून आली..
सृजनास वेदनेची महती कळून आली!
तेजाळल्या दिव्याच्या वातीस हे विचारा..
हे अग्निदिव्य करण्या, ती का जळून आली?
हा संपणार नाही रस्ता कधी व्यथेचा..
ती वाट का नव्याने येथे वळून आली?
जो काय कौल आहे, तो दे, 'असा', 'तसाही'..
पाहून वाट आता गात्रे गळून आली!
सोडून सौख्य गेले वाटेत आज अर्ध्या..
कळताच 'एकटा' मी, दुःखे वळून आली!
-- बहर.