मार्डिग्रा जंबलाया

 

 

वाढणी:
४ जणांना एका वेळेकरता

पाककृतीला लागणारा वेळ:
४५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस
 

  • २ चमचे ऑलिव्ह तेल
  • ४ पाकळ्या लसूण
  • अर्धा पाव शिजवलेला/ कॅनमधला राजमा
  • १ मोठा कांदा
  • २ ढोबळ्या मिरच्या
  • १ पाव स्वॅश/ भोपळा
  • एक पाव भेंडी
  • एक पाव टोमॅटोचे काप
  • चवीप्रमाणे मीठ, एक छॉटा चमचा मीरपूड
  • १ लिटर व्हेजिटेबल स्टॉक ( तयार मिळतो)/ भाज्यांचे सूप
  • अर्धा कप बेबी कॉर्न
  • चिरलेली कोथिंबीर/ पार्स्ली
  • दीड पाव तांदूळ

 

क्रमवार मार्गदर्शन:
 

सर्व भाज्या धुवून  चिरून घ्याव्यात.

मात्र भेंडीचे फक्त देठ काढून अख्खीच्या अख्खी भेंडी घालावी.

चिरलेले लसूण व कांदा एका मोठ्या पातेल्यात ऑलिव्ह तेलावर परतून घ्यावे. टोमॅटो वगळून नंतर त्यात सर्व भाज्या त्यामध्ये घालाव्यात व परतून घ्याव्यात.

त्यानंतर त्यात व्हेजिटेबल स्टॉक घालून परतावे आणि वाफ आणावी.

 त्यानंतर तांदूळ या भाज्यांच्या मिश्रणात एकत्र करावे. यावेळी चिरलेले टोमॅटो घालावेत. 

चवीनुसार मीठ घालावे. मीरपूड घालावी. 

भात शिजला की वरून पार्स्ली / चिरलेली कोथिंबीर घालावी.

 

माहितीचा स्रोत:
अमेरिकन शेजारी

अधिक टीपा:
 

हा भात केजन कुकिंगचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः अमेरिकेतील लुझियाना राज्यात हा भात अधिक प्रमाणात करतात. त्याकरता लागणारी मसाल्याची पाकिटेही बाजारात मिळतात.(भात भाज्या एकत्र केल्या आणि मसाला घातला की झाले .. अशा धर्तीची)

हा भात गरम गरम खायला अधिक चांगला लागतो.

नॉन वेज खाणारे त्यात पोर्क, चिकन, श्रिंप (जे हवे ते )घालून भात करू शकतात.

भारतीय गरम मसाला घालून जरा घरगुती चव आणता येते. एखादे तिखट सॉस आणि चटणी बरोबर घेण्यास हरकत नाहीच.

मऊ होणारा मोठ्या दाण्याचा तांदूळ घेतला तर भात छान दिसतो. (मला तरी बासमती पेक्षा  या भाताकरता सोनामसुरी  बरा वाटतो)

सुवर्णमयी

  

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.