शृंगाररस, साहित्य, भारत आणि मराठी

मराठी साहित्याला (व मनोगतालाही) शृंगार रसाचे वावडे का?

मराठीची जन्मदात्री संस्कृत असली तरी मराठी मध्ये शृंगार रसाचे लिखाण क्वचित सापडते, शिवाय असे लिखाण हे कनिष्ठ दर्जाचे लेखक लिहितात असा समज आहे किंवा अशा लेखनाला दुय्यम दर्जा दिला जातो. या वरील कारणी मीमांसा करण्याचा हा प्रयत्न. जाणकारांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यास उत्तमच.

शृंगाराबद्दल इंग्रजांचे १८, १९ व्या शतकात व २० व्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतरपर्यंत विचार हे, शृंगार ही बंद दरवाज्यामागे करायची गोष्ट असे होते. सभ्यता व शृंगार हे एका वाक्यात येत नसे. ह्या उलट फ्रेंच मंडळींनी शृंगाराला पूर्वापार समाजमान्यता दिली आहे. जुन्या संस्कृतींपैकी इटालियन, व्ह्यायकींग यांनाही शृंगाराचे वावडे नाही. किंबहुना इस्लाम व इंग्रज सोडल्यास स्त्री-पुरुष संबंध हे मानवी संस्कृतीने परिपक्वतेनेच पाहिले आहेत. संस्कृत साहित्यात याचे अनेक दाखले सापडतात, किंबहुना रामायणात देखील असे भरपूर दाखले आहेत. म्हणजेच भारतीय संस्कृतीकडे देखील ही परिपक्वता होती.

१८, १९ व २० व्या शतकात इंग्रजांनी केलेल्या आक्रमणाबरोबर त्यांच्या चालीरीती आल्याच. त्यामुळे इंग्रजांचा याबाबतीतला भिडस्त पणा त्याकाळातील तथाकथित पुढारलेल्या मंडळींनी उचललला असे वाटते. खऱ्या भारतीय मानसिकतेशी नाळ तोडून राज्यकर्त्यांच्या चालीरिती ह्या आमच्याच आहेत असे म्हणणे समाजमान्य झाले.

संस्कृत वापरातून कमी होत असल्याने तिच्यावर इंग्रज येण्याचा परिणाम हा संस्कृत साहित्य कमी होण्यावर झाला परंतु संस्कृत साहित्य भ्रष्ट करण्यावर झाला नाही. याउलट भारतीय भाषा व तत्कालीन समाजावर हा परिणाम झाला व तो खोलवर रुजला.  मराठी राज्यकर्ते हे इंग्रजांच्या आधीचे शेवटचे राज्यकर्ते असल्याने साहजिकच मराठी भाषेवर देखील हा परिणाम खोलवर झाला. परिणामी तथाकथित मध्यमवर्गीय मंडळींना शृंगार रस आणि स्त्री-पुरूष संबंधावरील लिखाण हे उथळ लिखाण आहे असा पवित्रा घेणे स्वतः:चे महत्त्व टिकविण्याच्या दृष्टीने सोईस्कर झाले.

या विषयावरील अभ्यासाअंती इतर काही कारणांबरोबरच हे एक कारण आहे अशी समजूत आहे. जाणकारांनी मदत करावी. भावनाविवश न होता कारणीमिमांसा केल्यास ज्ञानात भर पडेल.

स्निग्धा.