क्रिस्टिना धनाची मदत देशांदेशांतून गोळा करण्याचे काम करतेच, तसेच ती मुलांशी बसून त्यांना आदराने बोलते करण्याचे कामही करते. ह्या मुलांना त्यांचा हरवलेला आत्मसन्मान परत मिळाला पाहिजे, ही तिची नेहमी तळमळ असते. आपण जेव्हा अनाथ म्हणून रस्त्यावर राहात होतो, तेव्हा कुणीतरी आपल्याशी बोलावे, आपली वास्तपुस्त करावी ह्याच्यासाठी आपण किती तडफडत होतो, हे ती कधीही विसरू शकत नाही. मुलांना अर्थातच अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे आहे; पण त्याही पलीकडे त्यांना पाहिजे तो जिव्हाळा, ओलावा. रस्त्यावर राहणारी सर्च मुले काही अनाथ नसतात पण ज्यांना घरे आहेत, अशीही बरीच मुले रस्त्यावर का येतात? तिच्या मते असे होते, कारण घर म्हणजे आनंद, स्थैर्य, ओलावा, वात्सल्य असे काहीही न राहाता ह्या मुलांच्या बाबतीत तो एक तुरुंग, एक यातनाघर बनून राहते. घरी राहिले तर मारहाण, छळ हे सर्व होणार, त्यापेक्षा मग बाहेरच स्वतंत्र राहिले तर चांगले, अशा विचाराने ही मुले घराबाहेर पडली असतात.
ह्या सर्व नेहमीच्या कामांबरोबर क्रिस्टिना रात्री बेरात्री शहरात भटकून लहान मुलांशी लैंगिक चाळे करणाऱ्या लोकांशी तिच्या पद्धतीने सामना करते. ही मंडळी परदेशी असतात. शहरातील काही ठरावीक क्लब्समधून त्यांचे मुले टेहेळणे चालते, हे ओळखून क्रिस्टिना अशा क्लब्सच्या आसपास उभी राहते. आता शहरातील बहुसंख्य बेघर मुलेमुली ओळखतात, त्यांची ती 'ममा टिना' आहे. ममा टिनाला ह्या मुलांकडूनच ह्या असले चाळे करण्याऱ्या लोकांबद्दल माहिती मिळत राहते. ही कृत्ये करण्यात पाश्चिमात्य देशातील पुरूष आहेतच, पण जपानी, सिंगापुरी, तैवानी हेही आहेत. किंबहुना तिच्या म्हणण्यानुसार ही पौर्वात्य मंडळीच व्हिएतनाममध्ये ह्याच्यासाठी अगोदर गेली, नंतर जेव्हा थाईलंडमध्ये ह्यासंबधित कायदे बनू लागले व त्यांची कडक अंमलबजावणी सरू झाली, त्यानंतर ह्यांतले अमेरिकन, जर्मन इत्यादी लोक कंबोडिया व व्हिएतनामकडे सरकले. 'ते तसे इथे उशीरानेच आले म्हणायचे' ती म्हणते. अगदी दबा धरून बसून, बरोबर हेरून तिने एकदा एका ब्रिटिश व दुसऱ्या वेळी एका सिंगापूरी माणसाला कसे हातोहात पकडले व त्यांनी त्यांच्या हॉटेलरूमवर नेलेल्या मुलेमुली ओढून कशा परत आणल्या, ह्याचे तिने साद्यंत वर्णन पुस्तकात केलेले आहे. ह्या दोन्ही वेळां 'ती तर रस्त्यावरचीच मुले आहेत, मी हे जे त्यांच्याशी करतोय, त्यात काय गैर आहे?' असे युक्तिवाद केले गेले, हे व्यथित करणारे आहे. कहर म्हणजे तिला एकदा एक युरोपियन माणूस काही लहान मुलांना नदीकिनारी नेऊन, त्यांना खड्ड्यात बसवून, त्यांचे नग्नावस्थेतले फोटो काढताना आढळला. त्याला तिने पकडले खरे, पण 'हे मी एका नामवंत धर्मदाय (Charity) साठी करतोय, असे सांगून त्याने तिला त्याचे बिझीनेस कार्डच दिले. 'असे फोटो प्रसिद्ध केले, तरच लोकांना कणव येते, व मग संस्थेला पैसे मिळू शकतात' असे त्याचे म्हणणे होते. क्रिस्टिनाने त्याला हे करण्यापासून त्या रात्रीपुरते तरी थांबवले. पुढे तिला कळले की ह्या बहाद्दराला काहीच महिन्यांपूर्वी फिलिपाईन्समधून असेच उद्योग केल्याबद्दल हाकवलून देण्यात आले होते.
अनेक कारणांनी रस्त्यावर आलेली लहान मुले व मुली हा सर्वच गरीब देशांतून दिसणारा प्रश्न व्हिएतनाममध्ये आहेच, पण तेथे अजून एक मानवनिर्मित समस्या आहे ती 'एजंट ऑरेंज' च्या दु:ष्परिणामांची. तेथील 'युद्धात' अमेरिकेने विषारी वायुंचा सर्रास वापर केला, त्याचे परिणाम तेथील जनता अजूनही भोगत आहे, असे क्रिस्टिनाला आढळले. त्वचेचे विविध प्रकारचे कॅन्सर तेथील मुलांना असतात. तसेच बरीच गरीब कुटुंबातील मुले काही अवयवांविना जन्माला आलेली असतात. वैद्यकीय सेंटर स्थापन करण्यामागे इतर मुलांप्रमाणेच, अशा मुलांनाही मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.
क्रिस्टिनाने अक्षरशः शून्यातून निर्माण केलेल्या कार्याने आता चांगलच जोम धरला आहे. सेंटर स्थापन होता होता तिने क्रिस्टिना नोबल फ़ाउंडेशनची रितसर स्थापना केली आहे. ही संस्था जगातल्या प्रमुख देशांमधे नोंदवली गेली आहे. सेंटर सुरू झाल्यावर एक-दोन वर्षांतच क्रिस्टिनाना खुद्द व्हिएतनामी सरकारने हनोईला तसेच कार्य चालू करण्याची विनंती केली, ही तिच्या कार्याला मिळालेली मोठीच पावती होय.
क्रिस्टिनाची आई धार्मिक होती, व त्यामुळे क्रिस्टिना मुळात देव व दैव हे दोघेही मानणारी आहे. पण वयात येतायेताच काही अनुभव तिने असे घेतले की त्यामुळे कॅथॉलिक संस्थांबद्दल तिच्या मनात अढी निर्माण झाली. असे अनेक प्रसंग तिने ह्या पुस्तकात कथन केले आहेत. जेमतेम नऊ-दहा वर्षाची असताना बापाची वाट बघत पबबाहेर बसलेली असता तिला जिन पाजून 'माझ्या घरी चल, तुला सर्वोत्कृष्ट फर्निचर दाखवतो' असे सांगणारा, व हे असे सांगतानाच आजूबाजूने कुणी आलेगेले की 'काय गं पोरी, तू इथे पबबाहेर काय करते आहेस? चल घरी जा बघू' असे सांगणारा पाद्री, कॅथॉलिक सुधारगृहात कठोरपणे मारहाण करणाऱ्या नन्स, फिनिक्स पार्कात रहात असताना भुकेने पोटात पडणारी आग शमवण्याकरता चर्चमधे जाऊन मेणबत्तीचे विरघळलेले मेण तिला खाताना बघितल्यावर सरळ तिला बाहेर हाकून देणारा पाद्री, हे सर्व तर आहेच, पण तिने खूप सविस्तरपणे कथन केली आही ती सिंगापूरच्या एका अत्यंत सधन चर्चच्या फादरकडून मिळालेली वागणूक. सेंटर सुरू करण्याचा काळात कुणीतरी तिला ह्या चर्चबद्दल सांगितले व तेथील फादर सायमनचा संदर्भ दिला. एकंदरीत ओढगस्तीची परिस्थिती अस्तांनासुद्धा क्रिस्टिना मोठ्या आशेने तिथे गेली, फादर सायमनना भेटली. आपल्या कार्याबद्दल, सेंटरबद्दल तिने सगळी माहिती फादरना दिली, व त्यांनी जमेल त्याप्रमाणे आपल्या कार्यस्थळाला भेट द्यावी, म्हणजे त्यांना त्या कार्याची प्रत्यक्षच ओळख होईल, असे विनंतीही केली. 'मी आज रात्री जरा कामात आहे, पण तू व्हिएतनामला परतण्याअगोदर मी तुला कळवीन काय ते" फादर म्हणाले. दुसऱ्या दिवशी तिने बरीच वाट बघितली, पण ना फादर आले, ना त्यांच्याकडून काही निरोप. आता ती हॉटेलातून जायला निघणार इतक्यात फादरकडून एक निरोप्या दोन पार्सले घेऊन आला. एक पार्सल छोटे होते, व त्या पुडक्यात पैसे आहेत असे त्याला चाचपल्यावर वाटत होते. दुसरे पार्सल जरा मोठे होते, त्यांत काय होते कुणास ठाऊक. पण आपले काम झाले आहे, ह्या आनंदात क्रिस्टिना व्हिएतनामला परतली व मदान ञंगूयेन व काही मुलांसमोर तिने ती पार्सले उघडण्यास आरंभ केला. मोठ्या पार्सलात जीझसच्या वाळूत उमटलेल्या पावलांचे चित्र होते. 'हे ठीकच आहे, पण हे काही मी मुलांना खाऊ घालू शकणार नाही. पण लहान पुडक्यात नक्कीच पैसे असणार बघा' ती म्हणाली. मोठ्या आशेने तिने ते पुडके उघडले. त्यात त्या मोठ्या चित्राच्या छोट्या प्रतिकृती होत्या! 'मी ते मोठे चित्र कुणालातरी देऊन टाकले व लहान प्रतिकृती फेकून दिल्या. मग मी मनसोक्त रडून घेतले. लहान असताना मला जेव्हा अन्नाचा कण पोटात घालण्याकरिता मिळत नव्हता, तेव्हा मी त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले होते. त्यांनी मला खाण्यासाठी प्रार्थना, व पायात घालण्यासाठी प्रार्थनाच दिल्या. आता जेव्हा मी व्हिएतनाममधल्या मुलांना देण्यासाठी अन्न व औषधांची मागणी घेऊन गेले, तेव्हाही त्यांनी मला परत प्रार्थनाच दिल्या. ... काहीच बदलले नाही, काहीच बदलले नाही...!'
आता जगभर झालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून क्रिस्टिनाला भेटायला येतात, तिचे कार्य बघण्यास येतात. ह्याबाबतचे काही गमतीशीर किस्सेपण जाताजात ती सांगते. एका बाईला म्हणे क्रिस्टिनाला हाताशी घेऊन कम्यून्स प्रस्थापित करायचे होते. एकदा तिबेटामध्ये राहणाऱ्या कनेडियन हेयरड्रेस्सरने कुठेतरी तिच्याबद्दल वाचले, व तो थेट तिच्यापाशी येऊन थडकला. 'आज मला माझा गुरू मिळाला, आजपासून मी तुझा शिष्य' तो म्हणू लागला. काहीजणांना तिच्या मदर तेरेसा दिसते, ह्याबद्दल मात्र तिचा आक्षेप आहे. 'मदर तेरेसाला संत करतील बहुतेक' ती लिहिते (पुस्तक १९९४ सालचे आहे). 'पण मी हे जरूर सांगू इच्छिते की मी मदर तेरेसा नाही. मला अजूनही अनेक गोष्टी करण्यास मनापासून आवडतात व मी त्या बिनदिक्कत करतेही. उदा. कधीतरी क्वचित एखाद्या संध्याकाळी मी फ्लोटिंग होटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जाते, शांत विस्की पिते. मला गाणी गायला फार आवडतात, व तेही मी कधीतरी काही ठरावीक क्लबात जाऊन करते. मला लिपस्टिक लावण्यास आवडते, मधूनच कधीतरी मी लावते की ती. तसेच सुसाट वेगाने जाणाऱ्या होंडावर मागच्या सीटवर बसणे हेही मला आवडते. कधी लहर आली, की मी एखादा सायक्लो (सायकल रिक्शा) घेते, त्या रिक्शावाल्याला मागे सीटवर बसवते, व मीच ती सुसाट वेगात शहराच्या रस्त्यांतून पळवते!... छे, छे, मी मदर तेरेसा अजिबात नाही!'
स्वतःच्या आयुष्यात अनेक दु:खे झेललेली, पण ती सर्व मागे टाकून, झपाटल्याप्रमाणे दूर व्हिएतनाम देशाच्या, तिच्यासारख्याच दु:खात असलेल्या लहान मुलांना काही मदतीचा हात देता येण्यासाठी कार्यरत राहणारी, अत्यंत साधेपणाने अजूनही राहणारी, आपले लक्ष्य कधीही नजरेआड न करणारी क्रिस्टिना मनावर कायमचा ठसा करून जाते.
प्रदीप
[ 'A Bridge Across My Sorrows' Christina Noble with Robert Coram. Corgi Books 1994. ISBN 0-552-14288-3].