मग तुझं बुटीक कुठेय? एवढं अमेरिकेतून शिक्षण घेऊन आलीस म्हणजे स्पेश्शल असणार तुझी स्टाइल!!"
"बुटीक? अगं मी व्यवसायाने फॅशन डिझायनर नाही कॉश्च्यूम डिझायनर आहे"
"तेच ते गं!"
"नाही तेच ते नाही."
"बरं नसेल!"
संवाद मी आणि नात्यातल्या एका व्यक्तीमधला. अर्थातच माझ्यावर एव्हाना अतिशहाणपणाचा शिक्का बसला.. शब्दांचा एवढा कीस काढते म्हणजे काय!..
तुम्हालाही असंच वाटलं असेल ना? पण खरंच मी फॅशन डिझायनर नाहीये. मी कॉश्च्यूम डिझायनर आहे. आणि दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कपड्यांशी निगडित असल्या तरी खरंच दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण दोन्हीचा हेतू वेगवेगळा आहे. फॅशन डिझायनर्स हे लोकांसाठी डिझाइन करतात. लोकांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यात कोणते रंग वापरावेत, कोणत्या प्रकारचे कापड वापरावे आणि ते कुठे जाताना वापरावे हे आणि असं सगळं फॅशन डिझायनर्स सूचित करतात. यासाठी आत्तापर्यंत होऊन गेलेल्या फॅशन्स, समकालीन दृश्य जाण म्हणजे आजच्या काळात लोकांना काय बघायला आवडतात, कामाचे स्वरूप आणि त्या दृष्टीने कोणाची गरज काय आहे इत्यादी गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
तर कॉश्च्यूम म्हणजे नाटक, चित्रपट, नृत्यनाट्य इत्यादींमधील नटाने/नर्तकाने घालायचे कपडे. ह्या कपड्यांचे निर्णयन करणारा तो कॉश्च्यूम डिझायनर. नाटक, चित्रपट वा नृत्यनाट्य ही मुळात कथा सांगण्याची माध्यमे आहेत. कॉश्च्यूम हे या माध्यमाची ताकद वाढवणार्या अनेक साधनांपैकी एक आहे. त्यामुळे कॉश्च्यूम डिझायनरने कथा सांगण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करणे गरजेचे असते. कथेची हाताळणी, व्यक्तिरेखा इत्यादी गोष्टींचा तपशीलात अभ्यास करून मग ती ती व्यक्तिरेखा कश्या प्रकारचे कपडे घालत असेल आणि गोष्टीतल्या घटनांचा त्यांच्यावर कसा नी काय परिणाम होतो या सगळ्याचा विचार करून मग कॉश्च्यूम ठरवला जातो.
फॅशन ही डोळ्याला सुखावणारी, आकर्षक असावी लागते; तर कॉश्च्यूम्समधून कथेचे, व्यक्तिरेखेचे तपशील मिळणे महत्त्वाचे असते. हा हेतूंमधला फरकच कॉश्च्यूम डिझायनरला फॅशन डिझायनरपासून वेगळा करतो. त्यांच्या कामाच्या पद्धतींवर हाच हेतूंमधला फरक परिणाम करतो.
पण असं असलं तरी वस्त्रांचा इतिहास, कापड उद्योग, कपडा बनविण्याच्या पद्धती तसेच संरचनेचे घटक (रंग, रेषा, आकार, पोत इत्यादी) आणि मूलतत्वे (तोल, ताल, प्रमाण, अधोरेखन, एकता इत्यादी) या गोष्टींचा अभ्यास दोघांनाही करावाच लागतो.
पण गंमत काय होते की वरच्या संवादातलं जे 'तेच ते गं' आहे ना ते अनेक दिग्दर्शकांच्या आणि तथाकथित स्टार्सच्या डोक्यातही पक्क बसलेलं असतं आणि मग त्याचा उलटा परिणाम म्हणजे 'हा चित्रपट आहे की फॅशन शो!' असा एक घोळ काही चित्रपटांच्या बाबतीत होतो.
