जर्मनीतले काही सरकारी अनुभव

      सरकार दरबारच्या कचेऱ्यांत जाऊन आपले काम करून घ्यायचे असले की माझ्या घशाला कोरड पडते, पोटात गोळा येतो, सर्वांगाला घाम फुटतो! तिथे असलेले ते विशिष्ट 'सरकारी' वातावरण मनावरचा ताण आणखीच वाढवते. इथे जर्मनीत आल्यावर 'राट हाऊस' म्हणजे मामलेदार कचेरी सदृश्य कार्यालयात जाऊन आपल्या नावाची नोंद करावयाची असते. घर बदलले की पुन्हा तिथे जाऊन बदललेला पत्ता नोंदवावा लागतो ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. एकदा नावनोंदणी झाली की झाले काम! असे आम्हाला वाटत होते, आणि पहिली नोंदणी 'टिमो'ने केल्यामुळे त्या कचेरीचे तोंड पाहायची वेळ आली नव्हती.

      वोनहाइम मधून कॉव्हेन्ट्री स्ट्रासंच्या घरी राहायला आल्यावर एक दिवस साक्षात्कार झाला, की आपण 'राटहाऊस' मध्ये जाऊन नोंद करणे अत्यावश्यक आहे. आजी-आजोबांकडून पत्ता माहिती करून घेतला आणि आणखी मौलिक माहिती सुध्दा मिळाली की घर बदलल्यावर १५-२० दिवसाच्या आत नवी नोंदणी करणे आवश्यक असते! इथे येऊन तर आम्हाला अडीच - तीन महिने झाले होते. झाले! माझ्या घशाला कोरड, पोटात गोळा, घाम फुटणे इ. इ. सर्व काही झाले. आकिम आजोबा 'घरमालक' बनून माझ्याबरोबर आले आणि तांत्रिक कारणांसाठी आम्ही ऑक्टोबरपासूनचे कंत्राट केले आहे परंतु ही मंडळी आत्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इथे राहायला आली आहेत, असा युक्तिवाद ठरवून आम्ही दोघे कचेरीत शिरलो, पण त्याची वेळच आली नाही. तुम्ही मालक का? असा एकच प्रश्न तिथल्या कारकून बाईने आकिम आजोबांना विचारला आणि दुसऱ्या मिनिटाला सही शिक्क्याची पावती घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो. इतक्या झटकन काम न होण्याचीच सवय असल्याने,"झाले आपले काम एवढ्यात?" असा प्रश्न मी आजोबांना आणि त्या बाईंना बाहेर पडता पडता विचारलाच!

      दिनेशच्या कचेरीचे मुख्यालय आहे लाइपझिश येथे. त्यामुळे एओके साक्सन या लाइपझिश येथील कचेरीमध्ये त्यांचा वैद्यकीय विमा असतो. दिनेशने नोकरी बदलली आणि नवीन कचेरीमध्ये 'क्राकंनफरझिशरुंग' म्हणजे वैद्यकीय विम्याचे कागदपत्र सादर करणे आवश्यक होते, म्हणून एओके साक्सन च्या हपिसात फोन लावला.' आप कतार मे हैं...' ची तबकडी वाजत राहिली. असे २-३ वेळा झाले. लाइपझिशच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे आणावी लागणार असल्याची मानसिक तयारी करत असतानाच फोन उचलला गेला. पलिकडील बाईंनी आमचे नाव,फोन नंबर, कामाचे स्वरूप, सारे विचारून घेतले, आणि “हे काम श्री.काइल उवं पाहतात, पण आज ते रजेवर आहेत तरी तुम्ही उद्या सकाळी ११ च्या सुमाराला २३६७९८० या नंबरवर फोन करा, म्हणजे तुम्ही थेट त्यांच्याशीच बोलू शकाल. माझी त्यांची भेट झाली तर मी बोलून ठेवेन, म्हणजे त्यांना संदर्भ लागेल.” असे सांगितले. ह्या संभाषणाने तर मला आनंदाश्रू यायचेच बाकी होते. खरी कमाल दुसऱ्या दिवशी झाली. श्रीमान उवं यांना फोन केला. आमचे नाव सांगितल्यावर लगेचच "उटंबाई बोलल्या आहेत तुमच्या कामाबद्द्ल. तुम्हाला 'अमुक अमुक' कागदपत्रे हवी आहेत ना? मी आजच तयार करून ठेवतो. तुमचा पत्ता एकदा परत सांगा म्हणजे कनफर्म करतो. आजच मी ती पोस्टात टाकतो म्हणजे उद्या किंवा फार तर परवा तुम्हाला ती मिळतील.” हे मी जागेपणीच ऐकते आहे ना? अशी शंका आल्याने मी स्वतःलाच चिमटा काढला.  ही कागदपत्रे कधीपर्यंत तयार होतील? आम्ही ती न्यायला कधी येऊ? त्याची फी किती आणि कुठे भरायची? इ. प्रश्नांची  उत्तरे न मागताच मिळाली होती. दिनेशने नोकरी बदलल्यामुळे जसे वैद्यकीय विम्याचे कागदपत्र द्यावे लागले तसे 'रेंटनफरझिशरूंग'चे कागदही नवीन कचेरीत देणे आवश्यक होते. रेंटनफरझिशरूंग म्हणजे आपल्या पी.एफ. सारखाच प्रकार असतो. फोनवरून आम्ही भेटीची वेळ घेतली.

