लहानपणापासूनच तिला सतत दुःखांना सामोरे जावे लागले. वयात येण्याच्या अगोदरच, विशेषतः स्त्रीजातीला कधीकधी जे पाशवी भोग भोगावे लागतात, तेही तिला भोगावे लागले. लग्नांनातर तर ती जुलुमी पुरुषी कचाट्यात सापडली. काही वर्षे अत्यंत विमनस्क स्थितीत काढल्यावर ती संपूर्ण खचली व तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तोही असफल झाला. विधात्याचा मनात दुसरेच काही होते, ह्याची तिला चाहूल नव्हती. नंतर ती थोडी सावरली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. आणि मग तिला एक वेगळाच ध्यास लागला-- आपण ज्या परिस्थितीतून गेलो, त्या परिस्थितीतच असलेल्यांना मदत करण्याचा. त्यासाठी ती जगाच्या दुसऱ्या टोकाला गेली आणि अक्षरशः शून्यातून तिने तिचे स्वप्न साकार केले.
![]() |
'क्रिस्टिना नोबल' ह्या आयरिश स्त्रीने तिच्या वयाच्या पन्नाशीपर्यंतच्या आठवणी 'अ ब्रिज अक्रॉस माय सॉरोज्' ह्या नावाने प्रसिद्ध केल्या आहेत. ह्या पुस्तकाला काही साहित्यिक मूल्य वगैरे आहे असा कुणाचा दावा नाही. पण ते कुठेतरी खोल परिणाम करणारे तर आहेच, तसेच तिचे स्वतःच्या ध्यासाने झपाटलेपण व त्यातून अल्प काळात उभी राहिलेली तिची संस्था हे सर्वच अद्भुत व खूप प्रेरणादायक आहे. त्या पुस्तकाची व क्रिस्टिनाच्या व्यक्तिमत्त्वाची ही ओळख. दुसरे महायुद्ध संपता संपता क्रिस्टिनाचा जन्म डब्लिनमधल्या एका गरीब कुटुंबात झाला. बायर्न्स पतिपत्नींना सहा मुले होती. थोरल्या दोन मुलांच्या पाठीवरची तिसरी क्रिस्टिना. तिची आई सुसंस्कृत कुटुंबातून आलेली होती, व ती अतिशय धार्मिक, श्रद्धाळू होती. तशीच ती खूप कामसूही होती. क्रिस्टिनाचा बाप मात्र अट्टल दारुड्या होता. तो गिनेस ह्या प्रसिद्ध ब्रूवरीत कामाला होता. त्या ब्रूवरीच्या तेव्हाच्या प्रथेप्रमाणे त्याला दररोज स्टाऊटचे दोन पाईंटस फुकट मिळायचे, व जास्त काम केल्यास अजून दोन. ह्या व्यतिरिक्त दिवसाचे कामाचे पैसे हातात पडले, की त्याची पाउले आपसूकच पबच्या दिशेने वळत. |
नंतर रात्री कधीतरी तो घराकडे परते. घरी आल्यावर फर्निचरची तोडफोड व पत्नीला मारहाण करणे हेही नित्याचेच.
बायर्न्स कुटुंब डब्लिनच्या लिबर्टीज ह्या गरीब वस्तीत राहायचे. आजूबाजूला सगळी गरीब कुटुंबेच होती, पण त्यातून ह्या कुटुंबाचे कंगालपण जास्त दाहक होते. बाप कंपनीच्या गेटातून बाहेर पडला रे पडला की त्याच्याकडून घरखर्चाचे पैसे घेणे हे क्रिस्टिनाचे रोजजेच काम होते. पण बाप चलाखी करायचा, दुसऱ्याच गेटातून निघून जायचा. घरी वीज केव्हाच कापली गेली होती, व विस्तवासाठी लाकूड, होते नव्हते त्या फर्निचरचे तुकडे करून घातले जायचे, अथवा त्यात जमिनीवरचे लिनोलियम किंवा भिंतींवरचा वॉलपेपर तुकडे करून घातले जायचे. सर्व कुटुंबाला संपूर्ण उपवास हे तर नेहमीचेच. सहा मुले एकाच पलंगावर, एकाच रजईमध्ये झोपायची, व कधीतरी फिश आणि चिप्स खायला मिळाले तर ती अक्षरशः पर्वणीच समजावी!
