शहाण्या माणसाने जशी कोर्टाची पायरी चढू नये तशी त्याने पोलिसचौकीचीही पायरी चढू नये. माझ्या बँकेतल्या नोकरीदरम्यान मला तीनदा पोलिसचौकी गाठावी लागली. त्यावेळी तिथे जे काही पाहिले, जे काही अनुभवले त्यात पोलिसाबद्दल आदर किंवा आपुलकी वाटावी असे काही नव्हते.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मला पोलिसचौकीच्या पहिल्या वारीचा योग आला. दुपारच्या जेवणाची वेळ होती. एक तातडीचे काम उरकण्यात मी गुंतले होते. तेवढ्यात जया काहीतरी शोधत माझ्या टेबलापाशी आली. मी तिला विचारले,"आज उपास का ग?"
ती म्हणाली," नाही हो. कुणीतरी माझी बॅग लपवली आहे. ती शोधतेय. जबरदस्त भूक लागलीय. पाच मिनिटात बॅग सापडली नाही तर थाळी फिरवणार आहे. तुमच्याकडेही येईन."
थोड्या वेळाने ती माझ्याकडे आली तेव्हा अगदी रडवेली झाली होती. मला म्हणाली,"सगळी बँक पालथी घातली पण बॅग कुठेही सापडली नाही. सकाळीच खात्यातून तीन हजार काढले होते. निघायला उशीर झाला म्हणून सोन्याचे कानांतले तसेच बॅगेत टाकून आणले होते. माझी बॅग कुणी बाहेरच्या माणसाने मारली असेल तर?"
मी म्हटले," जया, तुझी बॅग म्हणजे मिनी होल्डॉल. अशी कशी कुणाला मारता येईल? इथेच कुठेतरी असेल. चल, आपण नीट शोधूया."
तितक्यात जयाची मैत्रीण म्हणाली,"मला वाटतं वाणी चुकून तुझी बॅग घेऊन गेली असावी. तिची बॅग इथेच पडली आहे."
वाणीचे माहेर बँकेसमोरच होते. ती रोज आईकडे जेवायला जात असे. दोघींच्या बॅगा एकत्रच ठेवलेल्या असत. वाणीने चुकून जयाची बॅग नेली असावी असे वाटण्याचे कारण म्हणजे जयाची बॅग आवडली म्हणून वाणीने तशीच पण वेगळ्या रंगाची बॅग आणली होती. तेवढ्यात वाणी परत आली परंतु रिकाम्या हाताने. जयाने तिला विचारले," तू चुकून माझी बॅग घेऊन गेली होतीस का गं?"
"मी? तुझी बॅग? मी कशाला नेऊ?"
"तुझी बॅग इथेच पडली होती म्हणून विचारलं"
"मी आज डबा आणला नव्हता.मग मी कशाला बॅग नेऊ?"
वाणी रोजच डबा आणत नव्हती. तरीही बॅग बरोबर घेऊन जात होती. तिच्याशी वाद न घालता जयाने सगळा प्रकार चीफ मॅनेजरांना सांगितला. त्यांनी मला बोलावून घेतले व म्हणाले,"हे काम आतल्या माणसाचेच आहे. चोर सराईत नसावा. तुम्ही जयाबरोबर जाऊन पोलिसात तक्रार नोंदवा. माझ्या ओळखीचे एक इन्स्पेक्टर आहेत. त्यांना पोलिसचौकीत फोन करायला सांगतो. प्रकरण पोलिसात गेले आहे हे समजताच बॅग आपोआप बाहेर येईल."
तक्रार नोंदवायला ओळख कशाला लागते ते मला कळले नाही. मी जयाबरोबर पोलिसचौकीत गेले. बॅग कुठे ठेवली होती,कधी गायब झाली, कुणावर संशय आहे असे जुजबी प्रश्न विचारून इन्स्पेक्टरांनी एका हवालदाराला आमच्या बरोबर पाठवले. "तक्रार नाही नोंदवून घेत?" मी बावळटासारखे विचारले तेव्हा त्रासून ते म्हणाले,"माणूस बरोबर दिलाय ना?"
