ह्यासोबत
दत्तूला एकदम आपल्या वडिलांची, दादांची आठवण झाली. घरून करुन आणायला सांगितलेले उदाहरण जर सुटले नाही, तर दत्तू त्यांच्या मांडीत डोके खुपसून हुंदके देत बसे. त्यामुळे उदाहरण सुटत नसे; पण उदाहरण गेले खड्ड्यात, त्याचे उत्तर आले काय, न आले काय, असा मोकळेपणा वाटत असे. आजही त्याला दादांची फार गरज वाटली. दादा शाळेत मास्तर होते. त्यांच्याकडून तीस वर्षांत एकही विद्यार्थी नापास झाला नाही. त्यांच्याकडून नापास होणारा विद्यार्थी जगात कुठेही पास होणार नाही, अशी त्यांची ख्याती! परीक्षा झाली की रडक्या चेहऱ्याच्या मुलांनी सोपा भरून जात असे. काळ बदलला, परंतु त्यंच्यात बदल झाला नाही. तांदूळ रुपयाला दोन शेर झाले, परंतु भिकाऱ्यांसाठी सोप्याला ठेवलेला तांदुळाचा डबा हलला नाही. कोणत्याही तऱ्हेचे व्यसन न लावून घेता त्यांनी पै न पै शिल्लक टाकली. आणि तो पैसा घेऊन प्रत्यक्ष भावाने त्यांना बुडवले, पण विषाचा एक थेंबही त्यांच्या आयुष्यात उतरला नाही.
"तो पैसा आपला नव्हताच म्हणायचा, दत्तू" तेच उलट दत्तूला समजावीत. "आपण जेवायला बसतो, एक घास उचलतो. पण त्यात खडा, केस दिसतो. झालं, तो घास आपला नव्हेच."
दत्तू व त्याचा मित्र नारायण गोरे पहिल्या वर्षी मॅट्रीकला नापास झाले. गोरेला त्याच्या बापाने खुर्चीच्या रुळाने बडवले. दादांनी मात्र दत्तूला जवळ घेऊन आपल्या हातातील घड्याळ त्याच्या हातावर बांधले.
"होशील रे पास, या वर्षी नाहीतर पुढल्या वर्षी."
त्यांनी साऱ्या आयुष्यात कधी कुणाला कठोर शब्द वापरला नाही, की कुणावर हात टाकला नाही.
फक्त एकच प्रसंग सोडून. घरासमोरील सद्या परीट लालभडक पळीने आपल्या लहान, भेदरून गेलेल्या मुलीला डागणी देत होता तो प्रसंग सोडून. त्या वेळी दादा हरीमंदिराकडून येत होते. हातात नेहमीची, पांढऱ्या कापडाची छत्रीही नव्हती. त्या पळीकडे पाहताच संतापाने त्यांचे अंग थरथरु लागले. त्यांनी अंगावरच्या उपरण्याचा पिळा केला, व आपल्या वयस्क, दुबळ्या हाताने ते सद्याला मारु लागले! त्यांचे मरणही बेलाचे पान गळावे त्याप्रमाणे झाले. ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी गणपतीकडून येत होते. पण तेथून पाचदहा पावलांवरच ते खाली पडले. बाजूला नातलगांपैकी कोणी नाही. कुणाला त्रास नाही. त्यांना घरी आणले, त्या वेळी त्यांचे उपरणे कुणीतरी उचलले होते. शर्टाची चांदीची बटणे नाहीशी झाली होती, आणि कुणाच्या द्वेषाचा ओरखडाही नसलेली त्यांची अशक्त छाती उघडी पडली होती. शेवटी तेथेही त्यांनी म्हटले असेल, "दत्तू, ती बटणं माझी नव्हतीच म्हणायचं."
याच जगात राहून, याच आयुष्याचे ओझे स्वीकारून, त्यांनी कसे मन न विरजता ठेवले, आणि आपले उत्तर मात्र असे वेडपट आले? दत्तूला वाटले, आपण पुन्हा लहान व्हावे, दादांना खेटून बसावे, त्यांच्या जानव्यातील रुद्राक्षाशी खेळावे. मग जगातील सारी उदाहरणे, खुद्द जगाचेच प्रचंड गोल उदाहरण, गेली खड्ड्यात.
त्याने पुन्हा उगाचच वर्तमानपत्र उघडले. पण ते इतके चुरगळून गेले होते की कुणालाही वाचावेसे वाटले नव्हते. तो माधवराव महाकंजूष. मधुमेह झाला तर किती साखर फुकट जाते याचा हिशेब ठेवणारा. दररोज एक आणा टाकून स्वतःचे वर्तमानपत्र घ्यायला काय झाले आहे? वेळी अवेळी येतो; "मोहन, अमुक आहे? वैनी, तमुक आहे?" म्हणून विचारीत त्रास देतो.
माधवराव आपल्या अपरोक्ष येऊन जातो! दत्तू एकदम कावराबावरा झाला. मरगळलेल्या मनावरील पिसे एकदम फिस्कारली. जर त्याला फक्त वर्तमानपत्रच हवे तर तो आपण असताना का येत नाही? तो उतावीळपणे सुधाला हाक मारणार तोच पदराला हात पुशीत तीच बाहेर आली. अजूनही त्या पदराला कोथिंबिरीची काडी चिकटली होती व एका ठिकाणी पीठ उडाले होते. दत्तूने तिच्याकडे निरखून पाहात विचारले "दुपारी माधवराव आले होते वाटतं?"
"तर काय! दररोज येतात," हात झाडीत ती त्रासिकपणे म्हणाली, "येतात, उगाच तासनतास बडबडत बसतात."
काय बोलतो बरे तो इतके? की सुधा नाटक करीत आहे? ती आपणाला फसवीत आहे असे जरी त्याला खात्रीने वाटले असते तरी एका परीने बरे वाटले असते. पण नाही. त्याला काहीच अंदाज लागेना. तो जास्तच चिडला.
"काय गं, तुझं लॉकेट आहे का एखादं?" त्याने विचारले.
'लॉकेट?" सुधाने गोंधळून विचारले, "कसलं लॉकेट?" मग ती एकदम हसली. शास्त्रीबुवांच्या जयूसारखे स्वच्छ हसली. तिच्या आयुष्यावरून वीसबावीस वर्षे गळून पडली, व क्षणभर तिच्या चेहऱ्यावर झळझळीत घासलेल्या भांड्याची कळा दिसली. "म्हणजे मला एक लॉकेट घेणार की काय या खेपेला? बेबीला इयररिंग्ज, मोहनला साखळी झाली. मग घ्यायचंच असलं तर त्या इंदिराबाईसारखं घेऊ. उघडता येतं ना, तसलं!"
"मग आत कसला तरी फोटो ठेवता येईल" नाटकातल्या प्रॉम्प्टरप्रमाणे दत्तू सुचवू लागला.
"म्हणजे हो! आत कसला तरी फोटो ठेवता येईल."
"कुठल्या तरी देवाचा, संतबाबाचा,--"
"ते काय करायचं घेऊन तुम्हाला कुणाचा फोटो ते?" ती खोडकरपणे म्हणाली. चला आता जेवायला. एकदा तरी उजाडायच्या आत पडू दे मला."
(पुढील भाग - बारावा आणि शेवटचा!)