ह्यासोबत
एकत्र राहणाऱ्या, एकत्र शिकणाऱ्या पण दोन विरुद्ध दिशेने प्रवासमान असणाऱ्या रोर्क आणि पीटरची भेट पीटरच्या घरी होते. तिथे पीटर आणि त्याची आई रोर्कला सहानुभूती दाखवायचा विफल प्रयत्न करतात.
पीटरच्या आईने पीटरला समाजात प्रतिष्ठा मिळावी, त्याला समाजाने आपल्यात सामावून घ्यावं ह्यासाठी कष्ट काढून जीवाचा आटापिटा केलेला असतो. तिच्या मते पीटर हा स्टँटनमधला सर्वोत्कृष्ठ स्थापत्यविशारद आहे, आणि त्याने नाव कमवावं ह्यासाठी तिचा सतत त्याच्यावर दबाव असतो. खरं तर पीटरला स्थापत्यशास्त्राबद्दल फारसं प्रेम नसतं, त्याला मनातून व्हायचं असतं चित्रकार. पण आईच्या अपेक्षांचा भंग करणं त्याला जमत नाही. शिवाय चित्रकलेत त्याला फारशी गती नसते हेही एक कारण आहेच त्याने स्थापत्यशास्त्राकडे मोर्चा वळवायला. असा अगदीच पाठीचा कणा नसलेला पीटर आणि त्याचा उरला सुरला स्वाभिमान चिरडण्यात (अनावधानाने) धन्य मानणारी त्याची आई रोर्कला त्याने निवडलेल्या मार्गातील धोके समजावून देण्याचा प्रयत्न करतात. रोर्कने जर समाजाकडे पाठ फिरवली तर त्याला आधार द्यायला कोण उभं राहणार असा प्रश्न त्यांना असतो. माणूस हा बेटासारखा राहू शकत नाही इतरांपासून अलिप्त हे त्यांचं म्हणणं रोर्कने स्वीकारावं, त्यांच्यासारखं समाजात मिळून मिसळून वागावं जेणेकरून आपलं ईप्सित साध्य करता येईल, समाजात प्रतिष्ठा आणि पैसा मिळवता येईल असं ते त्याला समजावतात.
पण रोर्कला समाजाची स्वतःच्या आयुष्याच्या मूलभूत गरजा भागवण्यापलिकडे गरजच नाहीये. अन्न वस्त्र आणि निवारा ह्याखेरीज समाजाशी त्याला काहीही देणं घेणं नाहीये. ह्याचा अर्थ तो माणूसघाणा आहे, त्याला इतरांशी जुळवून घेता येत नाही, इतरांना तो कवडीमोल मानून स्वतःचंच तुणतुणं वाजवत असतो अशी त्याच्या आजूबाजूच्यांची समजूत आहे. पण रोर्कला स्वतःच्या सर्जनशीलतेची गळेचेपी करणारी, परंपरेच्या बेगड्या चौकटीत बांधणारी पदवी आणि त्याबरोबर येणारी सामाजिक प्रतिष्ठा नको असते. त्याला स्वतःच्या क्षमतेची आणि कर्तृत्वाची जाणीव होण्यासाठी समाजाच्या मापदंडाची गरज नसते.
मायलेकांनी खूप समजावूनही रोर्क स्वतःच्या विचारांशी, तत्वांशी आणि मूल्यांशी एकनिष्ठ असतो. तो त्यांचा सल्ला सविनय परत करतो आणि पुढील आयुष्याची वाट न्यूयॉर्क मध्ये चालण्याचा मनसुबा बोलावून दाखवतो. पीटर त्याला "मी तुझ्यासाठी काम पाहेन" असं आश्वासन देतो, तेव्हा रोर्क केवळ हसतो...
पीटरलाही फ्रँकन फर्म मध्ये न्यूयॉर्कलाच जायचं असतं. परत एकदा एकाच वाटेवर (न्यूयॉर्कच्या) दोन विभिन्न व्यक्तीमत्वांचा प्रवास सुरू होतो.....
न्यूयॉर्कमध्ये गेल्यावर पीटरची "यशस्वी" वाटचाल लगेच सुरू होते. आपल्या "जनसंपर्काने" तो कार्यालयातील महत्त्वाची कामं स्वतःला कशी मिळतील, त्यातून आपल्या बॉसची मर्जी कशी लवकरात लवकर संपादन करता येईल ह्या विवंचनेत पडतो.
इथे रोर्क पदवीशिवाय न्यूयॉर्क मध्ये येऊन पोहोचतो, पण त्याला उपजीविकेसाठी कोणत्या तरी स्थापत्यविशारदांच्या किडुकमिडुक कामं करणाऱ्या कार्यालयात काम करणं त्याला मान्य नसतं. पीटर त्याला वारंवार बजावतो की उच्च मूल्य आणि तत्त्वांनी पोटाची खळगी भरत नाही, मग समाजात पैसा आणि प्रतिष्ठा मिळणं तर दूरच. अर्थात, रोर्क त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करतो.
रोर्क हेन्ऱी कॅमेरॉन नावाच्या एका स्थापत्यविशारदाकडे जातो आणि काम मागतो. हेन्ऱी हा एक समाजाच्या, स्थापत्यविशारदांच्या दृष्टीने बंडखोर असा तंत्रज्ञ आहे. त्यातील क्षमतेची समाजाला ओळख पटलेली नाही, एके काळी अत्यंत आश्वासनपूर्ण असणारी हेन्ऱीची कारकीर्द आता पूर्णपणे ढासळली आहे, ह्याचं कारण त्याने स्वतःच्या तत्त्वांशी बेईमानी करून गल्लाभरू धंदा करायला दिलेला नकार. समाजाच्या बंधनकारक आणि जाचक रूढींना विटलेल्या हेन्ऱीची समाजाशी लढा द्यायची ताकद खच्ची झालीय. आणि रोर्कचं काम, त्याची रेखाटनं पाहून तो परत अचंबित होतो. आपल्यासारखाच रोर्कपण स्वतंत्र विचारांचा, व्यक्तीवादी आणि नाविन्यवादी आहे हे तो ओळखतो. पण त्याचबरोबर रोर्कला आपल्यासारखं आयुष्यात निराश, हतबल आणि अयशस्वी व्हावं लागू नये ह्यासाठी तो रोर्कला परावृत्त करायचा प्रयत्न करतो.
शेवटी समाजाचा नरभक्षक राक्षस तुझ्यातील माणसाला खाऊन केवळ शरीर बाकी ठेवेल, तुझ्या माझ्या सारख्यांना ह्या समाजात स्थान नाही, तुझ्या कलेचा, क्षमतेचा, ताकदीचा वापर माझ्यासारखा आयुष्यभर लढण्यासाठी करून शेवटी हारच आहे नशीबी. तेव्हा आताच ह्या वाटेवर न चालण्याचा "शहाणपणाचा" निर्णय घे असं तो रोर्कला समजावतो.
पण रोर्कला समाजाची, त्याच्या मापदंडांची आणि मानापमानाची फिकीरच नाहीये. त्याला त्याचं काम करायला मिळावं, आणि त्यात कोणी ढवळाढवळ करू नये, त्याला सर्जनाचं पूर्ण स्वातंत्र्य मिळावं एवढीच माफक अपेक्षा आहे त्याची. आणि त्यासाठी त्याची कोणत्याही आव्हानाला जायची, ते आव्हान पेलायची आणि परतून लावायची जिद्द आहे.
क्रमशः.....