![]() |
असे पक्के झाले खरे, पण पहिले काही दिवस नुसते समोर भेटतील, त्या आजूबाजूच्या रस्त्यांवरच्या मुलांची खेळण्यात, त्यांना आइसक्रीम पार्लरमधे घेऊन जाऊन आइसक्रीम खाऊ घालण्यात, त्यांच्याशी ओळख करून घेण्यातच गेले. त्या मुलांना दहादहाच्या बॅचमध्ये रेक्स हॉटेलच्या स्वीमिंग पूलवर नेऊन तिकडच्या शॉवरखाली त्यांना आंघोळ करू देणे, व त्यादरम्यान पाय धुण्याच्या जागेत त्यांचे कपडे स्वतःच्या हाताने धुवून, वाळवून त्यांना परत घालणे असले अनोखे व हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना व पाहुण्यांना धका देणारे उद्योगही तिने ह्या काळात केले.
रस्त्यात भटकणाऱ्या मुलामुलींना जर हे शाबीत करता आले नाही, की ती त्याच शहरात राहणारी आहेत, तर पोलिस पकडून त्यांची रवानगी दूर कुठल्यातरी कँपमध्ये करायचे, हे क्रिस्टिनाला कळले.एके दिवशी तिच्याबरोबर असलेल्या घोळक्याला पोलिसांनी आइसक्रीम-पार्लरमधे येऊन पकडले. |
त्यांची शहानिशा केली व जे तिथले नव्हते, त्यांची रवानगी कँपात करण्याची तजवीज केली. क्रिस्टिनाने खूप आरडाओरडा केला, पण कायदा हा कायदा होता. ती व्यथित झाली. अशा तऱ्हेने मुलांना कुठल्यातरी कँपात डांबल्याने ती गुन्हेगारीकडे वळतात, असे तिचे म्हणणे होते. हा सगळा अनुभव तिने स्वतःच घेतला होता ना!
ही अशी सोनेरी केसांची गोरी बाई येऊन हे सर्व का करते आहे, अस प्रश्न बरेचदा विचारला जायचा. तिचे उत्तर असायचे की तीही त्या रस्त्यावरच्या मुलांतलीच एक आहे. ती मुले जे भोगता आहेत, त्यातून ती स्वतः गेली आहे, त्यांच्या दुखा:ची तिला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून त्यांचे जीवन जरातरी सुधारावे, ह्यासाठी तिचा हा खटाटोप चालला आहे. 'पण मग इथे एव्हढ्या दूर, व्हिएतनाममधे का?' असे विचारले की ती तिच्या स्वप्नाबद्दल सांगायची. तिचे हे विस्कळीत स्वरूपाचे 'कार्य' आता बऱ्याच लोकांच्या नजरेत येऊ लागले होते. बरेचदा क्रिस्टिना आपल्यातल्या आयरिश व्यक्तिमत्त्वाचा खुबीने वापर करून घ्यायची. आयरिश माणसे खूप अघळपघळ तसेच भावनाप्रधान असतात आणि आपल्या भावना, आपला क्षोभ उघडपणे व्यक्त करायला त्यांना अजिबात लाज वाटत नाही. ती वेळप्रसंगी मोठ्याने रडतील, तुमच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न, जरूर असेल, तर खुशाल करतील. ती त्याला 'I put Irish on them...'असे म्हणते. आइसक्रीम पार्लरमधे मुलांची धरपकड झाली त्यावेळी क्रिस्टिनाने हे सर्व केले होतेच. हे सर्व नक्कीच सरकारात कुठेतरी पोहोचले असावे.
त्यात क्रिसमस आला. क्रिस्टिनाने त्या रस्त्यावरच्या मुलांसाठी त्यानिमित्ताने एक पार्टी आयोजली. रेक्स हॉटेलमधेच तळमजल्यावरच एक रेस्टॉरंट होते, ते तिने क्रिस्मसच्या आदल्या दुपारसाठी राखून ठेवले. मॅनेजरला फक्त एव्हढेच सांगितले होते, की तिचे सुमारे १५० पाहुणे येतील, त्या पार्टीसाठी. त्यांच्यासाठी भात व चिकन असा साधाच बेत पाहिजे, साथीला ऑरेंज ज्यूस. आता आजूबाजूची व्हिएतनामी जनताही तिला ओळखू लागली होती, व मदत करू लागली होती. त्यांच्या मदतीने तिने ह्या सर्व पाहुण्यांसाठी भेटवस्तू घेतल्या, सुबक वेष्टनात बांधून ठेवण्याची व्यवस्था केली. पार्टीसाठी फुगे, आवाज करणाऱ्या पिपाण्या हे सर्व तयार ठेवले. मुले हळूहळू आली, आणि हे सर्व बघून हरखून गेली. पण अशी मुले अचानक आलेली बघून मॅनेजर गोंधळला! 'हेच माझे पाहुणे आहेत, चला, त्यांच्या सरबराईला लागा, त्यांना ज्यूस द्या..' क्रिस्टिना म्हणाली. आता नाईलाज होता. मॅनेजर व त्याचे कर्मचारी मुलांना सर्विस देऊ लागले. काही खाद्यपदार्थ जे अगोदर देण्यासाठी सांगून ठेवले होते, ते आणू लागले. पण त्या कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा लपत नव्हता. त्यातला एक जरा जास्तच उर्मटपणा करत होता, मुलांवर उगाचच डाफ़रत होता. क्रिस्टिनाने खास 'लिबर्टीच्या पद्धतीने' त्याला समज दिली. पार्टी चालू होती, आणि एक घटना घडली. त्याचे असे झाले, एक छोटासा मुलगा खुर्चीवरून खाली ढकलला गेला होता. त्याने जमिनीवर लोळत भोकांड पसरले. क्रिस्टिना त्याच्याजवळ गेली, तिने तिथेच खाली बसून त्या मुलाला मांडीवर घेतले, त्याचे रडे थांबवले, व मग त्याला खुर्चीवर बसवून त्याच्या हातात पिपाणी दिली. सर्व कर्मचारी अवाक् होऊन हे बघत राहिले. पण ह्या तिच्या सहज पण अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कृतीने जादूची कांडी फिरल्यासारखी झाली. सर्व कर्मचाऱ्यांना तिची तळमळ जाणवली. त्यांच्यातल्या स्त्री कर्मचाऱ्यांना तर तिचे त्या मुलाला अगदी सहजपणे जवळ घेणे विशेष आवडले. मग त्या सर्वांची सर्विस शांत व रीतसर झाली, ते सर्वही मुलांशी हसतखेळत बोलू लागले. वातावरणात एक वेगलाच मोकळेपणा आला. मग भेटी वाटल्या गेल्या आणि सरतेशेवटी क्रिस्टिनाने सर्व कर्मचाऱ्यांची व मुलांची हाताची साखळी केली, व 'वी आर द वर्ल्ड' हे गाणे म्हटले.
शहराचे डेप्युटी चीफ प्रॉसिक्युटर श्री. बाँग हे एका मुलांच्या संस्थेत मानद कार्यवाह होते. त्यांनी क्रिस्टिनाला त्या संस्थेतल्या मुलांसमोर बोलण्याचे निमंत्रण दिले. अशी सुरूवात झाली असली तरी अजून कार्य करण्याचा ठोस मार्ग सापडत नव्हता. एके दिवशी विमनस्क मनस्थितीत क्रिस्टिना रस्त्यावरून वाट फुटेल तिथे भटकत फिरत असताना अचानक तिची नजर एका अनाथालयावर पडली. ती आत गेली, तिथल्या मुख्याधिकारी मदाम ञंगूयेन थी मन ह्यांच्याशी ओळख़ करून घेतली. व तिने तो अनाथालय फिरून बघितला. अनेक मुले जमिनीवर, खाटांवर कशीतरी लोळत पडली होती. सर्वदूर मलमूत्राचा वास भरलेला होता. तशीच ती मुले निर्जीव डोळ्यांनी पडली होती, बसली होती. त्यातून त्यातली बरीचशी अंध होती, काहींना अवयवच नव्हते! क्रिस्टिना प्रय्तेक मुलाच्या जवळ जाऊन त्याला घट्ट हृदयाशी धरू लागली. हे जाणवल्यावर अनेक रांगती बाळे तिच्या दिशेने येऊ लागली. ती जमिनीवर बसली, सर्व मुलांना खूप घट्ट धरती झाली. मदाम ञंगूयेन हे सर्व शांतपणे बघत होत्या. असे काही लोक येऊन करतात, ह्याची कदाचित त्यांना थोडीशी सवय असावी. शेवटी क्रिस्टिना जाण्यासाठी उठली. जाता जाता तिने मदाम ञंगूयेन ह्याना तिला तिथे काम करू देणाची विनंती केली. त्या इमारतीच्या मागेच, पण अनाथालयाच्या आवारातच एक पडका वाडा तिला दिसला. 'त्या वाड्यात आपण अनाथ मुलांकरिता वैद्यकीय व सामाजिक मदत करणारा विभाग स्थापन करूया' क्रिस्टिना मदाम ञंगूयेनना म्हणाली. त्या नुसत्या थोड्याशा हसल्या.
क्रिस्टिनाने हे मनावर घेतले. परिसरात राहणाऱ्या परदेशी लोकांकडून धनाची मदत मिळते का, हे ती बघू लागली. सुरुवातीला निराशाच पदरी पडली. 'तू हे जे करते आहेस, त्यातून काहीही होणार नाही,'असा सल्ला तिला वारंवार मिळत राहिला. जपानी व्यापारी तेव्हा तेथे खूप संख्येने होते, पण हे असले काही ऐकायला सुद्धा त्यांच्यापाशी वेळ नव्हता. शेवटी एका ब्रिटिश तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने दहा हजार डॉलर्सची देणगी देऊ केली. ह्यानंतर अजून काही ब्रिटिश कंपन्यांकडून भरघोस देणग्या मिळाल्या. ह्या सुरूवातीच्या देणग्यांतून त्या वाड्याचा जरूरीपुरता जीर्णोद्धार केला, व महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे घेता आली.
मदाम ञंगूयेन थोड्याशा अस्वस्थ झाल्या होत्या, कारण त्यांच्या मते क्रिस्टिनाने लवकरात लवकर हनोईस जाऊन तिच्या काम करण्यासाठी जरूरी असलेली सरकारी परवानगी घेणे हे अत्यावश्यक होते. शेवटी एकदा क्रिस्टिनाने ते मनावर घेतले. हनोईची तीन सरकारी अधिकाऱ्यांसमवेतची मीटिंग तिने व्यवस्थित निभावून नेली. 'माझ्याकडे हे असे करण्यासाठी आवश्यक असणारे काहीही ज्ञान नाही, पण मी त्यातून गेले आहे, त्या मुलांची वेदना मला समजते, व आपण संधी दिलीत, तर मी कसोशीने प्रयत्न करीन,' ती त्या अधिकाऱ्यांना म्हणाली. तिने त्यांच्यावर अर्थातच आयरिश-परिणामही केला. तिने हेही त्यांना पटवून दिले की हे सगळे करण्यात तिचा काहीही अंतस्थ हेतू नाही. ती राजकारणी नाही, ती फक्त एक गृहिणी आहे, आणि त्यापूर्वी तीही रस्त्यावरचीच व्यक्ती होती. तिचे म्हणणे त्यांना पटले, व कधी नव्हे तो एका परदेशी व्यक्तीला त्या कम्युनिस्ट राजवटीत सामाजिक कार्य करण्याचा परवाना दिला गेला. क्रिस्टिना व मदाम ञंगूयेन ह्यांनी कामाचा झपाटा लावून त्या सेंटरचे उद्घाटन २३ डिसेंबर १९९१ साली केले. क्रिस्टिनाला व्हिएतनाममधे येऊन जेमतेम दीड वर्ष झाले होते, ह्यावेळेपर्यंत! हळूहळू सेंटरमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, त्यांचे मदतनीस तसेच मुलांच्या मनाची जडणघडण करणारे असे सर्व मिळून ५० कर्मचारी काम करू लागले.