बँकेत आल्यावर हवालदाराने प्रथम बॅग ठेवलेल्या जागेची पाहणी केली. नंतर तो एकेकाची जबानी घेऊ लागला. वाणीने त्याला साफ सांगितले,"बॅगेबद्दल मला काहीही माहीत नाही. मी ज्या दिवशी डबा आणत नाही त्या दिवशी जेवायला जाताना बॅग नेत
नाही. पण आता हा असा प्रकार घडल्यामुळे यापुढे मला रोज बॅग बरोबर न्यावी लागेल."
या फार्सचा काहीही उपयोग होणार नाही हे आम्हाला कळून चुकले होते. हवालदारानेही'बॅग बँकेच्या बाहेर गेल्यामुळे ती आता मिळणे कठिण आहे' असे सांगितले. तो चहा पिऊन बाहेर पडणार इतक्यात एक नाट्य घडले.
आमच्याकडे सात दक्षिण भारतीय मुलींचा एक गट होता. वाणी त्यातलीच एक. त्या गटातल्या दोन मुलींनी वाणीबरोबर अगोदर दुसऱ्या शाखेत काम केले होते. त्यामुळे त्यांना वाणीच्या हातचलाखीची कल्पना होती. हे प्रकरण पोलिसात गेल्यामुळे वाणीवर शेकेल अशी भीती वाटून वाणीच्या नकळत त्या तिच्या माहेरी गेल्या. तिच्या आईला सगळा प्रकार सांगून वाणी चुकून बॅग विसरून गेली असेल तर शोधायला सांगितले. आईला बॅग मिळाली नाही. त्या मुली परत आल्या. त्यावेळी वाणीचा भाऊ घरात होता. पोलिसांची ब्याद घरापर्यंत येऊ नये म्हणून त्याने बॅग शोधून काढली. ती घेऊन तो घरच्या अवतारातच बँकेत आला. दूरूनच त्याने बॅग वाणीच्या दिशेने भिरकावली आणि आल्या पावली परत फिरला. पोलिसांनी काही कारवाई केली नाही पण बँकेतर्फे वाणीची चौकशी झाली आणि तिला नोकरीला मुकावे लागले.
त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी मला दुसरी वारी घडली. त्यावेळी मी बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात काम करत होते. माझे कार्यालय ज्या इमारतीत होते तिच्या तळमजल्यावर आमचीच एक शाखा होती. एके दिवशी सकाळी इमारतीत शिरताना मला शाखेतील वातावरण थोडेसे वेगळे, काहीसे गंभीर वाटले. म्हणून मी आत शिरले. केबिनमध्ये एका प्रसिद्ध मराठी खेळाडूचे आईवडील बसले होते. शाखेची इन-चार्ज महिला होती. तिने कथन केला तो प्रकार असा. खेळाडूमहाशय सकाळीच सहपरिवार माघीपूजेनिमित्त सिद्धिविनायकाला गेले होते. मंदिराजवळ गाडी उभी करण्याची सोय नसल्यामुळे त्यांनी गाडी बँकेच्या दारासमोर उभी केली. पण त्यांनी गाडी अशी लावली होती की कामकाजाची वेळ झाली तेव्हा बँकेचा अर्धाच दरवाजा जेमतेम उघडता येत होता. लोकांना येण्याजाण्यास फारच अडचण होत होती. वाहनचालक जेव्हा गाडी परत नेण्यास आला तेव्हा रखवालदाराने त्याला हटकले. तो गुर्मीत म्हणाला '"मला काय सांगतोस. माझ्या साहेबांना सांग. त्यांनी गाडी लावलीय." रखवालदार म्हणाला," जा.तुझ्या साहेबांना बोलावून आण."
