आक्का

खाली बसलेली बाई (गुलाबी साडीत) म्हणजे आक्का

      हल्लीच मी पुण्याहून वाईला एसटीने जात होते. एसटीच्या खडखडाटाच्या आवाजावर आवाज चढवून लोक गप्पा मारत होते. त्यातलंच एक वाक्य माझ्या कानावर पडलं. "काय करू वं. माजा अगदी नाविलाज झाला बगा!" ’नाविलाज’ शब्द ऐकला आणि मला गोदावरीआक्काची आठवण झाली! आक्काचा कधीच नाईलाज होत नसे, व्हायचा तो नाविलाज! आम्हीही कधी ते दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडलो नाही. पण आक्काची आठवण फक्त ’नाविलाजानेच’ होते असे नाही. कुठेही निर्भेळ, निरपेक्ष आणि थोडेसे भाबडे प्रेम दिसले की आक्काची आठवण येते.

आक्कानं मला आणि माझ्या बहिणींना खेळवलेलं आहे. तसंच आमच्या मुलांनाही खेळवलेलं आहे. तिचं आमचं सांगता येण्यासारखं असं काहीच नातं नव्हतं. आता बरीच वर्ष ती आम्हाला आमच्या नात्यातलीच वाटायची ही गोष्ट निराळी! वाईला ज्या वाड्यात आमचं बिऱ्हाड होतं त्याच वाड्यात तीही तिच्या वडिलांबरोबर राहात असे.

        ती माझ्या आईहून थोडीशी लहान असेल, पण आमच्या आईच्याच पिढीतली. आईसारखंच ती नऊवारी नेसायची, अगदी ओचा वगैरे घालून. पण पदर मात्र नेहमी डोक्यावरून घेतलेला असायचा. गोरंही नाही आणि काळंही नाही अशा तिच्या कपाळावरचं गोंदण स्पष्ट दिसायचं कारण कपाळावर कुंकू नसायचं!

      ती अशी वडिलांकडे का राहाते, असा प्रश्न कधी आमच्या मनात आला नाही. पुढे मोठेपणी काही गोष्टी जरा विस्ताराने कळल्या. ती पतिनिधनानंतर माहेरी परत आलेली होती. त्यावेळी तिचं शिक्षण बेताचंच झालेलं होतं. त्यावेळी व्हर्नाक्युलर फायनल आणि फर्स्ट इयर ट्रेंड असं शिक्षण झालेलं असेल तर प्राथमिक शाळेत नोकरी मिळत असे. माझ्या वडिलांनी आक्काला सुचवलं की तिनं ते शिक्षण घ्यावं म्हणजे तिला स्वत:च्या पायावर उभं राहाता येईल. माझ्या वडिलांच्या मदतीनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आक्कानं आवश्यक ते शिक्षण घेतलं आणि तिला वाईजवळच्याच एका लहान गावातल्या प्राथमिक शाळेत नोकरी मिळाली.

      ती मग कधीकधी आम्हालाही तिकडे घेऊन जात असे. मग तिथे खास गावचा मेवा म्हणजे भुईमुगाच्या ओल्या शेंगा, गुळाची साय असं काही काही आम्हाला खाऊ घालत असे. तसंच चुलीवरच्या स्वयंपाकाची वेगळी चव तिथे अनुभवायला मिळायची. त्यातही तिने केलेलं कच्च्या शेंगदाण्याचं म्हाद्या नावाचं ’कालवण’ म्हणजे अगदी चंगळच! माझ्या धाकट्या दोघी बहिणींपेक्षा मला हे जरा कमी अनुभवायला मिळालं याचं मला कधी कधी थोडं वाईटही वाटतं!  

      लहान गावात घराचे दरवाजे बहुतेक वेळा उघडेच असतात. त्यामुळे आम्ही आक्काकडे आणि ती आमच्याकडे केव्हाही जात/येत असू. "जेवायला बसलायत न? ही घ्या चटणी" असं म्हणत बिनदांड्याच्या कपातून आणलेली तीळ, कारळे यांची कोरडी चटणी पुढे ठेवायची. एकदा आमची रात्रीची जेवणं होत आली होती. जेवणं संपताना होणारा ठराविक संवाद झाला: "काय उरलंय? एक भाकरी? असू दे. होईल ती लक्ष्मीला." पण आई असं म्हणत असतानाच आक्का आली आणि हसत हसत म्हणाली, "लक्ष्मी आलीच आहे. द्या तिला ती भाकरी." हा तिचा विनोद, कारण तिचं कागदोपत्रीचं नाव लक्ष्मी होतं. तिनं खरंच ती भाकरी खाल्ली कारण ती कुठूनतरी बाहेरगावाहून आली होती आणि तिचं जेवण व्हायचं होतं.

      माहेरी परत आलेली बाई म्हटल्यावर आपल्या मनःचक्षूंसमोर जे चित्र उभं राहातं त्या चित्राला एक कारुण्याची किनार असते. आक्काच्या चित्राभोवती मात्र प्रसन्नतेची रांगोळी होती! शाळकरी मुलीचा उत्साह तिच्याजवळ होता. साध्यासाध्या गोष्टी सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावरून उत्साह अगदी ओसंडत असायचा. पण नेहमी हसतमुख असलेल्या आक्काला एवढ्या वर्षात मी एकदाच त्रासलेल्या अवस्थेत पाहिलेलं आहे. कोणत्याही शासकीय कामात मनुष्यबळ कमी पडलं की प्राथमिक शिक्षकांना वेठीला धरण्याचा प्रघात त्याकाळी होता. त्यावेळी सरकारची कुटुंब नियोजन मोहीम जोरात चालू होती. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी अमुक इतक्या केसेस मिळवून आणा असे आदेश प्राथमिक शिक्षकांना दिलेले होते. त्यात आक्काला एक केस कमी पडत होती. त्यामुळे ती अगदी वैतागून गेली होती. मध्येच घरात कुणीतरी म्हणालं, "आक्काला केस मिळाली." पण पुन्हा थोड्या वेळाने आक्काला पाहिलं तर ती वैतागलेलीच. मी म्हटलं, "अगं, केस मिळाली न? मगाशी कुणीतरी तसं म्हणालं."  तर ती आणखी वैतागून म्हणाली, "अग, माझी चष्म्याची केस मिळत नव्हती ती मिळाली. पण ही केस अजून मिळायचीच आहे." त्यानंतर आमच्या घरात ’आक्काची केस’ हा एक विनोदाचा विषय झाला होता.   

      ती जातीने गुरव. त्यामुळे वाईतील बहुतेक देवळांची व्यवस्था बघण्याचे काम ती आणि तिचे आप्त यांच्याकडे आलटून पालटून येत असे. तर तेही ती अगदी उत्साहाने सांगायची. "बरं का, आता काशीविश्वेश्वराचं देऊळ आपल्याकडे (आमच्याकडे नाही!) आलंय." तिच्याकडे जेव्हा गणपतीचं देऊळ असायचं तेव्हा आमची मजा असायची. भक्तगण गणपतीला मोदकांच्या माळा घालायचे. आक्का त्यातल्या काही माळा आमच्यासाठी घेऊन यायची. सुकं खोबरं आणि साखर यांचं चिमूटभर सारण घालून तळलेले  कडक असे ते मोदक आकाराने जेमतेम पेढ्याएवढे असत. पण माळा सोडवून ते मोदक खायला त्या वयात खूप मजा वाटायची. तसेच ते पेढे! खवा थोडा आणि भरपूर साखर असे ते गोड गोळेही आम्हाला आवडायचे. खरं म्हणजे वाईत उत्तम कंदी पेढे मिळत(अजूनही मिळतात!) आणि ते आम्ही आवडीने आणि चवीने खात असू पण आक्काने आणलेल्या ह्या पेढ्यांची चव काही वेगळीच! 