खूप बाळंतपणे, अपुऱ्या व निकृष्ट अन्नामुळे झालेली आबाळ, नवऱ्याची सततची मारहाण, ह्या सर्वांमुळे क्रिस्टिनाची आई, ती दहा वर्षांची असतानाच वारली. तिच्या निधनानंतर मुलांची सर्व प्रकारे परवड झाली. वडिलांचे ऑपरेशन करण्याचे ठरले, त्यामुळे मुलांना त्यांच्या एका जवळच राहणाऱ्या नातेवाईकाकडे ठेवण्यात आले. तिथे अमानुष मारहाण, क्रूर प्रकारचा छळ, इतकेच काय क्रिस्टिनावर त्या नातेवाईकाचीच बळजबरी हे सर्व त्यांच्या नशिबी आले. बाप बरा झाला पण तो मुलांची काळजी घेण्यास असमर्थ आहे, असे सिद्ध झाले व मुलांना वेगवेगळ्या अनाथालयांत पाठवण्यात आले. आपण भावंडे विभागले गेलो, हे क्रिस्टिनाला सहन होईना. तिने अनाथालयातून पळ काढला, पण कुणीही नातेवाईक आसरा देईना. तिने एक दोन वर्षे चक्क उघड्यावर, फिनिक्स पार्कात राहून, काढली. पण शेवटी धरपकड झालीच व मग तिची रवानगी झाली कठोर वागवणुकीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कॉनेमारा ह्या दूरच्या सुधारगृहात!
ती सोळा वर्षांची झाल्यावर कायद्याप्रमाणे तिची तेथून सुटका झाली. तिथून निघताना तिला थोडेसे कपडे, साबण, एक सूटकेस व पाच पाउंड दिले गेले होते. तिला भेटायला वडील डब्लिन स्टेशनात आले होते. त्यांनी तिचे पैसे चलाखीने पळवले, व ते पबमध्ये गायब झाले. आता परत आसरा शोधणे भाग होते. कुणीही नातेवाईक तिला उभे करेनात, तेव्हा नाईलाजाने ती 'त्याच' नातेवाईकाच्या घरी गेली. त्याने तिला बघताक्षणीच जवळ खेचून अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. तेव्हा हातातली सूटकेस तिथेच टाकून ती पळाली, ते थेट फिनिक्स पार्कात! असे उघड्यावर राहताना एका रात्री तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. त्यापासून ती गर्भार राहिली. कालांतराने सरकारी इस्पितळात तिने मुलाला जन्म दिला, व तिला व मुलाला कुमारी मातांच्या गृहात पाठवण्यात आले. दोनएक महिन्यात मुलाला तिच्या अपरोक्ष परस्परच कुठेतरी दत्तक देण्यात आले. आणि तिलाही नंतर एका कुटुंबात दाईची नोकरी लावून देण्यात आली. आपले मूल आपल्यापासून दुरावल्यावर तिथे राहणे तिला अशक्य झाले. मग तिने निर्णय घेतला तो आयर्लंडपासून दूर, इंग्लंडात जावयाचा.
