राजा रायगड...

३ जुनच्या संध्याकाळीच लोणावळ्यामध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या सरी धुंद करत होत्या, तरीही मनाला वेध लागले होते उद्याच्या रायगड ट्रेकचे. रायगड हा शब्दच शिवरायांची..   जाणत्या राजाची आठवण मनात उत्तेजित करत जातो.., ६ जून शिवराज्याभिषेक दिन,   या पवित्र दिनासाठी रायगडावर जायचे भाग्य लाभते आहे, हेच आमचे नशिब होते. आणि माझे मन भरकटले होते त्यावेळेसच्या दिमाखदार सोहळ्याच्या स्वप्नांमध्ये. त्या वेळीही अशाच सरी कोसळत असतील...     अखंड आसमंत शिवाराज्याभिषेक करण्यास उत्सुक असेन..   राज्यातील प्रत्येक माणुस राज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची अशीच वाट पाहत असेन..   असेच अधीर मन त्यांचे ही झालेले असेन. असा विचार करता करता पुण्यात पोहचलो.   रात्रीचे २ वाजले होते. गार वारा अंगाला स्पर्षून जात होता...        

सकाळी ८. ३० ला संग्राम, कौस्तुभ आणि विनोद घराजवळ आले, आणि आमच्या अनोख्या प्रवासास सुरवात झाली. मुंबई- बँगलोर हायवे ने पुढे जावून भोर च्या पुढून आम्ही वरांदा घाटात प्रवेश करणार होतो... वाटेतील ओढे.. झरे खळाळत होते.. हलकासा पाऊस मनाला आनंद देवून जात होता. वसुंधरा हिरवा शालू परिधान करून जणू रायगडावरील राज्याभिषेक दिनाची तयारीच करत होती. वसुंधरेची गडबड, आणि अवखळ वार्याची सळसळ वातावरण मोहवून टाकत होती..   आणि त्यातच विनोद या नावाला सार्थ ठरवित साध्या बोलण्यातून ही, विनोद निर्माण करत बोलणारा आमचा विनोद उन्मादक होत होता.   त्याचा पहिलाच रायगड ट्रेक आणि पावसाची मस्त साथ यामुळे आमच्यावर ही विनोद खुपच प्रसन्न असल्याने बर्याचदा आमची पंचाईत  होत होती. कौस्तुभ ला कदाचीत कवितांमुळे पंचाईत होईल का काय असे वाटत असताना, हे नवीन वारे वेगळेच भासत होते..   संग्राम आमचा सारथी असल्या कारणाने त्याला मान देत होतो( द्यायलाच पाहिजे..     न देवून चालणारे नव्हतेच), त्याच्या प्रोफाईल फोटोच्या मागणीसाठी १७६० लोकेशन शोधण्याचे आणि नंतर कॅमेराचा किलकिलाट करण्याचे अवघड काम आमच्याकडे होते.

वरांदा चा दर्याखोऱ्यांचा प्रदेश खुपच सुंदर भासत होता.. हलकाच धबधबा लक्ष वेधून घेत होता.. मेघांची स्वछंदी पाखरण सगळीकडे होत होती.. धरणांचे बॅक वॉटर.. वाटेत लागणार्या सुंदर नद्या.. हिरवी लीपी उमटलेली झाडे आणि या सर्वांमधून जाणारे आम्ही आणि त्यातच पावसाच्या सरी कोसळू लागल्या.. संगित म्हणजे काय हे पावसाच्या आवाजावरून नविनच कळत होते. आणि त्या तालावर मन मोर होउन थुईथुई नाचायचेच बाकी होते. सभोवतालच्या मेघांचे.. दाटलेल्या आभाळाचे.. रस्त्यावरील बंजारांचे.. धनगरांच्या मेढरांचे चित्र मनात कोरले जात होते. आणि हे चित्र संग्रही राहण्यासाठी गाडीतुनच किलकिलाट सुरू होता.

काही चालत्या गाडीतून पावसाच्या लपाछपीमधून काढलेले फोटो

आणि याचबरोबर, सोबत सारथीने आणलेल्या गोड मराठमोळ्या गाण्यांचा ही आस्वाद घेत आम्ही पाचड ला पोहचलो.. जिजामाता यांच्या समाधीचा... या थोर मातेच्या तेजस्वी रुपाचा स्पर्ष मनात सामावून आम्ही त्यां राहत असलेल्या वाड्यात प्रवेश केला. काहीच माहित नसताना ही.. येथे महल असेन.. त्या पुढे दरबारातील व्यक्तींना भेटण्याची जागा असेन.. असे एक ना अनेक चित्र आम्ही जिवंत करत चाललो होतो.. अजुनही आंघोळीसाठी असणारा बारव वजा टाके आणि त्याचा प्रवेश पाहून छान वाटले. वाड्याने अनुभवलेले सोनेरी दिवस उगाचच मनात रुंझी घालत असताना आम्ही बाहेर आलो.

