सहज हसत आली पौर्णिमा लोभवाया
कुसुमबहर तेंव्हा लागले मोहराया
वदन सुमन रंगे लाल रंगात त्याला
मधुरसमय गीते लागले ऐकवाया
दिवससमय जाई भेटण्या सावलीला
क्षितिज गडद होई पूरिया आळवाया
निलयन जलदांचे होतसे शांत काळे
स्वर-कलरव जाता शांततेला मिळाया
यमन मग म्हणाला भूप छायानटाला
बघ जयजयवंती येतसे जोजवाया
नयन न मिटणारे जागवी मालकंसी
करतलपखवाजी हे अहा वाजवाया
कनकरजतरंगी धुंद ही रात रंगे
मणिमयखच सारा हा पदी अंथराया
विहरत जग सारे हंस जैसे तडागी
विमल सुखद ज्योत्स्ना लागले पांघराया!
ता. क. कवितेशी कुस्ती करताना सुतारकामाच्या हत्यारांचा मनमुराद वापर करून हा मालिनीसदृश पदार्थ तयार झाला आहे. यात खंडीभर चुकाही असतील(आहेत म्हणत नाही कारण सध्या मला त्या कळतच नाहीयेत. या चुका ठोकायच्या चुका नव्हेत हां!!) तरी त्या उदारपणे आणि मोकळेपणाने सांगाव्यात ही विनंती. प्रस्तुत कवितेत न न म य य गणांचा मालिनीचा लगक्रम पाळला गेला आहे असं वाटतंय.
वि. सू.- चालक शिकाऊ आहे.(चालकाचे नाव अदिती आहे विसू नव्हे हे जाता जाता स्पष्ट केलेले बरे ;) हघ्याहेसांनल)
--(मालिनी!)अदिती
९.१०.०६