बर्मिंगहॅमला तिने एक नोकरी पत्करली, व एका नव्याने झालेल्या मैत्रिणीने तिची ओळख मॅरिओ ह्या ग्रीक तरुणाशी करून दिली. मॅरिओ चलाख व अदबशीर होता, त्याने पहिल्याच भेटीत क्रिस्टिनाला जिंकले, ते तिला खाणे ऑफर करून! आतापर्यंत तिला सगळ्यांनी झिडकारले होते, व कुणीतरी आपल्याला आदराने काहीतरी देऊ करते आहे हा अनुभव निराळाच होता! क्रिस्टिना मॅरिओच्या प्रेमात पडली व त्याच्याबरोबर राहू लागली. त्या ग्रीक कुटुंबाचे फिश अँड चिप्सचे दुकान होते, तिथे ती त्याच्या कामात त्याला हातभार लावू लागली. काही दिवस चांगले गेले, पण मग मॅरिओतला पुरुष जागा झाला. ह्यापुढे तेरा वर्षे म्हणजे सततची विनाकारण अमानुष मारहाण, तिची 'मूर्ख आयरिश' असे म्हणून सर्वांसमोर मानहानी, स्वतःच्या मैत्रिणी घरात आणून तिच्यासमोरच त्यांच्याशी प्रेमाचे चाळे ह्यांची मालिका होती. मुले झाली होती, व त्यामुळे क्रिस्टिना बंधनात अडकली होती. ह्या तेरा वर्षात मारहाणीमुळे तिचे दोन गर्भपात झाले, व तीनदा तिला मनोरुग्णांच्या इस्पितळात भरती व्हावे लागले. शेवटी तिने निग्रहाने मुलांना तसेच सोडून मॅरिओपासून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुले तिथेच सोडणे अगदी जीवावर आले होते, पण त्यांना घेऊन पळून गेल्यास मॅरिओ त्यांना शोधून काढतो वा परत जावे लागते, ह्या अनुभवापासून तिने हा कठीण निर्णय घेतला होता.
ह्यानंतर क्रिस्टिनाच्या जीवनात प्रथमच खऱ्या अर्थाने बहार आली, ती सायमन नोबलच्या रूपात. सुशिक्षित, व खानदानी कुटुंबातला सायमन तिला समजू शकला, धीर देत राहिला. तिच्यातही स्वत्व: आहे, ह्याची पहिली जाणीव सायमनने तिला करून दिली. तिने मग मॅरिओपासून घटस्फोट घेतला, रीतसर मुलांचा ताबा मिळवला व सायमनशी लग्न केले. पुढील काही वर्षे, होऊन गेलेल्या घटनांचा मनावर झालेल्या परिणामांचा, मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने निचरा करण्यात गेली. आता क्रिस्टिना मुक्त होती, स्वतःची जाण तिला आली होती. तिने कॅटेरिंगचा व्यवसाय सुरू केला. सायमन नोकरी सोडून उच्च शिक्षण घेत होता, व घरसंसार चालवणे भाग होते. ह्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगले यश आले. मुलेही आता आपापल्या मार्गाला लागली होती, व सायमनही त्याच्या परीने त्याच्या!
आता क्रिस्टिनाला ध्यास लागला तो व्हिएतनामला जायचा! अनेक वर्षांपूर्वी मॅरिओबरोबर राहत असताना तिला एकदा अचानक एक स्वप्न पडले होते. त्या स्वप्नात काही नागडी उघडी मुले हात उंचावून तिच्या दिशेने धावत येत होती. मला हात लाव, आपलेसे कर, असे ती सांगत होती जणू! आणि त्यांच्या मागे आकाशात तेजस्वी अक्षरांत 'व्हिएतनाम' असे लिहिलेले होते! त्यावेळी मॅरियोला हे सांगितल्यावर त्याने तिला नेहमीपेक्षा जास्त मारहाण केली होती. पण ते स्वप्न तिच्यावर कायमचे कोरले गेले होते. ती मुले तिला बोलावत होती, आम्हाला घे, असेच सांगत होती जणू! शेवटी तिने व्हिएतनामला जायचे ठरवले. बरोबर जुजबी कपडे, थोडेसे पैसे, सामाजिक कार्य करण्याचा शून्य अनुभव, त्या देशात काय परिस्थिती आहे ह्याबद्दल संपूर्ण अज्ञान, एव्हढ्या भांडवलावर ती निघाली होती.
