आई मला मार गं

गर्भात तुझ्या मी अंकुरतेय
होईल तुला भार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

चाचणी नंतर कळेल जेंव्हा
मुलगी आहे म्हणून
कूस तुझी चांगली नाही
बाबा म्हणतील कण्हून
ताई झाल्या वेळीचा तू
आठव जरा थरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

टिटवी ओरडेल कुत्री रडतील
सारे होईल अमंगल
चाहूल माझी घेवून येईल
नैराश्याचं जंगल
मला नाही व्हायचं कधी
अनाहूत नार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

लग्नानंतर बदलतय नाव
गोत्र अन कुल्दैवत
हरवून जातोय आपला सूर
लावू कसा धैवत ?
अपेक्षा अन वास्तव यात
खूप खूप दरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

अन इनव्हायटेड चालेल कदाचित
पण अन वांटेड नसावं
मी तर आई दोन्ही आहे
जगात कोठे बसावं ?
तुझ्या सारखा नकोय मला
अंधारशी करार गं
लिंग निदान चाचणी अधीच
आई मला मार गं

मला नाही मरायचय
नणंद दीरा कडून
मरण नकोय मला कधी
सासू सासऱ्या कडून
जळून मेल्या नंतर तुझ्या
डोळ्याला लागेल धार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

फ्रीझ, पंखा, टीव्ही, स्त्री
हेच जगाचं माप गं
आदिमाया, आदिशक्ती
लोणकढी थाप गं
या जगातून जन्मा पूर्वीच
होऊ दे फरार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

दूर दिसतोय आशा किरण
मंद स्मीत ओठी
वेळ खूपय कदाचित
तुझ्या पणतीच्या पोटी
बिजली म्हणून जन्मेन मी
करण्याला प्रहार गं
लिंग निदान चाचणी आधीच
आई मला मार गं

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा