- बटाटे - १/२ किलो
- मटार १/४ किलो
- पनीर - १५० ग्रॅम
- कॉर्न स्टार्च ५० ग्रॅम
- जीरे पावडर १ चमचा
- बडीशोप १ चमचा
- आलं पाव इंच
- लसूण ४ पाकळ्या
- हिरव्या मिरच्या २ नग
- चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
- पुदीन्याची पाने अर्धी वाटी
- लिंबाचा रस १ चमचा
- मीठ चवी नुसार
- तेल, तळण्यासाठी
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे गरम असतानाच सोलून घ्या. त्यात कॉर्नस्टार्च आणि चवीनुसार मीठ घालून ते नीट मळून एकजीव गोळा करून घ्या.
पनीर मोडून त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या. पनीरचे सुपारीच्या आकाराचे गोळे करून बाजूला ठेवून द्या.
हिरवे मटार मीठ आणि किंचित सोडा घालून झाकण न ठेवता शिजवून घ्या. अगदी बोटचेपे न शिजवता जरा जास्त शिजवून घ्या. शिजलेले मटार, गरम असतानाच, रोळी अथवा तत्सम जाळीदार भांड्यात काढून त्याचे पाणी पूर्णतः निथळून घ्या. थंड होऊ द्या.
आलं, लसूण. मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून, बारीक वाटून त्याची चटणी करा.
मटार मिक्सर मधून पाणी न घालता फिरवून घ्या. घट्ट गोळा झाला पाहिजे. सर्व मटार मिक्सरमध्ये वाटले जात नाहीत. अर्धवट वाटलेले मटार थाळीत काढून एखाद्या वाटीने, किंवा पावभाजी बनवायच्या उपकरणाने चेचून त्यांना एकजीव करून घ्या. पाणी वापरायचे नाही.
चेचलेल्या मटार गोळ्यात पुदिना चटणी, जिरे पावडर आणि बडीशोप घालून, चव पाहून, मिठाची मात्रा चवीला साजेशी करून घ्या.
आता, मटार गोळ्यातून एक लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची, आपण मोदक करताना करतो तशी,
पारी (छोट्या वाटीचा आकार) करून घ्या. त्यात पनीरचा गोळा घालून पारीचे तोंड बंद
करा. हातावर फिरवून त्याला गोल आकार द्या. आकार साधारणपणे लिंबाएवढा होतो.
आता, बटाट्याच्या गोळ्यातून लिंबापेक्षा किंचित मोठा गोळा घेऊन त्याचीही वरील प्रमाणे पारी करून घ्या आणि त्यात वर बनविलेला मटार-पनीरचा गोळा घालून पारीचे तोंड बंद करून हातावर फिरवून गोल पॅटीस तयार करा. असे सर्व पॅटिस बनवून मध्यम आंचेवर, सोनेरी रंगावर तळून घ्या.
सर्व पॅटीस तळून झाले की प्रत्येक पॅटीस सुरीने मधून अर्धा कापून घ्या. म्हणजे आंतला पांढरा, हिरवा आणि पिवळा रंग दिसून येईल. असे पॅटीस चित्रात दाखविल्या प्रमाणे बशीत मांडून, बाजूला लाल भडक टोमॅटो सॉस, ठेवून खाण्यास द्या.
शुभेच्छा....!
माहितीचा स्रोत:
टी.व्ही.
अधिक टीपा:
बटाटे गरम असतानाच त्यात कॉर्नस्टार्च घालून मळल्याने कॉर्नस्टार्च शिजून नीट एकजीव गोळा होतो. बटाटे पाण्यातून बाहेर काढून ठेवावेत. म्हणजे गोळा घट्ट होईल.
तेल नीट तापल्यावर एकावेळी १-२ पॅटीस तेलात सोडावेत. पॅटीस तेलात सोडल्यावर लगेच हलवू नयेत. त्या ऐवजी कढईतील बाजूचे तापलेले तेल त्यावर उडवत राहावे आणि बाहेरील बटाट्याचे आवरण जरा तळले गेले की मग हलक्या हाताने पॅटीस तळाकडून सोडवून घेऊन सर्व बाजूंनी नीट तळून घ्यावा. घाई केल्यास, झाऱ्याला पॅटीस चिकटून, मोडण्याची शक्यता असते.
पॅटीसला बाहेरून ब्रेडचा चुरा लावूनही ते छान होतात. परंतू, तेल लवकर काळे (त्यात पडलेला ब्रेडचा चुरा जळून) होते. त्यामुळे, ब्रेडचा चुरा वापरला तर प्रत्येक तळणी नंतर चहाच्या गाळणीने (धातूच्या, प्लॅस्टिकच्या नाही) तेलातील जास्तीचा चुरा काढून टाकावा.
पनीर ऐवजी छेडर चीझ वापरूनही ही पाककृती छान होते. मात्र, चीझ वापरल्यास पॅटीस अर्धे कापू नयेत (आतलं चीझ वितळलेलं असतं). त्या ऐवजी तसेच आख्खे खावयास द्यावे.