तुझ्या शपथ हे खरे!

नायिका

कुशी पालटत राहिले तरी रात्र न सरता सरे
प्रिया रे, तुझ्या शपथ हे खरे!

नायक

दुःख करु नको, विरहकाल हा फार न आता उरे
प्रिये गं, तुझ्या शपथ हे खरे!

नायिका

तुझ्या आठवांसवे उरी वेदना उठत राहिली
माझी-निद्रेची तशी लपाछपी होत राहिली
रात्रभरी वैरीण कौमुदी वरी खुपत राहिली

आग पेटली एकिकडे अन् दंवही वर भुरभुरे
प्रिया रे, तुझ्या शपथ हे खरे!

नायक

नयनतटाकी अनुरक्ताचे जग हरपुन जायचे
आकांक्षित मन कुंतलछायेमध्ये पहुडायचे
दूर हो प्रिये नाहीतर काही काही व्हायचे

अवस्थेत ह्या अश्या भरतसे पायांना कांपरे
प्रिये गं,  तुझ्या शपथ हे खरे!

नायिका

असेन रुसले मी तर तू समजूत घाल रे प्रिया
असेन जर मी दूर तर मला साद घाल तू प्रिया
असेल काही गाऱ्हाणे तर मिठीत मज घे प्रिया

भग्न न व्हावे प्रेमवचन हे, मन ही इच्छा करे
प्रिया रे, तुझ्या शपथ हे खरे!

टीपा :

१,२ : प्रिया रे-प्रिये गं ऐवजी राजसा-राणिगं, प्रियतमा-प्रियतमे, साजणा-साजणी किंवा लाडक्या-लाडके असे काहीही आपल्या आवडीप्रमणे म्हणवे.

३ : अनुरक्त हा आशिक साठी वापरला आहे. यावर मी कवी नाही येथे अधिक उपौक्त चर्चा आहे.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.