यामुळे साहेबांचा घोर अपमान झाला. रागावून ते सहपरिवार बँकेत शिरले. दिलगिरी व्यक्त करणे राहिले दूर. उलट कडक शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला. शब्दाने शब्द वाढला. साहेबांनी आपल्या चापल्याची झलक दाखवत एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या पँटवर आपल्या बुटाचा ठसा उठवला. तेव्हा एका तरुण कर्मचाऱ्याने साहेबांच्या कॉलरला हात घातला. मारामारी जुंपली. इतर कर्मचाऱ्यांनी मध्ये पडून ती थांबवली. नंतर कुठलाही सभ्य पुरुष एखाद्या स्त्री समोर उच्चारणार नाही अशा शब्दात साहेबांनी महिला इन-चार्जला धमकावले. एका 'राज'कीय घराण्याच्या (तेव्हाच्या) वारसदाराशी आपले घनिष्ट संबंध असल्यामुळे बँकेला हे प्रकरण फार महागात पडेल असे सांगून ते पोलिसात तक्रार करायला गेले. इन-चार्ज हा प्रकार सांगत असताना त्या खेळाडूची आई मान खाली घालून रडत होती. वडील फक्त एकच वाक्य बोलले."मी हे पोलिसांसमोर कबूल करणार नाही."
जे काही होईल ते कळव असे सांगून मी माझ्या ऑफिसात आले. झाला प्रकार माझ्या वरिष्ठांच्या कानावर घातला. ज्या युवा नेत्याचे नाव घेण्यात आले होते त्याच्याच पक्षाचे सरकार राज्यात होते. तेव्हा हे प्रकरण आम्हाला भारी पडणार याची खात्री होती. त्याला कसे सामोरे जावे याची चर्चा चालू असतानाच शाखेतून निरोप आला की पोलिसचौकीतून बोलावणे आले आहे आणि इन- चार्ज 'प्रसाद' मिळालेल्या अधिकाऱ्याबरोबर चौकीत चालली आहे.त्यांना लेखी निवेदन बरोबर नेण्याची सूचना करण्यात आली आणि बाई माणूस चौकीत जातेय तिला नैतिक आधार म्हणून त्यांच्याबरोबर माझीही रवानगी करण्यात आली.
आम्हाला पाहताच इन्स्पेक्टर म्हणाले ,"बोला". ते बोला म्हणाले पण आम्हाला काही बोलू द्यायचेच नाही असा त्यांनी चंग बांधला होता. आमच्यातील संभाषण काहीसे असे होते.
"बँकेचे कामकाज चालू असताना तुमची माणसं बाहेर रस्त्यावर काय करत होती?"
"रस्त्यावर नाही साहेब गाडी आमच्या दरवाज्याला लागूनच लावली होती."
"म्हणून तुम्ही कायदा हातात घ्यायचा? आम्हाला फोन करायचा. आम्ही गाडी उचलून नेली असती."
"आम्ही कायदा हातात नाही घेतला. आमच्या वॉचमनने ड्रायवरला फक्त हटकलं."
"एवढ्या मोठ्या माणसाला बोलावून घेऊन तुम्ही शिवीगाळ आणि मारहाण केलीत."
"शिवीगाळ त्यांनीच केली आणि मारामारीला सुरुवातही त्यांनीच केली." अधिकाऱ्याने उभे राहून पँटवरचा ठसाही दाखवला पण इन्स्पेक्टरांनी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
"हा हंगामा करताना तुम्हाला बँकेच्या बदनामीची भीती नाही वाटली?"
"उत्तम ग्राहकसेवेबद्दल आमची ख्याती आहे. जे ग्राहक हजर होते त्यांना कळलं की आमची काहीही चूक नाही. तशी साक्ष द्यायलाही ते तयार आहेत" मधून मधून इन-चार्ज लेखी निवेदन पुढे करत होती पण इन्स्पेक्टर त्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. तेच तेच प्रश्न, तीच तीच उत्तरे. मला सगळ्याचा कंटाळा आला होता. तेवढ्यात फोन वाजला. कुणीतरी उचलला.तो साहेबांच्या कानात कुजबुजला. साहेब बसल्या बसल्याच 'सावधान' झाले. ते फक्त 'हो', 'ठीक आहे' एवढेच बोलत होते पण त्यांच्या देहबोलीवरून तो फोन कुणाचा असावा याचा मला अंदाज आला. फोन ठेवत ते म्हणाले,"तर तुम्ही काय म्हणता गाडी अगदी दरवाज्यातच लावली होती? तुम्ही तुमचं म्हणणं मला लिहून द्या. अरे, यांना एक कागद द्या."
