जन्म... एका पुरुषाचा!!

(लघुकथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. काल्पनिक लिखाण करणे माझ्यासाठी अवघडच आहे. खूप दिवसांपासून ही कल्पना डोक्यात घोळत होती. पसंत पडेल अशी अपेक्षा)

 

         तो माझा जुना सोबती. एकाच बिल्डिंगमध्ये वाढलो,खेळलो. लहानपणी एकाच बालवाडीत गेलो आम्ही.तशा थत्ते काकू जरा वाचाळ होत्या पण मनाने चांगल्या.आमच्या आया चांगल्या मैत्रिणी होत्या. दुपारी धान्य निवडताना सुख-दु:खाच्या गप्पा करत त्यांची मैत्री गाढ झाली होती. आम्ही तिथेच आजूबाजूला खेळत असऊ.पण जसे असे मोठे झालो, त्याचा माझा दुरावा वाढला. आता मोठी झाल्यावर शाळेतले मित्र-मैत्रिणीच जास्त जवळचे वाटायला लागतात ना? त्याने आमच्या घरीही येणे सोडले होते का तर शाळेतले मित्र मग चिडवतात. आणि कधी भाजी द्यायला गेले की मला दिसायचा तो, पण तेव्हाही मोजूनच बोलणं. अभ्यास कसा चाललाय, परीक्षेला किती मार्क पडले हेही विचारणं सोडून दिलं. काकूंकडून त्याच्या तक्रारी ऎकायला मिळायच्या. अभ्यासच करत नाही.अजिबात ऎकत नाही. थत्तेकाका फारच साधे होते. आपल्या कामात चोख आणि काम करून घेण्यात रोख-ठोक. ऑफिसातला धाक घरात मात्र चालत नसे आणि काकू कितीही बोलल्या तरी मुलाला काही बोलायला त्यांची जीभ धजत नसे. तसा त्यालाही काकांचाच लळा जास्त.
          १० वी झाली आणि आम्ही अगदीच वेगळे झालॊ. मी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आणि कसाबसा पास होत त्याने मिळेल त्या कॉलेजात प्रवेश घेतला, वाणिज्य शाखेत.कधीतरी टपरीवर त्याच्या मित्रांसोबत तो दिसायचा, कधी फ.को. रोडवर गाडीवर गप्पा मारत बसलेला.आता तर येता-जाता मिळणारं अवघडलेलं स्मितहास्य पण बंद झालं होतं.त्याचं माहीत नाही, मला मात्र तो अजूनही आवडायचा. का? हे ही माहीत नाही. कदाचित बालपणीचा तो भातुकलीचा खेळ अजूनही माझ्यासाठी संपला नव्हता. ११-१२ मधली मुलं कधी पाहिलीत? त्यांना कॉलेजला गेल्यावर काय होतं कोण जाणे? आपल्याला एखादी गोष्ट जमेल, चांगली दिसेल, परवडेल यापेक्षा तो हिरो कसा हेअरस्टाईल करतो आणि माझा मित्र काय घालतो याचीच नक्कल करणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा ट्यूशन करून येताना त्याच्या मित्रांनी माझी छेड काढली. मला दिसत होतं तो तिथेच होता पण तोही त्यांच्या हास्यात सामील होता. मला खूप वाईट वाटलं त्यादिवशी. त्याचं वागणं मला त्याच्यापासून दूर-दूर नेत होतं.बिचाऱ्या काकूंनी तर बोलणंच सोडलं होतं.घरचं सगळं चांगलं होतं.प्रश्न पॆशाचा नव्हता चांगल्या वागणुकीचा होता, त्याच्या भविष्याचा होता. एकाची दोन आणि दोनाची चार वर्ष झाली.आणि अशातच तो दिवस उजाडला...
             गौरी-गणपतीची तयारी चालली होती. आई फराळाचे पदार्थ बनवत होती आणि वरून जोरात ओरडण्याचा आवाज ऎकू आला. आई म्हणाली 'कसला आवाज आला गं? जा जरा बघून ये वरून'.वर गेले आणि मला एकदम चक्करच आली. काकां लिफ्टच्या बाहेर जमिनीवर पडलेले होते. काकू जोरजोरात त्याला हाक मारत होत्या. तो पळत-पळत जिना चढून आला आणि म्हणाला रिक्शा खाली थांबलीय चल लौकर. काकांना कसेबसे उचलून लिफ्टमध्ये घेऊन ते खाली गेले. मी त्याच्या घरीच थांबले होते, घर तसंच उघडं होतं ना. मी आजूबाजूला पाहिलं, दिवाणखान्यात पेपर खाली पडला होता, चादर वेडीवाकडी झाली होती.मी स्वत:ला जरा सावरले आणि पसारा आवरू लागले.त्याचा तो घाबरलेला चेहरा, आईला सांभाळतं,बाबांना खांद्यावर समर्थपणे घेऊन जाणारा तो मला वेगळाच वाटला.काकांना हृदयविकाराचा झटका आला होता. थोडा वेळ गेला आणि काकूंची किंकाळी ऎकू आली. मी धावत खाली गेले. आई आधीच पोचली होती. दवाखान्यात जाईपर्यंतच काकांनी श्वास सोडला होता. तो अजून दवाखान्यातच होता. आम्हाला तर काही सुचत नव्हते. काकूंना कसे सांभाळणार? त्या तर शांतच होत नव्हत्या. सर्व नातेवाईकांना बोलावले. दोन दिवसात सारे विधी झाल्यावर बरेचसे लोक आपापल्या गावी निघून गेले.
           आई बराचसा वेळ त्यांच्याच घरी असे. मी घरातली कामे शांतपणे करून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला मी एकदा-दोनदा पाहीलं. एकदम स्थिरचित्ताने तो सारे विधी पार पाडत होता. त्याच्याकडे पाहून वाटत होते की तो काहीतरी विचार करत होता.मी एकदा त्याच्या घरी असताना, काकांच्या ऑफिसातले अधिकारी येऊन गेले.ते काकांच्या पेन्शनबद्दल बोलत होते. काकू काहीशा बोलल्या आणि त्याने आतल्या खोलीतून येऊन स्वत: त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. जणू काही परिस्थितीचा ताबा त्याने घेतला होता. सारी कागदपत्रे त्याने चाळून पाहिली, म्हणाला मी दोन दिवसात येऊन तुम्हाला भेटतो. त्याचे हे रूप मला नवीनच होते.

