बनू चल आपण पुन्हा एकवार अनोळखी दोघे ।ध्रु।
न मी धरतो अपेक्षा तू मनाला चाळवायाची१
नि हुकत्या दृष्टिने माझ्याकडे तूही न पाहावे२
नको मम स्पंदने शब्दांत माझ्या अडखळायाला३
गुपित तव ओढताणीचे न नजरेतून उकलावे४ ।१।
बनू चल आपण पुन्हा ...
तुला काही समस्या अडवते पाऊल उचलाया
नि 'मजसाठी नसे हा थाट' हे मजलाहि जग सांगे५
सवे माझ्याहि चाले भूतकाळातील अपकीर्ती
नि गतरात्रीतल्या त्या सावल्या असती तुझ्यासंगे ।२।
बनू चल आपण पुन्हा ...
बने जी रोग, ओळख, ती बरी विसरून गेलेली
नि जो संबंध ओझे होतसे, तो तोडणेच बरे६
कथानक - ज्यातुनी निष्पन्न काही संभवत नाही
वळण देऊन त्याला छानसे ते सोडणेच बरे ।३।
बनू चल आपण पुन्हा ...
टीपा :
पर्याय :
१.
अपेक्षा तू हृदय गोंजारण्याची मी धरत नाही
अपेक्षा तू मना गोंजारण्याची मी करत नाही
न मी करतो अपेक्षा मन रिझवण्याची तुझ्याकडुनी
न मी धरतो अपेक्षित गुलगुलू गोष्टी तुझ्याकडुनी
२.
चुकवत्या दृष्टिने माझ्याकडे तूही न पाहावे
मजकडेही चुकवत्या तू न नजरेतून पाहावे
मजकडे चोरट्या नजरेतुनी तूही न पाहावे
नि तू हुलकावत्या नजरेतुनी मजला न पाहावे
मजकडे चोरनजरेतून आता तू न पाहावे
निसटत्या दृष्टितूनी मजकडेही तू न पाहावे
३.
नको शब्दांमधे मम स्पंदने ही अडखळायाला
४.
गुपित नजरेतुनी तव धांदलीचे ना उघड व्हावे
न तव तारांबळीचे गुपित नजरेतुन उघड व्हावे
५.
नि 'वैभव हे न मजसाठी असे' मजलाहि जग सांगे
'असे अप्राप्य वैभव हे' असे मजलाहि जग सांगे
६.
नि जो संबंध होई लोढणे, तो तोडणेच बरे
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (लगागागा लगागागा लगागागा लगागागा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...ह्यावेळी ध्रुवपदाचे यमक कडव्यांशी जुळवायची भानगडच नाही