"आम्ही निवेदन टाईप करून आणलं आहे." इन-चार्जने निवेदन पुढे केले. इन्स्पेक्टरांनी त्यावर झरझर नजर फिरवली. कागद खणात टाकून ते म्हणाले,"अरे, तीन चहा सांग."
मी म्हटले," मला नको. मी चहा घेत नाही."
"घ्या हो. पोलिसचौकीत चहा मिळणं भाग्याचं लक्षण आहे."
'जळ्ळं मेलं लक्षण' --मी ,अर्थातच मनातल्या मनात.
त्या वेळच्या गृहराज्यमंत्र्यांचा धाकटा भाऊ आमच्या बँकेत उपनगरातील एका शाखेत कामाला होता. तो नेमका त्या दिवशी रजेवर होता. आम्ही चौकीत यायला निघालो तेव्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचे जोरदार प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नांना यश आले होते म्हणून हा ट्रांस्फर सीन.
त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी त्याच पोलिसचौकीत जाण्याचा प्रसंग माझ्यावर आला. आमच्या ऑफिसात एकतर्फी प्रेम करणारा एक मजनू होता. आमच्या इथल्याच दुसऱ्या एका मुलावर त्याचा प्रचंड राग होता. कारण त्या मुलाला तो आपल्या प्रेमात बिब्बा घालणारा खलनायक समजत होता. एका शनिवारी दुपारी ऑफिस सुटल्यावर घरी जाण्यासाठी एक मोठा घोळका बाहेर पडला. सगळे रस्ता पार करण्यासाठी उभे होते. अचानक मजनूची नजर समोरच्या पदपथावर गेली. जे थोडे रस्ता पार करू शकले होते त्यात 'लैला' आणि 'खलनायक' होते. त्या दोघांना गप्पा मारत जाताना पाहून मजनूचे टाळकेच सटकले. जीवाची पर्वा न करता सुसाट धावणाऱ्या गाड्यांमधून मार्ग काढत तो तिरासारखा त्या दोघांपर्यंत पोहोचला आणि त्या मुलीला तोंडाला येईल ते बोलू लागला. बरोबरचा मुलगा तिला म्हणाला,"तो तुला वाट्टेल ते बोलतोय आणि तू ऐकून काय घेतेस? दे एक लगावून."
त्याबरोबर त्या मुलीने मजनूच्या थोबाडीत एक लगावली. चवताळून मजनूने खलनायकाच्या नाकावर ठोसा मारला. त्यानेही हल्ला परतवला. दोघांच्यात मारामारी जुंपली. क्षणार्धात बघ्यांची गर्दी जमली. त्या तिघांचे दुर्दैव असे की त्याच वेळेला एका ए.सी.पीं.ची जीप रस्त्यावरून जात होती. गर्दी बघून ते खाली उतरले. तिघांना सज्जड दम भरून त्यांना जीपमध्ये बसवून जवळच्या चौकीवर उतरवले आणि ते पुढे निघून गेले.
आमच्या ऑफिसातल्या दुसऱ्या एका मुलाने सगळा प्रकार मला फोनवरून कळवला आणि तिघांच्या मदतीला बोलावले. माझे एक सहकारी माझ्याबरोबर चौकीत यायला निघाले. पण तिथे जाऊन नक्की काय करायचे हे आम्हा दोघांना कळेना. तेवढ्या आमचे ए. जी. एम. ऑफिसात शिरले. वास्तविक ते त्या दिवशी रजेवर होते. एका महत्त्वाच्या मीटिंगला निघाले होते. त्या संबंधीचे कागदपत्र नेण्यासाठी आले होते. त्यांना हा प्रकार कळताच ते आमच्या बरोबर आले. इन्स्पेक्टरांनी त्यांना खडसावले,"तुमच्या डोळ्यासमोर प्रेमाचा त्रिकोण होता. तुम्ही त्याबाबत काय केलं? तुम्ही काही पावलं उचलली असती तर ही बाब आमच्या पर्यंत आलीच नसती. मारामाऱ्या सोडवण्यापलीकडे पोलिसांना दुसरी कामं नाहीत काय?"