उदाहरणार्थ: भन्साळींचा देवदास. संपूर्ण चित्रपटभर मला कलाकुसरीने घडवलेले उंची कपडे दिसतात. कपड्यातलं इंचनइंच बारकाईनं विणलंय, भरलंय हे कळतं. मलाही 'साडी छान आहे हं' असं म्हणायला लावतात हे कपडे पण व्यक्तिरेखेबद्दल 'बंगाली असावेत बहुतेक' याशिवाय काहीच देत नाहीत. मोठं घराणं, खानदान इत्यादी इत्यादी असलेल्या देवदासच्या घरातल्या बायका, खालच्या पातळीवरच्या पारो च्या घरातल्या बायकांपेक्षा काहीच वेगळ्या दिसत नाहीत. पण तरी या झाल्या घरेलू, गर्त्या बायका. या सगळ्या चंद्रमुखीच्या कोठीवरच्या बायकांपेक्षाही काही वेगळ्या दिसत नाहीत. आर्थिक परिस्थिती सारखी असली तरी सामाजिक स्थान आणि मोठया घराण्याबरोबर येणारी कपड्यातली अदब, dignity ह्यामुळे ह्या तीनही बायका वेगळ्या वाटायला हव्यात ना. | ![]() |
तुम्हालाआम्हाला हिंदी येतं म्हणून आपण शब्दांवर समजून घेतो की अमुक अमुक हे अमुक अमुक आहेत. पण ज्याला येत नाही त्याला कळणारच नाही की हे सगळे दिसतायत तर सारखे आणि तरी एक जास्त आदरणीय आणि दुसरा कमी असं कसं काय?
![]() |
दुसरं एक गमतीशीर उदाहरण म्हणजे 'अशोका' नावाचा सिनेमा आणि याच आसपासच्या काळावर आधारलेला अजून एक सिनेमा 'उत्सव'. सरळच दिसतं की अशोकामधे कपड्यांवर खर्च खूपच केलाय. पण ते नट हे नटच राहतात व्यक्तिरेखा बनतच नाहीत. सवय नसलेले कपडे घातल्यावर एखादा कसा विचित्र दिसतो तसे ते कपडे दिसतात. हे कपडे हे एका प्राचीन काळातल्या पद्धतींवर आधारित समकालीन फॅशन या पातळीवर येतात. तर 'उत्सव' मधे प्रत्येक रेषा न रेषा ही कथेला संलग्न असते. रेखा ही रेखा न वाटता वसंतसेनाच असते. आणि त्यांचे कपडे हे त्यांचे रोजचे कपडे दिसतात. अजून एक गंमत होते या कपड्यांच्या बाबतीत ती म्हणजे कथा, घटना, मांडणी, व्यक्तिरेखा या सगळ्यांपेक्षा कपडेच दिसतात, बघितले जातात. |
पण कॉश्च्यूम्स हे कथा, व्यक्तिरेखा दृश्य स्वरूपात उभी करण्यासाठी असतात, कपड्यांच्या प्रदर्शनासाठी नाही. एक सिद्धांत सांगितला जातो आम्हाला. काम असं करा की ते दिसलं नाही पाहिजे. दिसायला हवी ती कथा, व्यक्तीरेखा. चित्रपट बघताना जर तुमची कला (प्रकाशचित्रण, सेट, कॉश्च्यूम्स, संकलन ते अगदी दिग्दर्शन व अभिनयापर्यंत) जर वेगळी लक्षात येत असेल. तुम्ही केलेलं काम हे चित्रपटाच्या बाहेर येऊन लोकांपर्यंत पोचत असेल. लोक चित्रपटाबद्दल बोलायच्या ऐवजी प्रकाशचित्रण छान होतं, कॉश्च्यूम्स वेगळे होते इत्यादी बोलत असतील तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या कामाशी बेईमानी केलीये. तुमचं काम कथेपासून सुटून वेगळं जाणवतं याचाच अर्थ तुम्ही चित्रपटाशी, कथेशी, दिग्दर्शकाशी प्रामाणिक नाही आहात. चांगलं काम कधी मूळ वस्तूपासून वेगळं काढून बघता येत नाही. अभ्यासक बघू शकतात पण वरच्या विधानात केवळ प्रेक्षकांविषयी बोलले गेले आहे. अभ्यासकांची गरज असते चित्रपट कसा केलाय हे समजून घेण्याची प्रेक्षकांची नाही.
