शहर झाले चांदण्याचे

वरी आकाश खाली शहर झाले चांदण्याचे
जणू साडीस काळ्या पदर झाले चांदण्याचे

कुण्या ख्यालात आली चांदण्याची नीज नंतर
कुण्या स्वप्नात जागे नगर झाले चांदण्याचे

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे

कुठे जावे कळेना पौर्णिमेला पौर्णिमेने
पहारे सख्त अष्टौप्रहर झाले चांदण्याचे

कुणाला सहन नाही होत साधी तिरिपसुद्धा
समर्थन फार हल्ली प्रखर झाले चांदण्याचे

कुणासाठी म्हणे ती अमृताची रात्र होती
कुणासाठी हलाहल जहर झाले चांदण्याचे

मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे