मानवी नातेसंबंधांचा सुगंध - खुशबू

KHUSHBOO

परवा बऱ्याच दिवसांनंतर 'बेचारा दिल क्या करे ' हे गाणं ऐकलं आणि अचानक मला विस्मरणात गेलेल्या 'खुशबू' या सिनेमाची आठवण झाली. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा एक साधा सोपा शालीन सिनेमा. सोपा, पण सरळ नाही. शरदचंद्र चटर्जींच्या कथेवर आधारित गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला 'खुशबू' मानवी नात्यांचा खोलवर धांडोळा घेतो. माणसांमाणसांमधील गुंतागुंतीची नाती हा बासु भट्टाचार्य यांच्यासारखाच गुलजार यांचाही आवडता विषय. ती गुंतागुंत वाढवायला नियती नावाचे एक अदृष्य जाळे सगळीकडे  पसरले आहे. त्यातल्या चुकीच्या धाग्यावर पाय पडला की सगळे बेत, सगळ्या योजना, सगळी स्वप्नं - सगळं कुस्करलं जातं. हे सगळे माणसाच्या शक्तीबाहेरचे, कदाचित कल्पनेबाहेरचेही....
डॉक्टर वृंदावनच्या आणि कुसुमच्या आयुष्यातही असेच काहीसे झाले आहे. काही गैरसमज झाले आणि त्यांचे ठरत आलेले लग्न मोडले. वृंदावनच्या आयुष्यात काहीशा अपघातानेच आलेल्या लाखीबरोबर त्याचे लग्न झाले खरे, पण चरणला त्याच्या पदरात टाकून तीही निघून गेली. इकडे अपमानित कुसुमने लग्न केले नाही. आपला दुखावलेला स्वाभिमान आणि वृंदावनची आठवण सोबत घेऊन ती आपला भाऊ कुंज याच्याबरोबर त्याच खेड्यात रहाते आहे. गरीबीत, पण अभिमानाने.
अशातच चरणला आणि आपल्या आईला घेऊन वृंदावन गावी परत येतो. कुसुमचे आयुष्य पुन्हा ढवळले जाते. अजूनही तिच्या मनात वृंदावनविषयी कुठेतरी ओलावा आहे. त्याच्याबरोबरच्या सहजीवनाची स्वप्ने अजून पुरती विझलेली नाहीत, पण याबरोबर वृंदावनच्या वडिलांकडून झालेल्या अपमानाचा घावही अद्यापि ठसठसतो आहे. वृंदावनच्या आईलाही आपल्या मुलाचा संसार परत सजलेला पहायचा आहे. या विचित्र मनस्थितीतून आता सरळसरळ उत्तर निघणार असे वाटतानाच परत सगळे विस्कटते, परत माणसाच्या हतबलतेची खात्री पटावी असे काहीसे होते, पुन्हा एकदा कुसुमला  लांब निघून जाणाऱ्या वृंदावनचे पाठमोरे चित्र पहावे लागते...
अर्थात इतके 'जी. ए.' पण काही हिंदी चित्रपटाला परवडत नाही. या कथेचा सुखांत होतो खरा, पण अगदी हुलकावण्या देत देत. अशी ही सरधोपट म्हणावी अशी कथा. पण गुलजार यांनी तिला -अगदी गुळगुळीत शब्द वापरायचा झाला तर- जी 'ट्रीटमेंट' दिली आहे, तिने 'खुशबू' एक चांगला सिनेमा झाला आहे. गुलजारच्या 'ऑल टाईम ग्रेट' मध्ये समाविष्ट व्हावा इतका नसला तरी दीर्घकाळ स्मरणात रहावा असा नक्कीच. सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, हे मी यापूर्वीही म्हटले होते, ते परत म्हणावेसे वाटावे, इतका. एक दिग्दर्शक म्हणून गुलजार यांनी संजीवकुमारचा सर्वोत्कृष्ट वापर करुन घेतला, यात नवल वाटण्यासारखे काही नाही. पण जीतेंद्रसारख्या निव्वळ शाडूच्या गोळ्याला त्यांनी 'खुशबू' मध्ये ('परिचय' प्रमाणेच) चक्क चांगला अभिनय करायला लावले आहे. एकतर चष्मा, मिशी आणि पांढरा झब्बा पायजमा हा (गुलजार यांचा स्वतःचाच?) गेट अप जीतेंद्रला शोभून दिसतो. त्यातून गुलजार यांचेच अर्थपूर्ण संवाद त्याने किंचित अंडरटोनने सुरेख खुलवले आहेत. पण 'खुशबू' चे सगळ्यात मोठे यश आहे ते म्हणजे हेमामालिनी. 'ड्रीम गर्ल' वगैरे अशी विशेषणे आसपासही फिरकू नयेत, आणि इतर चित्रपटातल्या तिच्या त्या दमेकरी 'नहीं...' ची आठवणही येऊ नये अशी एक संपूर्ण वेगळी आणि भारदस्त हेमामालिनी 'खुशबू' त दिसते. तिचा स्वाभिमान, तिचे वृंदावनवरचे प्रेम, पण या प्रेमाच्या मोहात पाडून तिला गृहीत धरण्याची चूक वृंदावनच्या आईकडून होताच आपल्या मानासाठी आपले सुख सोडून देण्याइतपतचा तिचा बाणेदारपणा, वृंदावनच्या मुलात तिची झालेली भावनिक गुंतवणूक आणि या सगळ्याच्या मागे दिसेल न दिसेलसे उभे असलेले तिचे सच्चे माणूसपण... गुलजार यांना या भूमिकेकडून यापेक्षा काही जास्त अभिप्रेत असावे असे वाटत नाही. याच काळात ती म्हणे 'शोले'चे ही शूटिंग करत होती. पण इथली तिची कुसुम बसंतीपेक्षा कितीतरी वेगळी, कितीतरी अस्सल वाटते.
'हम अंग्रेजोंके जमाने के जेलर हैं' हा विदूषकी संवाद आणि तसलीच ती विदूषकी भूमिका यातून बाहेर पडण्यासाठी असरानी या गुणी नटाला हृषिकेश मुखर्जी, गुलजार आदि मंडळींनी चांगल्या भूमिका दिल्या हे किती बरे झाले! नाही तर असरानी शक्ती कपूर आणि राजेंद्रनाथसारखा सारखा असह्य झाला असता. कुंजची या चित्रपटातली दुय्यम भूमिका असरानीने झोकात केली आहे (अभिमान, चुपके चुपके, नमकहराम या चित्रपटांसारखीच). आणि 'खुशबू' मधली फरीदा जलाल ही केवळ नंबर एक. एक तर तिचा 'स्क्रीन प्रेझेन्स' हा कमालीचा गोड आणि खानदानी आहे. त्यातून तिचा नितांतसुंदर अभिनय. तिची कुसुमबरोबरची मैत्री, त्यांच्या चेष्टामस्करी, नदीवर पाणी भरायला जाणे (आणि तिथले ते अप्रतिम गाणे).... अगदी बोलताबोलता वेणीच्या शेपट्याशी खेळणे आणि होणाऱ्या नवऱ्याच्या नावाच्या चोरट्या उल्लेखाने लाजणे... या अभिनेत्रीचे जेवढे व्हायला पाहिजे होते तेवढे चीज झाले नाही असे मला राहून राहून वाटते. बाकी दुर्गाबाईंच्या अभिनयाविषयी काय लिहावे? तो केवळ पहावा असा. तो सगळीकडे जसा असतो तसाच अप्रतिम 'खुशबू' मध्येही. मास्टर राजूचा उल्लेख बाकी इथे मुद्दाम केला पाहिजे. लहान मुलांकडून नैसर्गिक अभिनय करुन घेणे हे फारच कठीण आहे. एकतर ती मुले कमालीची अवघडलेली वाटतात, किंवा अत्यंत आगाऊ अशी. गुलजार यांनी हे अवघड काम कैक वेळा यशस्वीरीत्या करुन दाखवले आहे ('परिचय'). चरण हा आईवेगळा मुलगा आणि त्याची आई होण्याची स्वप्ने पहात असणारी कुसुम यांच्यातले प्रसंग रानात दूरवर एखादे अलगुज वाजावे असे आहेत. पहात रहावे असे आणि पहाता पहाता घशात आवंढा आणणारे.
गुलजार आणि आर. डी. बर्मन यांची वाईट अशी गाणी फारशी नसावीतच. 'दो नैनोंमे आंसू भरे है' हे लताबाईंचं गाणं आठवा आणि अंधाऱ्या नदीच्या प्रवाहातून होडी पलीकडे जात असताना वल्ह्यांच्या चुबुक चुबुक तालावरचं ' ओ माझी रे' आठवा. 'बेचारा..' तर आहेच.

याच 'बेचारा दिल क्या करे' ने मला 'खुशबू' ची इतक्या दिवसांनंतर आठवण झाली.