जिजामाता 

पावसाच्या सरीमध्ये चिंब होउन आम्ही रायगडाकडे आलो. रायगडाचे देखणे रुप पाहून खुपच छान वाटत होते. गडाखालीच पोटपुजा करून आणि सिंधुदुर्गच्या छायेत वाढलेल्या भाईंना आणि सम्राट यांना भेटून आम्ही चित्त दरवाजाजवळ आलो. पायऱ्यांमुळे थकवा जाणवत होता. तरीही कौस्तुभ ने सुरुवातील दाखवलेले सौजन्य (बॅग आपल्याकडे घेतल्याचे) छान वाटले. पावसाबरोबरच विनोद ला झेलत आम्ही पायऱ्या चढू लागलो. संध्याकाळचे ५ वाजून गेले होते. काळ्याभोर ढगांच्यामधून हळुवार येवू पाहणारी सूर्य किरणे, आजुबाजुला उगाचच स्पर्ष करून दूरवर जाणारे पांढरे शुभ्र ढग, आणि या ढगांच्या दुलईमधून वरवर जाणारी एक अनामिक हुरहुर जागवणारी वाट यातच जणू गवताची इवलीशी पाती वार्ऱ्याशी गाणे गात होती. राजा रायगडाची नटलेली कांती आनंदाने अलिंगण द्यायला आतुर झालेली होती आणि अश्यातच आनंदाच्या चिंब धबधब्यात आम्ही न्हावून घेतले...

राजा रायगड

एका डोंगराला वळसा घालून आता अर्धावाटेवर आलो होतो, आणि समोर महादरवाजा दिसला, अतिशय भक्कम तटबंदी मधून बुरुजासारखा भासणारा पण त्यामधून गडावर जाणारी एकुलती एक वाट अतिशय खुबीने काढलेली होती.

महादरवाजा

आता महादरवाजामध्न वरती आलो, मी केलेले लिंबू सरबत पियून आम्ही ताजेतवाने होउन मस्त नजारे पाहत पुढे चालू लागलो. रायगड.. त्याची भव्यता डोळ्यात साठवत होतो. फोटोंचा किलकिलाट पावसाच्या सरी येवून गेल्याकी पुन्हा होत होताच.. पावसाच्या सरी येवून गेल्या तरी विनोदाचे तोंड काही केल्या गप्प होतच नव्हते, अगदी फोटो काढताना ही त्याची बडबड चालुच होती.. पहिल्यांदाच भेटलेलो आमेहे पण छान मैत्री झाली एकदम.

कातरवेळचे काही फोटो

आता वरती येवून mtdc च्या रुम मध्ये मस्त फ्रेश झालो.. तसा बेत रात्री रायगड फिरण्याचा होता.. रात्रीच्या गच्च पहाऱ्यातील गड पाहणे म्हणजे एक वेगळेच दिव्य असते, पण दाट धुक्यामुळे प्लॅन कॅन्सल करून आम्ही मस्त गप्पा टप्पा मारून, सरळ जेवणाकडे धाव घेतली..

जेवणानंतर राणीवसा ला भेट देण्याची कौस्तुभ ची मागणी फाट्यावर मारून आम्ही बोलत असतानाच, आमचे स्नेही आणि शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष श्री इंद्रजित सांवत आम्हाला भेटले.. पुढचा एक तास इतिहास... शिवराय.. रायगड आणि शिवरायांचे किल्ले या अत्यंत उपयुक्त माहितीमध्ये कधी गेला ते कळलेच नाही...

आणि शेवटी रायगडाच्या पेमळ कुशित शिरून आम्ही झोपू गेलो.

दुसर्या दिवशी सकाळी स्वच्छ संदुर वातावरणाने आमचे स्वागत केले.
आमच्याबरोबर ३६ वेळा रायगड वारी केलेला कौस्तुभ असल्या कारणाने प्रत्येक लहान मोठ्या अवशेषांची मस्त माहिती घेत आम्ही पुढे चालू लागलो.. राज्याभिषेकदिनाची तयारी जोरात चाललेली होती.. भेतणारी माणसे शिवरायांच्या सोहळ्यात गुंग झालेली दिसत होती.

रायगडावरील काही फोटो

मेघडंबरी मधिल शिवरायांचा पुतळा

सगळीकडची माहिती मनात साठवत.. बोलत रायगडाचे उत्तुंग रुप पाहण्यात आमेहे दंग झालो होतो. आणि आम्ही प्रवेश केला पवित्र अश्या होळी माळावर.. संग्रामच्या म्हणण्या नुसार होळीमाळावरून दिसणार्या बाजारपेठेचे आणि पुतळ्याच्या मागच्या साईड ने काढलेले फोटो अजून पाहिलेले नसल्याने तसे फोटो लगेच काढण्यात आले.   शिवरायांना मनात साठवलेले असल्याने रायगडाचे फोटो कॅमेरात साठवावे लागत होते.

