भाग १
निस्तब्ध काळ आहे - निःशब्द सर्व तारे
निश्चिंत जग असुनही - अस्वस्थ मानस करे
चाहूल त्यात काही - मज लागलीय ऐशी
ऐकू मनास येई - जणु चालणे कुणाचे
वा आस धरुन चाले - स्पंदन मम हृदयाचे
येईल ... येईल ... येईल ...
येइल तो येणारा
येईल ... येईल ... येईल ... ।ध्रु।
भाग २
ज्योतीविना कळेना - जळती पतंग कैसे
धन्वी नसून कोणी - सुटतात बाण कैसे१
आधार ना, न आशा - किति तळमळावयाचे
हे सांगती परि मला - संकेत मन्मनाचे२ ।१।
येईल ... येईल ... येईल ....
पथहीन आज यौवन - स्थैर्यास शोधताहे३
नाविक नसून नौका - तीरास शोधताहे
नौका कधी मनाची - न कळे तटास पोचे४
हे सांगती परि मला - संकेत मन्मनाचे ।२।
येईल ... येईल ... येईल ....
पर्यायः
१. कुणि नेमबाज नसुनी - सुटतात बाण कैसे
२. परि सांगतात मज हे - संकेत मन्मनाचे
३. तारुण्य भरकटूनी - स्थैर्यास शोधताहे
४. न कळे कधी मनाची - तीरास नाव पोचे
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (गागालगालगागा - गागालगालगागा )(वृत्तः आनंदकंद)(मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... हा हा यावेळी ध्रुवपदाचे यमक बाकी गाण्याशी जमवण्याची भानगडच नाही!