      आक्का फक्त आमचेच असे लाडलूड करत असे असं नाही. तिला तिची सख्खी भाचरं होती. त्यांचेही ती असेच लाड करायची. ती रस्त्यात जरी कुठे भेटली तरी हाताशी एखाददुसरं मूल असायचंच. अगदी जिवतीच जणू! भाचरं मोठी झाल्यावर ह्या लाड करण्यात कौतुकाची भर पडली. तिचा एक किसन नावाचा भाचा बाकीच्यांच्या मानाने चांगला शिकला होता. त्याच्या लग्नाच्या वेळची गोष्ट. माझी आई सुरेख कविता करीत असे. तसेच घरातील लग्नमुंजी, बारशी अशा प्रसंगी ती मंगलाष्टकं, पाळणे लिहीत असे. किसनचं लग्न ठरल्याचं आक्कानं सांगितलं आणि आईकडे मंगलाष्टकाची ’ऑर्डर’ दिली. "ताई, किसनच्या लग्नासाठी आम्हाला मंगलाष्टकं पाहिजेत बरं का. दोघांची नावं पण घाला त्यात! सुनबाईचं नाव कलावती आहे. आणि हो, किसनचं नाव बाळकृष्ण आहे हे लक्षात ठेवा नाहीतर चुकून किसनच घालाल!" असं म्हणून मनमोकळं हसली.   

      ह्याच किसनच्या लग्नाला ती मला आणि माधुरीला- माझ्या धाकट्या बहिणीला घेऊन गेली होती. मी तेव्हा बहुतेक नववी, दहावीत असेन. लग्न रीतीप्रमाणे मुलीच्या गावी होतं. सगळं वऱ्हाड ट्रकमधून लग्नाला गेलं. आम्हीही वऱ्हाडाबरोबरच गेलो. बंद ट्रकमधून केलेला तो प्रवास अगदी अविस्मरणीय आहे! लग्नाच्या गावी आम्ही पोहोचलो. आक्काच्या ऑर्डरीनुसार आईनं वधूवरांची नावं गुंफून मंगलाष्टकं रचली होती. आक्काने ती छापूनही घेतली होती. मांडवात त्या छापील प्रतींचं वाटप केलं आणि ’गावंढ्या गावात गाढवी सवाष्ण’ ह्या न्यायानं आक्कानं मलाच ती मंगलाष्टकं म्हणायला सांगितली. मी देवाचं नाव घेऊन माईक हातात धरला आणि ती मंगलाष्टकं म्हटली. त्याचंही आक्काकडून तोंडभरून कौतुक!  

      माझ्या आईवडिलांबद्दल, विशेषतः वडिलांबद्दल  तिला अतिशय आदर होता. आम्ही मुली जेवणाच्या टेबलाशी बसून गप्पा मारत असताना ती आली तर तीही आमच्याशेजारी बसून गप्पात सहभागी व्हायची. पण जर आईवडील तिथे असतील तर ती कधीही खुर्चीवर बसायची नाही. त्यांच्या समोर ती उंबऱ्यावर बसायची. काही वर्षांनंतर वडिलांनी समोरचाच वाडा विकत घ्यायचं ठरवलं. तर ते कळल्यावर आक्कानं लगेच "ती पुढची खोली मला द्यायची" असं आईला सांगून टाकलं आणि पुन्हा आम्ही एकाच वाड्यात राहायला लागलो आणि सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच चालू राहिल्या.

      आक्का आमच्या कुटुंबात अगदी सामावून गेली होती. कसलाही आपपरभाव तिच्या मनात नसायचा आणि प्रेमाशिवाय दुसरी कसली अपेक्षा नसायची. लग्नकार्य किंवा इतरही निमित्ताने आमच्याकडे जरा पाहुणेमंडळी जास्त आलेली असली की ती निरोप पाठवायची. "माझ्याकडं तपेलं तापत ठेवलंय. बारक्या मुलांना इकडं आंघोळीला पाठवा म्हणजे जरा लवकर उरकंल." अशाच गडबडीच्या वेळेला कोणी स्थानिक पाहुणे आले तर तेव्हाही तिचा निरोप :"मी वकीलसाहेबांसाठी इकडं कॉफी ठेवलीय. म्हणजे तुमच्या स्वयंपाकात गोंधळ नको." जरा चहापाणी जास्त झालं असेल तर ती कपबश्या विसळायलाही लागायची. माझा भाचा अमित सहासात वर्षाचा असताना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मित्रांना बोलावलं होतं आणि अमितच्या आवडीच्या नारळाच्या वड्या करायच्या असं ठरवलं होतं. पण ज्या बाई वड्या करणार होत्या त्यांचा अगदी आयत्या वेळेलाच निरोप आला की त्यांना काही कारणाने ते जमणार नाही. तासाभरात आक्का एक तरसाळं घेऊन आली आणि म्हणाली, "अमितच्या वाढदिवसाला नारळाच्या वड्या हव्या होत्या न? ह्या घ्या." तिने केव्हा दुकानात जाऊन नारळ आणले, केव्हा ते खरवडले आणि केव्हा त्याच्या वड्या केल्या आम्हाला काही कळलंच नाही!