होळी माळ

होळीमाळावरून दिसणारे जगदिश्वराचे मंदिर.

शिवाजी राजे..

आता आम्ही सरळ बाजारपेठेकडे न जाता खोल खाली असलेल्या वाघ्या दरवाजाकडे जाउन येण्याचा निर्णय घेतला.. साधारणता ३० मिनिटे खोल चालत जातानाचा अनुभव खरेच खुप छान होता.. रायगडाचे अनोखे दर्शन तर तेथून होतेच.. पण जाता जाता सांभाजी महाराजांनी बांधलेला कुशःवार्ता तलाव.. कवी कलश यांचा वाडा ( संभाजी राजें बरोबर या थोर माणसाला ही औरंगजेबाने तसेच धर्ममरण दिले होते) यांना पाहून या थोर.. एकही लढाई न हारलेल्या तेजस्वी राजपुत्राची आठवण येतेच.

पुढे जावून वाघ दरवाजा लागतो.. या किल्ल्यावरील एक अनोखी वाट.. येथून पुढे घसरनीत जावून पुढे खोल दरी आहे.. येथून खाली जाता येत नाही.. राजाराम महाराज येथुनच दोर टाकून निसटून गेले होते. संपुर्ण रायगड हा अतिशय कुशलतेने बांधलेला आहे.. कोठुनही आक्रमण करणे वा उतरणे खुप अवघड आहे. अश्यातीलच अत्यंत बिकट असलेल्या दरीपाशी फक्त मी आणि संग्राम उतरलो. फक्त एक झराच तेव्हडा दरीवरून स्वछंद पणे बागडत खाली जात होता.. त्याला ना कसली भीती होती ना कसले बांध.. आम्ही मात्र पहिल्यांदाच येथे आल्याने हरकून गेलो होतो..

कुश:वार्ता तलाव

वाघ दरवाजा आणि परिसर

मी :

आणि पुन्हा मग अश्या खडतर वाटेने आम्ही माघारी निघालो.. पुन्हा होळीच्या माळावर आल्यावर मस्त ताक प्यालो.

ताक विकणारी मुलगी:   

शेवटी शिवरायांच्या पवित्र समाधीपुढे नतमस्तक होउन आमेहे परतीच्या मार्गाला लागलो.. रायगड सोडून पुन्हा माघारी जावुच नये अशी इच्छा मनात होती.. पण रोजच्याच जीवनातील संघर्ष अटळ असल्याने पुन्हा माघारी फिरणे आलेच.. पुन्हा माघारी येताना रायगड स्थित असणारे श्री नामदेव आम्हाला भेटले  ( जे नामवंत गाईड आहेत अआनी फक्त १८ मिनिटात रायगड चढण्याचा पराक्रम केल्याबद्दल त्यांना छत्रपती संभाजीराजे (कोल्हापुर) आणि श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून पारितोषिक मिळाले आहे. ) त्यांनी आम्हाला त्यांच्या शैलीत शिवरायांचा इतिहास वर्णन करून अक्षरसा अंगावर शहारे उभे केले. कवी भुषण यांनी दरबारात येवून शिवरायांप्रती म्हणलेली 'इंद्रजीवी जांभ पर' ही कविता तर अक्षरसा त्यांनी जीव ओतून म्हणून दाखवली.. आणि औरंगजेबाचे शिवरायांप्रतिचे पुर्ण संभाषण त्यांनी ऐकवले ( ह्या चित्रफित नंतर अपलोड करतो). शेवटी जाताना आमच्या मनात एकच होते.. धन्य ते शिवराय.. धन्य रायगड.. आणि धन्य धन्य असे हे शिवभक्त.

शिवरायांची पवित्र समाधी.

----------

जातानाचा रायगड..

इंग्रजांनी ज्या डोंगरावरून तोफेचा हल्ला रायगडावर केला तो डोंगर

खालील शिवभक्तांची घरे, पांढरे घर आम्हाला नंतर भेटलेल्या शिवभक्त नामदेव यांचे आहे. पुन्हा आमचा एक मैत्रीपुर्ण थांबा बनणारे हे घर.

            जय शिवाजी.. जय भवानी
            जय जिजाऊं.. जय संभाजी
 
- शब्दमेघ _एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन

(नोट : फोटो कुठलेही एडिटींग न करता दिलेले आहेत, हौशी फोटोग्राफर आणि लेखन इतरत्र प्राकाशित)