नायिका :
कमळा मी कमळा - खुळा गाव सगळा२
एकटेच मज भेटाया - जो तो उतावळा
पाहीन ज्यास तो - भुले सर्वसंगा
बनवीन भुंगा - ऐसी मी कमळा ।ध्रु।
साथीदारः
कमळा ग कमळा - खुळा गाव सगळा
एकटेच तुज भेटाया - जो तो उतावळा
नायिकाः
प्रीतिची न ज्याला - रीती कळाली
त्या न जीवनाची - नीती कळाली
तमा ना जिवाची - निष्ठेत ज्याला
त्याचस्तव असे हा - सौंदर्यमेळा ।१।
नायिकाः
मला पाहुनी जो - न पाही कुणाला
माझ्याच साठी - संपवी स्वतःला
भ्रमराचसाठी त्या - ही मी कमळा१
प्रथमप्रीतिमाला मी - घालीन त्या गळां ।२।
टीपा :
१. नायिकेचे नाव भाषांतरात बदललेले आहे.
२.माझे भाषांतर स्वैर आहे. मूळ गाण्याप्रमाणे हवे असेल तर 'ऐसी मी कमळा' असे म्हणावे.
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (लगागा लगागा - लगागा लगागा अशी पण कित्येक ठिकाणी गागा - लगागा किंवा गालगा- लगागा किंवा लगागा लगागागा असे स्वातंत्र्य घेतले आहे तरी चालीत मध्ये पुष्कळ जागा असल्याने भाषांतर चालीत म्हणताना काही अडचण येत नाही.) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्यावर आधारित भाषांतर आहे ते ओळखा. भाषांतर माझ्या इतर भाषांतरांहून जास्त स्वैर आहे. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...अळा असे जमवा. (नायिकेचे नाव भाषांतरात बदलले आहे तेही ओळखा )