मुळात प्रेमाचा त्रिकोण वगैरे काही नव्हता. असताच तरी वरिष्ठांपर्यंत सगळ्याच गोष्टी जातात का? आणि कुणाच्या खाजगी गोष्टीत हस्तक्षेप करणे कितपत योग्य आहे? पण हे सगळे बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. ए. जी. एम.नी दोन्ही मुलांची बदली करण्याचे आश्वासन दिल्यावर इन्स्पेक्टरांनी तिघांची सुटका करण्याचे कबूल केले. पण त्यासाठी ज्या ए. सी. पीं. नी त्यांना आणून सोडले होते त्यांची परवानगी आवश्यक होती. त्यांच्याशी संपर्क होण्याची वाट पाहत आम्ही थांबलो.अडीच तासांनी आमची वीरसेना बाहेर पडली. नंतर कळले की तिघांकडून पोलिसांनी सुटकेचा मोबदला वसूल केला होता.
पोलिसचौकीच्या भेटींमध्ये पाहिलेले दोन प्रसंग माझ्या अजूनही लक्षात आहेत. एक गृहस्थ आपल्या पत्नीसह त्यांना झालेल्या मारहाणीबद्दल तक्रार नोंदवायला आले होते. इन्स्पेक्टरांचा तुच्छतापूर्ण प्रतिसाद पाहून पत्नीने खडसावले,"तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. रक्ताने कपडे खराब होऊ नये म्हणून जुने कपडे घातले आहेत. पेश्याने हे इंजिनिअर आहेत. आणि ही मारामारी कुठे रस्त्यावर नाही झालीय. इस्टेटीच्या वादातून चुलत भावाने घरात घुसून मारहाण केली आहे," हे ऐकून इन्स्पेक्टर थोडेसे वरमले.
दुसरा प्रसंग असा की एक सत्तरीच्या घरातले गृहस्थ तक्रार नोंदवण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून इन्स्पेक्टर फोन फिरवत राहिले. 'बसा' म्हणण्याची थोडीशी वाट पाहून ते स्वत:च बसू लागले तेव्हा इन्स्पेक्टर अमिताभच्या थाटात गरजले,"मी तुला अजून बसायला सांगितलं नाही" ते निमूटपणे उभे राहिले. तेवढ्यात शिपाई एका इसमाला घेऊन त्यांच्याकडे आला. त्या इसमाचे नाव ऐकताच साहेबांनी वृद्ध गृहस्थांकडे बोट दाखवून विचारले,"मग हा माणूस कोण?" साहेबांचा गैरसमज झाला होता. तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्यांना ते चौकशीसाठी बोलावलेला समजले होते. तरीही त्यांचे हे वागणे योग्य होते का? पोलिसांनी जनतेशी, खास करून वृद्धांशी आणि स्त्रियांशी सौजन्याने वागावे अशी अपेक्षा बाळगणे हे फार मोठे मागणे आहे का? आमच्या ऑफिसातल्या त्या मुलीला इन्स्पेक्टर म्हणाले होते,"पंचवीस वर्षं झाली तरी लग्न नाही झालं अजून? लवकर लग्न करा म्हणजे असले चाळे थांबतील." जिच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही तिला असा अनाहूत सल्ला देणे ठीक आहे का? सतत गुन्हेगारांच्या सहवासात राहूनही चोर आणि साव यांच्यात पोलिसांना भेद करता येऊ नये? निरपराधत्व सिद्ध होईपर्यंत प्रत्येक संशयित हा गुन्हेगारच असतो ही भूमिका घेणे खरोखरच गरजेचे असते काय?
मी दादरकर