      घरातल्या आजारीपणांच्या वेळी तर आक्काची उपस्थिती फार मोलाची असायची. तसं पाहिलं तर मोठ्या आजारीपणांमध्ये नातलग मदत करतातच पण बऱ्याचदा त्यांच्या आवडी/निवडी असतात, प्रत्येकाच्या ’अहं’चा प्रश्न असतो. "मला नाही बाई दवाखान्यात थांबायला जमायचं. मी आपली डबा देत जाईन." असे प्रकार असतात. पण आक्काचं तत्त्व  मात्र ’जहॉं कम वहॉं हम’ असं असायचं. प्रत्यक्ष परिस्थिती पाहून तिथे जे काय काम आवश्यक असेल ते ती समजून करत असे. मग ते कोणाचं डोकं चेपण्याचं काम असो किंवा रात्री जाऊन काही औषध वगैरे आणण्याचं असो. माझी मोठी बहीण उषा हिच्या यजमानांच्या ऑपरेशनच्या वेळी तसंच तिच्या नणंदेच्या दुखण्याच्या वेळी आक्कानं अशा प्रकारची मदत केली होती, त्याबद्दल उषा नेहमी बोलून दाखवत असते.  

      माधुरीला जेव्हा मुंबईत नोकरी मिळाली तेव्हा आजूबाजूच्या काही लोकांनी आडून तर काही लोकांनी सरळसरळ पगार किती असं विचारलं. गोदावरी आक्कानं पगाराची अजिबात चौकशी केली नाही. मात्र माधुरी मुंबईला जायला निघाली तेव्हा तिच्या हातात एक छत्री ठेवली आणि म्हणाली, "ही नव्या नोकरीसाठी आमच्याकडून छोटीशी भेट."  सुशिक्षितांमध्येही अभावानेच आढळणारा हा सुसंस्कृतपणा अल्पशिक्षित आक्काकडे कसा आला, याचंच आम्ही नवल करत बसलो.    

      मी मुंबईला भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरी करू लागले तेव्हाची पण एक हकीकत लक्षात राहण्यासारखी आहे. मुंबई मला नवीन होती. मुंबईतील अनेक गोष्टींचं मला नवल वाटत असे. पण मनाला सर्वात जास्त भिडल्या त्या नोकरी करणाऱ्या गृहिणी! पहाटे साडेतीन-चारला उठून स्वयंपाक करून, सर्वांचे डबे तयार करून कामावर जाण्यासाठी गाडी गाठणाऱ्या त्या महिलांचं मला कौतुक वाटायचं पण त्याहीपेक्षा जास्त दया यायची. असं वाटायचं पोळी-भाजीची पाकीटं करून आपण विकली तर अशा बायकांची किती सोय होईल! सुट्टी घेऊन मी वाईला गेलेली असताना आम्ही गप्पा मारत होतो. माझी नवी नोकरी, मुंबईतील आयुष्य असं बोलणं चाललं होतं. तेव्हाच मी पोळीभाजीच्या पाकिटासंबंधी बोलले. माझं वाक्य संपतंय न संपतंय तोच आक्का कडाडली, "खबरदार पुन्हा माझ्यासमोर असं काही बोललीस तर!" मी चमकून वर पाहिलं तर  तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. मी म्हटलं, "आक्का, अगं काय झालं?" तर म्हणाली, "तुला सांगून ठेवते,  पुन्हा माझ्यासमोर असलं काही वेडंवाकडं बोलायचं नाही!" मग माझ्या लक्षात आलं. ती ज्या काळात, ज्या वातावरणात वाढली होती त्यानुसार स्वयंपाक करून पैसे मिळवणे ही गोष्ट  फक्त उपजीविकेचं अन्य साधन नसलेली असहाय स्त्रीच करते अशी पक्की खूणगाठ तिच्या मनात बसलेली होती. मग मी तिला काळाची गरज, सामाजिक बांधिलकी वगैरे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर ती जे म्हणाली त्याने मात्र मी निरुत्तर झाले. ती जरा घुश्शातच म्हणाली, "हो! आहे माहिती ते!  पण ते काम करायला पुष्कळ माणसं आहेत. तू करतीयस ते काम किती जणांना करता येईल?"