* * *
ती गेली थेट हो चि मिन्ह शहरात. तिथे रेक्स हॉटेल हे पाश्चिमात्य लोकांसाठी असलेले एक प्रख्यात हॉटेल होते, तिथे ती उतरली. सकाळी उठून बाहेर फिरायला निघाली. आजूबाजूचे सर्वच वातावरण निराळे होते. दुकाने रस्त्याच्या कडेने दाटीवाटीने लागली होती. रस्त्यात व कडेने खूप घाण, मानवी विष्ठापण, होती. पण खाद्यपदार्थाचे स्टॉलही तिथेच होते, माणसे सरळ मोटरसायकलवरूनच दुकानात सौदे करत होती, त्या घाणीत उंदीर खुशाल फिरत होते, पण कुणालाच त्याची पर्वा दिसत नव्हती. एकदोन दिवस असेच नुसते उजाडपणे भटकण्यातच गेले. आजूबाजूला अनेक मुले रस्त्यावर दिसत राहायची. सर्व अर्धवट उघडी, नागडी अशी, त्यातून बऱ्याच मुलांना हातपाय नव्हते. ती मुले भीक मागत बसलेली दिसायची, किंवा नुसतीच भकासपणे बसलेली असायची. एके दिवशी क्रिस्टिनाचे लक्ष समोरच रस्त्यापलीकडे बसलेल्या दोन लहान मुलींकडे गेले. त्या अगदी लहान, सुमारे तीन चार वर्षांच्या असाव्यात. फाटके तुटके कपडे, नाक वाहते आहे, डोक्यात केसांच्या जटा झाल्या आहेत अशा त्या दोन मुली. त्यातील एका मुलीने तिचे काळेभोर डोळे क्रिस्टिनावरच रोखले होते, व ती हात पसरून क्रिस्टिनाला 'दे, दे' अशा अर्थाने सांगत होती. क्रिस्टिनाने निग्रहाने त्यांच्यापासून नजर दूर वळवली, व ती त्यांना टाळून पुढे चालू लागली.
पण तसेच थोडेसे पुढे गेल्यावर तिने, का कोण जाणे, मागे वळून त्यांच्याकडे बघितले. त्या मुली तिच्याकडेच बघत होत्या. 'तूही, अजून एक, आम्हाला झिडकारून निघून गेलीस,' असे त्या म्हणताहेत, असे क्षणभर क्रिस्टिनाला वाटून गेले. कुठल्यातरी आवेगाने ती त्यांच्या दिशेने चालू लागली. त्यातील मोठी मुलगी होती, ती तिच्याकडे टक लावून बघत होती. तिचे हात पसरलेले होते, पण मघाप्रमाणे भीक मागण्यासाठी नव्हे, तिचे पंजे खाली वळवलेले होते. मला स्पर्श कर, मला आपली म्हण, एव्हढीच तिची माफक मागणी असावी, जणू! असे क्रिस्टिनाकडे टक लावून बघत असतानाच एक मुंगी तिने सहज तोंडात टाकली, नजर स्थिर क्रिस्टिनावर. एक निर्णायक क्षण आता आपल्या जीवनात आला आहे, ह्याची क्रिस्टिनाला जाणीव झाली. ह्या मुलींना मी आता स्पर्श केला, त्यांना उचलून घेतले, तर मी इथेच 'अडकणार' ह्याची तिला खात्री होती. काय करावे? काही क्षण ती विचारात पडली. मग तिचा निर्णय पक्का झाला. ती पुढे झाली व तिने त्यांच्याशेजारी चक्क फतकल मारली. त्या दोघी मुलींना जवळ ओढून घेतले. त्यांच्या तोंडावरून हात फिरवताना डोळ्यात पूर मावत नव्हता.आणि आता निश्चय पक्का झाला होता. पुढच्या मार्गात काय आहे, तो आपण कसा पार पाडणार आहोत, ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण आता त्या मार्गावरून जायचे पक्के झाले होते.