चांदणं
वाजला वाटतं ठोका पाचाचा....... ऊठा मॅडम !! सुप्रभात !! आणखी एक नवा कोरा दिवस उगवतो. सकाळ नेहमीसारखीच प्रसन्न ! पण त्याचं कौतुक करायला वेळ आहे कुणाकडे...... सकाळी उठून उगवतीच्या सूर्याचं फ़क्त अस्तित्व जाणवतं. बाल्कनीत बसून वाफ़ाळलेला चहा घेत घेत समुद्रातून उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन किती छान असेल ना..... ! कधी फ़ुरसत होणार आहे आपल्याला, तो ऊपरवालाच जाणे. विचारांची मरगळ झटकून माझी कामाला सुरवात. मुलांचं आणि नवऱ्याचं आवरुन त्यांना शाळेत आणि ऑफ़ीसला पाठवायचंय...... हं..... सकाळची साखरझोप बहुतेक एक स्वप्नच राहणार !!
सगळी लोकं गेल्यावर मन घराचं बाळंतपण, स्वैपाक, धुणी-भांडी, व्हॅक्युम उरकायचं. जरा हुश्श म्हणत टिव्हीवरच्या मालिकांमधे डोकावणं होतंय न् होतंय तोच बेलच्या कर्कश्श आवाजाने त्या ड्रीम सिक्वेंसमधून वर्तमानात लगेच वापसी..... !
छोट्याचं शाळेतून पुनरागमन झालेलं. त्याच्या कलाकलानी त्याचं जेवण वगैरे आटपेपर्यन्त लेकीची यायची वेळ होते. तिचं हो, नको होईस्तोवर इकडची स्वारी हजर. मग जेवण आणि 'त्यांची' झोप. तोपर्यंत दोन्ही बालकांचे होमवर्क अन् जी काय असतील ती प्रोजेक्ट्स आणि परीक्षेची तयारी..... संध्याकाळ कशी उतरते इतक्या लवकर .... !
इकडची स्वारी मात्र झोप घेऊन ताजीतवानी. एकीकडे रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु असते आणि डोळे अन् थकलेलं शरीर वाट बघत असतं रात्रीच्या शांत झोपेची.
जेवणं आटोपली की मुलांची किंवा नवऱ्याची फरमाईश,'ए, अब बढियासा मिल्कशेक हो जाए ...... ' आणि हे सगळं इतकं आतून म्हटलेलं असतं ना की लगेच उत्साहानं हात फळं कापायला घेतात. डोळ्यावर चढू पाहणाऱ्या झोपेला पण निग्रहाने ताटकळत ठेवायला लागतं. सगळ्यांचं मनसोक्त पेयपान झालं की त्यांचा गप्पांचा मूड येतो. ' ए आई, ये ना गं लवकर, तू असलीस की मज्जा येते गप्पा मारायला ! ' आता हे असले शब्द ऐकले की आई दुसरं काय करणार.....! मग काय ........ सगळा ऍक्शन पॅक्ड ड्रामा !! पिल्लांना पण दिवसभराचं सगळं सांगायचं असतं आणि ह्यांना पण बॉस आणि कलीगचे किस्से सुनवायचे असतात. त्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावरचा उत्साह इतका ऊतू जात असतो ना की माझी मरगळ कुठल्या कुठे पळून जाते. निद्रादेवी पण मंद मंद हसत असते, अजून तुझी वेळ व्हायचीये गं......!
खरंच, कधी कधी वाटतं, आपण हे जे दिवसभर नर्तन करतो, ते एग्झॅक्टली काय असतं...... आपलं कर्तव्य, आपलं मुलं आणि नवऱ्यावरचं प्रेम की त्या वेळची गरज ? जर एखादा दिवस आपल्यानी हे काहीच झालं नाही तर....... जग थांबेल की काय ? हॅ, उगाच स्वतःला इतकं महत्व द्यायला नको हं.
घेऊन बघूया का सुट्टी यातून एखादा दिवस........!!
सुट्टी म्हटल्याबरोबर समोर धडाधड पुढचे प्रोग्रॅम दिसायला लागले. दिवाळी तोंडावर आलेली.....फराळाची सगळ्यांची आपापल्या परीनं लाडीक डिमांड आलेली...... सुट्टीचा प्लॅन दिवाळीनंतरच ठीक राहील. बॅक टू वर्क मॅडम........ !!
'अगं, आज नीलूचं मेल आलंय, ते सगळे जण या ख्रिसमसच्या सुट्ट्यांमधे इकडे यायचं म्हणताहेत.' 'अय्या, कित्ती छान ! चांगले १५-२० दिवस वेळ काढून या म्हणावं.' माझ्याही नकळत माझे शब्द उमटतात. नवरा एकदम खुष ! 'ए, काय करायचं गं.......तू ना, सगळ्या दिवसांचं मस्त प्लॅनिंग करुन ठेव. यू नो, यू आर द बेस्ट ऑर्गनायझर.' झालं, आमचं विमान लगेच हवेत तरंगायला लागलेलं....!! नवीन वर्षाचं आगमन आणि जुन्या वर्षाला टाटा, बाय बाय करायची जबरदस्त तयारी...... न करुन चालेल कसं..... अब तो इज्जत का सवाल है ना......! धडाक्यात नणंदेचं माहेरपण होतं. जानेवारी मधे हँगओव्हर असतोच. नवऱ्याचं आणि मुलांचं कौतुक पण असतंच सोबतीला. "लेकिन मेरी छुट्टीका क्या होगा.....?" ह्या सोप्या पण कठीण प्रश्नाचं ऊत्तर, ब्रेक के बाद, कमिंग अप नेक्स्ट, कीप वेटींग....... अशा संयमी वाक्यांवर तरंगत असतं.
