तळमळ

भंगले ते स्वप्न माझे, तू असा हसलास का रे?
रातराणीच्या फुलाला तू असा चुरलास का रे?

मीच होते प्रेमवेडी, तू असा भिनलास का रे?
राखरांगोळी करूनी तू असा उरलास का रे?

खेळ होता तो घडीचा, तू असा शिणलास का रे?
डाव माझा मांडुनीया तू असा उठलास का रे?

वाट थोडी पाहुनिया, तू असा विटलास का रे?
बेगडी फुलपाखरांना, तू असा भुललास का रे?

याद चाणक्या कुणाची? तू अशी पुसलास का रे?
तोडुनिया बंध सारे, तू असा झुरलास का रे?