मराठी माणसांनी बहुभाषी व्हावे.

आजकाल मराठी माणसांना मराठी भाषा व मराठी संस्कृति नामशेष होते आहे की काय अशी भीति वाटू लागली आहे. काही जण त्याला इतर भाषांचे/ भाषिकांचे आक्रमण जबाबदार आहे असे समजून ते थोपविण्याचे निरनिराळे उपाय सुचवीत असतात. त्यांत बहुधा इतर भाषांवर बहिष्कार हा एक मार्ग असतो.


पण समजा, मराठी माणसांनी या तथाकथित आक्रमणाला संकट न समजता संधी समजून ज्यास्तीत ज्यास्त भाषा शिकल्या तर काय होईल? एक म्हणजे इतर लोक त्यांच्या भाषेंत काय बोलत किंवा लिहीत असतात ते समजायला लागेल व त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षांत येईल. दुसरे म्हणजे अन्य भाषिकांना स्वतःच्या भाषेचा मराठी भाषिकांविरुद्ध सांकेतिक भाषा म्हणून वापर करता येणार नाही. अशा रीतीने इतरांच्या भाषेचाच उपयोग करून त्यांच्यावर मात करणे शक्य होईल. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ चालविणाऱ्या नेत्यांना इंग्रजीचे उत्तम ज्ञान होते ज्याचा त्यांना इंग्रजांविरुद्ध वापर करता आला). शिवाय, मराठी माणूस कोणत्याही माणसाशी त्या माणसाच्या भाषेंत बोलला तर अन्य भाषिकांना मराठी माणसांबद्दल अधिक जवळीक वाटेल. कालांतराने अनेक भाषा जाणणारा तो मराठी माणूस असे समीकरण तयार होईल व कोणाशीही त्याच्या भाषेंत बोलू शकणाऱ्या माणसाची मातृभाषा मराठीच असली पाहिजे हा समज अन्य भाषिकांमध्ये पसरेल. ही प्रसिद्धि मराठी माणसांना उपकारकच ठरेल. 


यावर काही जण असा आक्षेप घेतील की आपण ज्यास्त भाषा शिकण्याची तसदी का घ्यावी? आपल्या डोक्याला हा ताप काय म्हणून? याबाबत माझी अशी कल्पना आहे की निरनिराळ्या भाषांमध्ये काही भाग एकसारखे असतात. अगदी युरोपियन भाषा व मराठी भाषा यांतही काही शब्दांत कमालीचे साम्य आहे. त्यामुळे जितक्या ज्यास्त भाषा शिकाव्या तितकी नवीन भाषा शिकणे सोपे जाईल. मात्र कोणतीही भाषा "डोक्यावर दिलेले ओझे" म्हणून न शिकता चौकस बुद्धीने रस घेऊन व वेगवेगळ्या भाषांतील साम्य व भेद लक्षांत घेत घेत शिकायला हवी. 


आपणांस काय वाटते?