फेब्रुवारी उजाडतो. दिवसागणिक धावपळ सुरु असतेच. अचानक एका रम्य, खरं तर रम्य म्हणजे काय....... हेच मी विसरलेली!! तर अशा एका सकाळी, एक छोटंसं पार्सल येतं, चक्क माझ्या नावावर ! किंचित आश्चर्याने ते उघडल्यावर एक जबरदस्त पण सुखद धक्का.... !! एका सुंदरशा गुलाबी लेटरहेडवर इकडच्या स्वारीचं व्हॅलेंटाईन इन्व्हीटेशन !! माय गॉड !! विश्वासच बसेना क्षणभर.... अचानक टीन एजर झाल्यासारखं वाटलं.
आज १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे !! 'शॅ....... हे काही आपल्यासाठी नसतं हं.' 'पण कां नको ?' सगळी प्रश्नोत्तरं मनात जुगलबंदी खेळत होती. तेवढ्यात फोन नाजुक किणकिणला ...... फोनचा कर्कश्श आवाज पण अचानक नाजुक बनला होता. मी पण जेवढा मृदु म्हणतात ना, तेवढ्या कोमल आवाजात बोलले,' हॅलो.....!!'
'ए जानू, मग काय....... होणार ना माझी व्हॅलेंटाईन आज ?'
'तुम्ही म्हणजे ना.......!'
'ए, सांग ना गं !'
इकडे माझा जीव वरखाली व्हायला लागला. लाजत लाजत होकार कधी दिला कळलंच नाही. व्हॉट्स धिस ? हे काय होतं आपल्याला? ह्या सगळ्या भावना पण आहेत अजून तशाच आपल्यात...... ! स्वतःचं हे नवीनपण फारच अनोखं पण हवंहवंसं वाटलं.
आज मुलांसाठी काहीतरी मस्त बेत करते म्हणजे संध्याकाळी आपण गेल्यावर काही प्रॉब्लेम नको...... असं म्हणत किचनमधे शिरणार तेवढ्यात पुन्हा फोन किणकिणला...... रिअली सरप्राईजिंग हं ! आईचा होता.
'अगं, बरेच दिवसात मुलं आली नाहीत, आज त्यांच्या आवडीची पावभाजी केलीये. शाळेतून परस्पर इकडेच पाठवून दे त्यांना.'
आश्चर्यानी आणि आनंदानी आवंढा गिळत तिला होकार दिला.
आज सगळंच कसं जुळून येतंय ? म्हणजे...... आजचा सगळा वेळ फक्त स्वतःसाठी...... ! कान्ट बिलिव्ह धिस !! मग मस्तपैकी खूप वेळ शॉवरखाली आंघोळ केली. ह्यांच्या आवडीची साडी, परफ्युम..... वेगळीच धुंदी होती हं काही ! चेहेऱ्यावर लिपस्टीक लावताना जाणवलं, आपण बऱ्यापैकी मेन्टेन केलंय स्वतःला...... ! स्वतःवरच खुष होत एक गिरकी घेतली. ओठावर गाणं रेंगाळत होतं,'धीरे धीरे मचल, ए दिले बेकरार........ !!!
अचानक घड्याळाने ४ चे टोले दिले. म्हणजे....... मुलं गेलीतसुद्धा आजीकडे ? मनातल्या मनात मी आईला १०० पैकी १०० मार्क्स दिलेत. ह्यांची यायची वेळ झाली बहुतेक. बेल वाजल्यावर पावलं आज थबकली. आरशात एक नजर टाकून धडधडत्या छातीनं दार उघडलं. हातात एक सुंदरसं गुलाबाचं फूल घेऊन स्वारी एकदम रोमॅन्टिक दिसत होती. एक पार्सल पण हातात. मग अचानक गुडघे टेकून फिल्मी स्टाईलमधे म्हणाले,
'से येस हनी....... !'
'अय्या, हे काय नवीनच ? '
आनंद, लज्जा, आश्चर्य सगळं एकदमच प्रकटलं.
'हे माझ्या व्हॅलेन्टाईनसाठी....... उघड तर खरं.......'
थरथरत्या हाताने उघडलं तर त्यात एक क्युटसा टेडी बेअर आणि माझ्या आवडीची चॉकलेट्स. आई गं...... डोळ्यात पाणीच आलं एकदम.
'ए जानू, अगं असं काय करतेस....... हे गिफ्ट काय रडायसाठी दिलंय ?'
असं म्हणून ह्यांनी मला जवळ घेतल्यावर मात्र माझा बांध कोसळला. ह्यांनी पण मला पोटभर रडू दिलं आणि म्हणाले,
'तुझं रडू छानच होतं हं, आता असंच गोड हसून दाखव बघू.'
त्या शब्दातलं प्रेम, डोळ्यातली आपुलकी आणि स्पर्शातली जादू....... यापुढे मी माझं 'मी पण', माझी तडतड, माझी सुट्टी...... सगळं सगळं विसरले.
रात्री मुलं घरी आल्यावर जेव्हा एकत्र हसणं खिदळणं सुरु झालं ना, तेव्हा जाणवलं की मला सुट्टी नकोच मुळी. हिच माझी सुट्टी, हाच माझा स्वर्ग !!
कुठूनतरी सूर ऐकू येत होते,'घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे...... !!'