      इतकी समंजस, विचारांनी परिपक्व अशी आक्का थोडी भाबडीही होती. एकदा वाईत ती आणि मी चित्रपट बघायला गेलो होतो. अनुपमा किंवा सत्यकाम चित्रपट असावा. मी तेव्हा चांगली मोठी, म्हणजे महाविद्यालयात जाणारी होते, पण मला चित्रपट पाहताना रडू काही आवरत नव्हतं. तर तिथे थेटरात आक्का माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणत होती, "अगं, तू कशाला इतकं वाईट वाटून घेतीयस? रडू नको, गप बघू! गप." मग मात्र मला माझं रडू आवरावंच लागलं!       

      माझ्या मुलाच्या जन्मानंतरचा एक प्रसंग तर माझ्या कायम लक्षात राहिलेला आहे. मुलाचा जन्म मुंबईत झाला आणि तो साधारण महिन्याचा झाल्यावर मी त्याला घेऊन वाईला आले. दारात स्वागताला आक्का उभी होतीच. तिचा चेहरा नुसता आनंदाने फुलला होता. मला म्हणाली, "मिराबाई, आमच्याकडे काही दोष नाही बरंका!" तिच्या ह्या वाक्यात फार मोठा अर्थ दडलेला होता. आम्ही चौघी बहिणी, आम्हाला भाऊ नाही. तेव्हा आजूबाजूच्या कुणीतरी उघड उघड किंवा आडून असं म्हटलं असेल की ह्या मुलींनाही मुलीच होणार. माझ्याही कानावर असं काही आलं होतं. ह्या पार्श्वभूमीवर उषाला मुलगा झालेला होता आणि आता मलाही मुलगा झाला. तेव्हा आता कुणाला काही बोलायला जागा नाही याचा तो आनंद होता. दुसऱ्याच्या सुखदु:खात इतकं समरस होणारं दुसरं माणूस माझ्या पाहण्यात नाही!

      आक्काबद्दल किती लिहू आणि किती नाही असं मला झालं आहे. पण तसं म्हटलं तर बालकवींच्या शब्दात थोडा बदल करून तिचं वर्णन चार ओळीतही करता येईल--

   प्रेम करावे, प्रेम स्मरावे
   सुखासमाधानात असावे
   याहून ठावे काय तियेला?
   साध्या भोळ्या गोदावरीला

      आता आक्काला जाऊन जवळजवळ सात वर्ष झाली. वयाच्या पंचाहत्तरीच्या आसपास लहानश्या आजाराचं निमित्त होऊन पण खरं म्हणजे वार्धक्यामुळेच ती गेली. तिची पुण्याईच अशी की तिला काही यातना झाल्या नाहीत.

      अजूनही आम्ही बहिणी वाईला गेलो की आक्काचा विषय हमखास निघतो. मोदकांच्या माळा, बंद ट्रकातला प्रवास, अमितच्या वाढदिवसाच्या नारळाच्या वड्या, तसंच आम्हाला कुठेकुठे हिंडायला नेणारी, आम्हाला हक्काने आणि मायेने रागावणारी आक्का हे सगळं आठवतं आणि डोळे पाणावतात. पण तेवढ्यात कुणाचातरी फोन येतो किंवा भांडीवाली  ’अजून जेवनं व्हयचीत व्हय?’ असं म्हणत येते आणि आम्ही नाविलाजानेच वर्तमानकाळात येतो!         

मीरा फाटक

 

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.