अस्वस्थ मनाच्या लहरी

कधीकधी मन खूप उद्विग्न होता ..खूप दिवसांनी काहीतरी लिहावंसं वाटत ....जेव्हा सगळा काही ठीक चालू असता तेव्हा ही अस्वस्थता, हे  भरकटलेपण कुठे जाते काय माहीत.. पण जेव्हा मनाची ही स्थिती परत येते तेव्हा वाटत अरे आपण नेहमी असेच तर असतो. मध्ये जे काही थोडे वाईट नसलेले क्षण गेले तो तर एक भास होता   ...या अवस्थेत मग सगळा नकोस होता अगदी काहीच नकोसा वाटत ..पण असाच विचार पुढे रेटत राहिले तर लक्षात येता की काहीच नको तर मग काय? मग आपण इथे या जगात काय करतो आहोत? मन असा नश्वरते बद्दल विचार करू लागता ....हे जीवन काय आहे? माणूस कशासाठी जगतो ..तो जगातून काय मिळवतो..जगतो म्हणजे काय करतो असे अनंत विचार मनात दाटी करून येतात....लोक एवढा पैसा कमावतात ..काय काय खोटे नाटे प्रकार लांड्या लबाड्या करून मोठे होतात..हे सगळा कशासाठी...काय साध्य होता यामधून...६० ७० वर्षाचा उणं पुरा आयुष्य आणी त्यात किती हेलकावे आणि किती धक्के ...तरी पण माणूस जगत राहतो. अगदी रस्त्यावरचा भिकारीही हात पाय नसले डोळे नसले तरी जगत राहतो..का कशासाठी..काय मिळवतात हे लोक जगून?

अश्या क्षणभंगुर टीचभर जगण्याला परत इतिहास जपून ठेवण्याचा छंद असतो...का हा हव्यास जगण्याचा ..आपण जगतो म्हणजे काय करतो... विचारांचे मळभ असा दाटून येता की मग अस्वस्थता कोंडली जाते. आणि कोंडलेल्या मांजरीसारखी फिस्कारत बाहेर पडण्याची वाट शोधू लागते ..सारखे उसासे येत राहतात. मन म्हणजे काय..ते कुठे असता याचा शोध सुरू होता ..स्वतःला समजावणंही ऐका बाजूला सुरूच असते की सगळा मनाच्या अवस्थेवर अवलंबून असता  ..आनंदी मन तर आनंदी जग वगैरे...पण या गोष्टी आनंदी मन असताना जाणवत नाहीत . कारण ते क्षणच अपुरे असतात...पटकन येऊन कधी संपून जातात काही समजत नाही.

माणसं खरंतर अगदी मनापासून आनंदी समाधानी असण्याचे खूप कमी क्षण अनुभवतात. चेहऱ्यावर आनंद दिसला म्हणजे तो बहुतेक वेळेला आत मध्ये असेलच असा नाही .हसताना डोळ्याची चमक दिसणं विरळाच....दिलखुलास खरा हसू...जेव्हा बरोबरीनं डोळ्यात ती एक विशिष्ट चमक दिसते आणि चेहऱ्यावरचा तजेला दिसतो असे आपण किती हसतो ?..असे क्षण फार तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच येतात....

बहुतेक या क्षणांच्या वाटेकडे डोळे लावून माणसं आशेवर जगत राहतात....सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत ....हे जे अनमोल क्षण असतात ते मिळवण्यासाठी ही सगळी वाटचाल असते ...आणि मग अगदी पुसटशी ही एखाद्या अश्या क्षणाची चव माणसाला पुढचा असाच क्षण मिळवण्यासाठी उद्युक्त करत राहते....

छोट्या बाळाला जसे त्याची आई त्याला खाऊ देऊन तिच्या मनासारखा वागायला लावते तीच सवय माणूस आयुष्यभर कायम राखतो. ऐका मागोमाग एक सुख क्षणांचा खाऊ मिळवण्याची त्याची धडपड अव्याहत सुरूच राहते.....जसा आईला माहीत असता की खाऊ ची लालूच दाखवल्यावर बाळ आपल्या मनाप्रमाणे वागणार आहे ...तसाच आयुष्या मनाला काही ना काहीतरी लालूच दाखवून त्याच्या मनासारखा खेळवत राहता ....आणि माणसा आपण जगतो आहोत असा विचार करत खेळवले जात राहतात....

म्हणजे माणसा जगत नाहीत ....'आयुष्य त्यांना जगवता'. आणि त्या जगवण्याचा एक छोटासा उद्विग्न क्षण म्हणजे आजचा दिवस ... 'आयुष्य दादा' बहुतेक दुसर्‍या कोणाला तरी छान जागवण्यात आज नक्कीच व्यस्त असला पाहिजे... या विचारांचा बाण बरोबर वर्मी लागून पडलेल्या छिद्रामधून कोंडलेली अस्वस्थता हळू हळू बाहेर पडू लागते ....