          त्या रात्री मी अभ्यास करत बसले होते आणि दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. पाहते तर, तो समोर उभा होता. किती तरी महिन्यांनी-वर्षांनी मी त्याला आमच्या घरी आलेले पाहिलं होतं. त्याने विचारले 'काका आहेत का?'. मी बाबांना हाक मारली आणि त्याला बसायला सांगून आपल्या खोलीत पळून गेले. माझे कान मात्र बाहेरच्या खोलीतच होते. त्याने बाबांना कसले तरी कागदपत्र दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्य़ातून मला कळले की काकांचे लवकरच नोकरी सोडून कसलातरी धंदा करण्य़ाचे विचार होते. त्यासाठी त्यांनी मित्राकडून कर्ज घेतले होते आणि आता त्या मित्राने पैशासाठी तगादा लावला होता. संकटे एकटी कधीच येत नाहीत, नाही का? तो त्यांच्या त्या गुंतवणुकीचे कागद घेऊन आला होता. माझे बाबा वकील असल्याने त्याला त्यांच्या सल्ला हवा होता. त्याच्या दु:खी चेहऱ्याकडे पाहून त्याची संकटे मला अजूनच मोठी वाटत होती. त्या रात्री तो बराच वेळ बाबांसोबत बसला. सगळे व्यवहार समजून घेऊ लागला. घरी येतानाचा 'तो' आता मला जाताना एकदम मोठा पण आत्मविश्वासू वाटला. तो गेल्यावर जेवताना, मी आई-बाबांचा संवाद ऎकू लागले. कर्ज तर होतंच पण काकांची काही संपत्ती पण होती जी विकून ते फेडता आलं असतं. कर्ज फिटणार होतं पण ऎषारामाचं जीवन जगता आलं नसतं एवढं नक्की होतं.
        दोन महीने गेले आणि मी त्याला आमच्या कॉलेजच्या जिमखान्यात पाहीलं.घरी आल्यावर मी आईला हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली 'अगं तुला माहीत नाही, तो तुमच्या कॉलेजवर स्विमिंग क्लासेस घेणार आहे. आठवडा झाला आता या गोष्टीला. बरं झालं बाई, पोरगं जरा मार्गी लागलं.' तो एवढा समजदार झाला म्हणून का मला रोज दिसणार म्हणून हे माहीत नाही, पण मला खूप आनंद झाला होता. :-) त्याचं बाबांकडे येणं आता नियमित झालं होतं. हळूहळू करत तो एकेक प्रश्न सोडवत होता. आई,बाबा, काकू यांच्या कडून त्याचं कौतुक ऎकलं की मला मुलखाचा आनंद व्हायचा. कधी कधी रात्री उशीर झाला तर आई त्याला जेवायचा आग्रह करायची आणि मी पटकन ताटं मांडून ठेवायचे.:-) माझा तो हरवलेला राजकुमार मला परत मिळत होता. त्याच्या मनात माझ्याबद्दल काय विचार होते हे मला माहीत नव्हतं पण मी तरी केव्हापासून त्याचीच होते.
        एकदा रात्री घरी यायला उशीर होतंहोता मला. मी लगबगीनं पावलं टाकत घराकडे येत होते. त्या रस्त्यावर मला भितीच वाटायची, विशेषतः: तिथल्या टपरीवरच्या टवाळांची. मला वाटत होते त्याप्रमाणेच टपरीवरून एक शिट्टी आणि मागून एक-दोन हिंदी गाण्यांच्या ओळी ऎकू आल्या.मी वैतागून अजून जोरात चालू लागले. अचानक सगळा गोंगाट बंद झाला होता. आर्श्चयाने मी टपरीकडे पाहिले तर ते लोक माझ्या पलीकडे काहीतरी पाहत होते.मी माझ्या बाजूला पाहिले, तो माझ्यासोबत चालत होता. त्याने मला एक रागीट कटाक्ष दिला आणि आम्ही एकत्र घराकडे चालू लागलॊ. बिल्डिंग खाली पोचल्यानंतर त्याने मला रागाने विचारले 'इतक्या उशीरा बाहेर का फिरत होतीस? यापुढे काळजी घे.' असे म्हणून तो ताडताड जिना चढून निघून गेला. मी अविश्वासाने पाहत राहिले. मी एका पुरुषाचा जन्म होताना पाहिला होता.

 

-अनामिका.