         एका बुधवारी सकाळी साडेआठ वाजता श्री.कार्मिनो ह्यांच्याशी भेट ठरली. आपल्याकडून उशीर नको म्हणून आम्ही आपले सव्वाआठलाच तेथे जाऊन आपले नाव नोंदवले. स्वागतिका पलिकडच्या कक्षात बसायला सांगत असतानाच समोरच्या केबिनचे दार उघडले आणि एक व्यक्ती बाहेर आली. आम्हाला पाहताच तिने शुभप्रभात असे अभिवादन करून आमची नावे विचारली. आणि "मीच कार्मिनो. मी मोकळा आहे आत्ता. कशाला थांबायचे साडेआठपर्यंत? चला आतमध्ये..." असे म्हणून आश्चर्याचा पहिला सुखद धक्का दिला. आत गेल्यावर, "बसा. काय घेणार? कॉफी चालेल?" असे त्यांनी विचारताच आम्ही गाऽऽर! सरकरी कचेरीतील कारकून "साहेब, चहापाण्याचं बघा काय ते.. हे बोलायच्या ऐवजी आपल्यालाच कॉफी विचारतो आहे?" मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना?... संभाजीराजांचे भाषण माझे स्वगत होऊ लागले होते.. आम्हाला हवे ते कागदपत्र आधी संगणकावर दाखवून, ते बरोबर असल्याची खात्री करून लगेच त्याची मुद्रणप्रत काढून आमच्या हातात दिली. “हा फॉर्म भरायला लागेल पण तो किचकट आहे, तेव्हा तुम्ही सही आणि तारीख घाला, बाकी मी भरून त्या विभागात पाठवेन.” हा तर षटकारच होता हो! मला गहिवरूनच आलं. अगम्य भाषेतले ते किचकट फॉर्म डोकेफोड करून भरायचे. ते द्यायला गेलो की चौथ्या मजल्यावर जा, तिथे गेलो की हे राहिले,ते परत भरा, रेशनकार्डाची फोटोप्रत लावा, पुढच्या आठवड्यात या, असले ऐकायची सवय असलेले माझे कान! त्यांचा कार्मिनोबाबाच्या बोलण्यावर विश्वासच बसेना! (ही रेशनकार्डाची प्रत आपल्याकडे जिथे तिथे का लागते? मला तरी कोडेच आहे)

      याच कामाचा पुढचा भाग म्हणजे, टॅक्स कार्ड आणणे. त्या कचेरीत गेले. तिथे नंबराचे कूपन घ्यायचे आणि आपला नंबर यायची वाट पाहत बसायचे. ज्या केबिममध्ये नंबर येईल तिथे जायचे आणि आपले काम सांगायचे अशी पध्दत! माझा नंबर आल्यावर दिनेशच्या टॅक्स कार्डाविषयी मी तिथल्या कारकूनाकडे विचारणा केली. नाव,पत्ता विचारून त्याने संगणकावर एंट्री केली आणि सांगितले तुमचे डीरजिस्ट्रेशन झाले आहे. मी हादरलेच. डीरजिस्ट्रेशन म्हणजे इथे बेकायदेशीर राहण्यासारखेच झाले. आता काय करायचे? त्यावर त्या कारकून बाबाने सांगितले, “तुमच्या पतीने नोकरी बदलली आहे असे इथे दिसते आहे आणि आधीच्या कंपनीने डीरजिस्ट्रेशन केले आहे. काही हरकत नाही, मी परत नोंदणी करतो. पण तुमचे टॅक्स कार्ड मिळायला एक महिना लागेल. तेव्हा तुम्ही एक महिन्याने परत या आणि नंबराचे कूपन न घेता थेट माझ्याकडेच इथे १९ नंबरच्या खोलीत या. मी तुमचे टॅक्स कार्ड तयार करून ठेवतो.” एका महिन्याने मी त्या श्रीमान स्टीव कडे गेल्यावर मला एका मिनिटात त्याने टॅक्स कार्ड दिले. 

      ह्यामध्ये काही ठिकाणी दिनेशचे एकट्याचे नाव असले, तरी प्रत्येक ठिकाणी त्याला जाणे शक्य नव्हते. पण मला कोठेही अडवणूकीचे धोरण दिसले नाही. प्रत्येक ठिकाणी मला तत्परतेने माहिती दिली गेली. मुख्य म्हणजे 'सरकारी वेळ' न लागता कामे लगेचच झाली. कोणी एकानेही टेबलाखालचे व्यवहार, चहापाण्याची अपेक्षा दर्शविली नाही. हे आपले काम आहे आणि ते करण्यासाठीच आपल्याला पगार मिळतो याची जाणीव असलेली दिसली. आपल्याकडे दुर्दैवाने दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी मला इथे जर्मनीत जाणवल्या आणि त्या आपल्यासमोर आणाव्याशा वाटल्या.

स्वाती दिनेश

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.