पण कधी कधी होतं काय की, दिग्दर्शकाला नसते चित्रपट बनवण्याच्या कलेचे ज्ञान. संहिता/ पटकथा कळत नसते आणि मी प्रामाणिक काम द्यायला जाते. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी एक ठराविक रंगसंगती, प्रत्येकाचा एक ठराविक लुक जो व्यक्तिरेखेच्या बदलत्या ग्राफबरोबर बदलेल इत्यादी. दिग्दर्शकाला रंगसंगती कळत नाही. खूप रंग वापरून फ्रेममधे रंगपंचमी करणे म्हणजे डिझाइनचा अत्युच्च बिंदू, असा त्याचा समज असतो. तरीही मूर्खासारखं मी दिग्दर्शकाला विचारते सिनेमॅटोग्राफरच्या लाइटींग पॅटर्न, लाइटींग टेक्श्चर विषयी आणि दिग्दर्शकाचा मेंदू सरकतो. तो काम आवडत नाही म्हणून मला काढून टाकत नाही की कामामधे फेरफार करायला जात नाही. पण संपूर्ण शूट होईपर्यंत सतत सगळ्यांसमोर माझी चेष्टा करत राहतो. चांगल्या कामाची खिल्ली उडवली जाते. तपशीलात जाऊन काम करायचं म्हणलं की "जाने दो ना! चल जायेगा! कौन देखता है इतना!" असं वाक्य तोंडावर फेकलं जातं. अहो प्रेक्षकांना एकनएक गोष्ट सुटी करून बघता नाही आली तरी परिणाम जाणवणारच आहे. कुठेतरी काहीतरी कमी आहे हे जाणवणारच आहे ना. Audience won't be able to read it but they definitely can feel it. पण हे त्या दिग्दर्शकाच्या गावीही नसतं.
असा एक अनुभव गाठीला आल्यावर पुढच्या वेळेस यासारखाच सेटअप आला की मग मी त्यांना काय हवंय एवढंच बघते. ग्लॅमरस कपडे, चकचकीत दागिने. स्टारला काय हवंय? त्याचं स्टारपण चित्रपटापेक्षा मोठं आहे त्यामुळे त्याचा आहे तोच लूक मग तो गडचिरोलीहून आलेला असो की न्यूयॉर्कहून इत्यादी. यात माझ्या कलेशी संपूर्ण बेईमानी होते आणि एक वाईट काम माझ्या नावावर होतं. पण मी रूळलेली तंत्रज्ञ होते.
हे वरचं जे आहे ना ते २-३% टक्के दिग्दर्शक सोडले तर इतरांच्या बाबतीत संपूर्ण खरं आहे. तंत्रज्ञ कितीही चांगला असला तरी दिग्दर्शकाला प्रत्येक तंत्राच्या ताकदीचा अंदाजच नसेल तर त्या चांगल्या तंत्रज्ञांचंही लोणचं घातलं जातं. आणि आपल्या हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीच्या संदर्भात हे सतत घडत आलेलं आहे.
हे असं घडत असताना मला लंडनचा सेट आणि कॉश्च्यूम डिझायनर रॉबर्ट हॉपकिन्स आणि लाइट डिझायनर ज्यूल्स फिशर या दोघांनी दिलेलं चॅलेंज आठवतं. "If you are going home after studies you better change the design scenario of Bollywood. It is horrible at the moment and thats your job" मोठ्या उत्साहाने Challenge Accepted असं मी त्यांना सांगितलेलं असतं. केवढा मोठा पल्ला गाठायचाय मला आणि शेवटी चांगलं काम करणं हेच आपल्या हातात आहे. ते मी करत राहते. चांगलं काम म्हणजे काय हे माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत राहते. किंवा मनोगतासारख्या ठिकाणी हे असं सगळं सांगत राहते. Challenge पूर्ण करण्याच्या दिशेने मुंगीएवढी पावलं टाकत....
अज्जुका