माझे जग

'ड्रिम्स् कम वुईथ रिस्पॉन्सीबिलीटीज', स्वप्ने जबाबदाऱ्या घेऊन येतात. कधी ध्येयासाठी, कधी महत्वाकांक्षेसाठी तर कधी नाइलाजाने माणसे जगभर फिरतात. परदेशात रहाणारी माणसे म्हणजे दूर राहून एकेकट्याने मजा मारणारी, असा कधी कधी समज दिसून येतो. पण या दूर रहाणाऱ्यांना त्यांचे अनेक प्रश्नही बऱ्याचवेळा एकट्यानेच सोडवावे लागतात. नाही म्हणायला कधी कधी सोबत असते एकाकीपणाची, हुरहुरलेपणाची.


   ही कविता अर्पण आहे त्या प्रत्येकाला, ध्येयासाठी जगभर फिरणाऱ्याला आणि कधी तरी एकांतात, खोल मनात घरासाठी झुरणाऱ्याला!


 


माझे जग-


पैसाअडका, मान-मरातब


खूप झाली उरस्फोड


आईच्या एका स्पर्शासाठी


मग लागली घरची ओढ 



कधी मन भरुन येते


कधी येतात खूप उमाळे


दूर असूनसुद्धा दिसतात


दारामधले चार डोळे


दारापासून फाटकापर्यंत


आई घालते येरझारे


याच एका सुखासाठी


पार करीन चौऱ्याऐंशी फेरे



मोजकेच बोलणे वडिलांचे


पण शब्दांमध्ये असते खोली


आई एक वेळ रडू शकते


वडिलांची फक्त दृष्टी ओली


अंगणामध्ये बोलताना


तासामागून तास सरले


तुळशीच्या गंधाने तेव्हा


मनाचे गाभारे भरले



तगमग माझ्या मनाची


कुठल्या कुठे पळाली


हुरहूर माझ्या मनातली


कापरासारखी जळाली


सार जग हिंडून फिरुन


शेवटी जेव्हा घर गाठले


काय सांगू मित्रांनो


तेथेच सारे जग भेटले !


                              -अभिजित पापळकर